Goa Politics: गोव्यात 'आप'ची नवी टीम जाहीर! वाल्मिकी नाईक प्रदेशाध्यक्ष, तर गर्सन गोम्स कार्यकारी अध्यक्ष

Valmiki Naik AAP president: प्रदीर्घ काळापासून पक्षाशी एकनिष्ठ असलेले वाल्मिकी नाईक यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
aap goa
aap goaDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गेल्या काही दिवसांपासून राजकीय पडझडीचा सामना करणाऱ्या आम आदमी पक्षाने (आप) गोव्यासाठी आपली नवीन अधिकृत कार्यकारिणी जाहीर केली आहे. पक्षाच्या केंद्रीय राजकीय व्यवहार समितीने (PAC) आज, ११ जानेवारी २०२६ रोजी नवीन पदाधिकाऱ्यांची नावे घोषित केली. यामध्ये प्रदीर्घ काळापासून पक्षाशी एकनिष्ठ असलेले वाल्मिकी नाईक यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

संघटनात्मक मजबुतीसाठी नवी 'कोअर टीम'

केवळ अध्यक्षच नव्हे, तर पक्षाने संपूर्ण कोअर टीममध्ये बदल केले आहेत. गर्सन गोम्स यांची राज्याचे कार्याध्यक्ष (State Working President) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, जे नाईक यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून पक्षाचे काम पाहतील. तसेच, संघटनेची पकड मजबूत करण्यासाठी प्रशांत नाईक यांच्याकडे 'राज्य संघटना सचिव' (State Organisation Secretary) हे महत्त्वाचे पद सोपवण्यात आले आहे.

पक्षाच्या ज्येष्ठ फळीतील संदेश तळेकर देसाई यांना 'राज्य वरिष्ठ उपाध्यक्ष' (State Senior Vice President) म्हणून मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. या नियुक्त्यांमुळे पक्षाने अनुभवाला आणि आक्रमकतेला एकत्र आणण्याचा प्रयत्न केला आहे.

आतिशींच्या गोवा दौऱ्याचे फलित

पक्षाच्या गोवा प्रभारी आतिशी गेल्या तीन दिवसांपासून गोव्यात ठाण मांडून होत्या. या काळात त्यांनी प्रत्येक मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी आणि उरलेल्या नेत्यांशी चर्चा केली. पक्षातील नेत्यांची गळती आणि नुकत्याच झालेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीतील पराभवानंतर मरगळ आलेल्या संघटनेत चैतन्य निर्माण करण्यासाठी नवीन टीमची घोषणा होणे आवश्यक होते.

राष्ट्रीय सरचिटणीस (संघटना) डॉ. संदीप पाठक आणि प्रभारी आतिशी यांनी या नावांसाठी दिल्लीतून हिरवा कंदील मिळवला असून, नवीन टीम आता थेट जनतेच्या प्रश्नांवर काम करणार असल्याचे संकेत दिले आहेत.

aap goa
Goa politics: युती न केल्‍यानेच ‘आप’ला निवडणुकीत फटका! पालेकरांचा दावा; सांताक्रूजमधील मतदारांना विश्‍‍वासात घेऊन निवडणार पर्याय

पुढील वाटचाल आणि आव्हाने

नवीन कार्यकारिणीसमोर सर्वात मोठे आव्हान हे विखुरलेल्या कार्यकर्त्यांना पुन्हा एकत्र करण्याचे आहे. वाल्मिकी नाईक यांच्या नेतृत्वाखालील ही टीम आता आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी आणि बूथ स्तरावरील बांधणीवर लक्ष केंद्रित करणार आहे. भ्रष्टाचाराचे मुद्दे, पर्यावरणाचे रक्षण आणि स्थानिक जनतेच्या समस्यांना विधानसभेत व रस्त्यावर लावून धरणे, ही या टीमची प्राथमिकता असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com