
म्हापसा: गोवा हे नैसर्गिक साधनसंपत्तीने नटलेले समृद्ध राज्य आहे. मात्र या राज्याला योग्य राजकारणी मिळाले नाहीत. परिणामी मागील ६० वर्षे गोव्यावर ठरावीक १३ ते १४ राजकीय कुटुंबांचीच पकड आहे. आपल्याला हे फॅमिली राज मुळासकट उखडून टाकायचे आहे, असे म्हणत आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय समन्वयक तथा दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजप व काँग्रेस या दोन्ही राष्ट्रीय पक्षावर तोंडसुख घेतले.
धुळेर-म्हापसा येथे रविवारी आयोजित ‘आप’च्या उत्तर गोवा कार्यकर्ता मेळाव्यात केजरीवाल बोलत होते. व्यासपीठावर दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आतिशी मार्लेना, प्रदेशाध्यक्ष अमित पालेकर, आमदार व्हेंझी व्हिएगस, क्रुझ सिल्वा, वाल्मिकी नायक व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
केजरीवाल म्हणाले, भाजप व काँग्रेस हे दोन्ही पक्ष एकाच माळेचे मणी आहेत. गोव्यातील सर्व व्यवसाय, खनिज, सरकारी कंत्राटे ठरावीक कुटुंबांनाच मिळतात. गोव्यात जमिनींचा मोठ्या प्रमाणात व्यवहार होतोय. या जमिनी बाहेरच्यांना विकल्या जातात. त्याविरोधात कोणी आवाज उठविल्यास सरकार त्यांना तुरुंगात डांबले जाते, त्यांच्यावर हल्ले केले जातात.
हे रोखणे काळाची गरज आहे. गोव्यातील साधनसंपत्तीचा वापर हा लोककल्याणासाठी झाला पाहिजे. या पैशांमधून स्थानिकांना पायाभूत सुविधा पुरविल्या पाहिजेत, असेही ते म्हणाले. दरम्यान, व्हेंझी व्हिएगस, आतिशी यांनीही भाजप व काँग्रेसवर निशाणा साधला. या मेळाव्याला ‘आप’ कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
अमित पालेकर यांनी सांगितले की, शनिवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गोव्यात आले. सायंकाळनंतर गोमंतकीयांचा मूड बदलतो असे ते आपल्या भाषणात म्हणाले. मुळात लोकांचा मूड बदलत आहे, तो बदल घडविण्यासाठी. आता लोक जागृत झाले आहेत. येथे प्रत्येक गोष्टीची रक्कम मोजावी लागते. आवाज उठविला म्हणून सरकारने ४५० लोकांविरोधात गुन्हे नोंदविले. अशा स्थितीत लोकांना त्यांचे अधिकार व गोव्याचा आत्मा पुन्हा मिळवून देण्यासाठी हा आमचा लढा आहे.
गोव्याच्या सरकारवर हा ठरावीक कुटुंबांचा नव्हे, तर लोकांचा अधिकार असला पाहिजे. आम आदमी पक्ष सेवेचे राजकारण करतो. उलट सत्ताधारी पक्ष घाणेरडे राजकारण करतो. येत्या काळात गोव्यात ‘आप’च्या कार्यकर्त्यांची मोठी रॅली काढली जाईल.
अरविंद केजरीवाल, राष्ट्रीय समन्वयक (आप)
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.