

पणजी: गोवा पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने पर्वरी येथे टाकलेल्या छाप्यात १.०५२ किलोग्रॅम वजनाचा हायड्रोपोनिक गांजा जप्त केला. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या अमली पदार्थाची किंमत सुमारे १ कोटी ५ लाख २९ हजार रुपये आहे. याप्रकरणी गुजरातमधील ३१ वर्षीय रुचितकुमार वेकारिया याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २३ नोव्हेंबरच्या मध्यरात्री पर्वरी येथील हाऊसिंग बोर्ड कॉलनी परिसरात पोलिस उपनिरीक्षक विकेश हडफडकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने दोन स्वतंत्र पंचांच्या उपस्थितीत संशयित रुचितकुमारला ताब्यात घेतले.
पोलिसांनी त्याची आणि त्याच्या कारची झडती घेतली असता, कारमध्ये लपविलेली पारदर्शक पॉलिथिन पिशवी आढळून आली. या पिशवीत गांजाच्या झाडाची पाने आणि फुलांचा भाग असलेला हायड्रोपोनिक गांजा मिळाला. याचे वजन १,०५२.९ ग्रॅम असून त्याची किंमत अंदाजे १,०५,२९,००० रुपये आहे.
याप्रकरणी एनडीपीएस कायदा १९८५ च्या कलम २०(ब)(२)(ब) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून, संशयिताला अटक केली आहे. ही कारवाई अमली पदार्थविरोधी विभागाचे पोलिस अधीक्षक हरिश्चंद्र मडकईकर, पोलिस उपअधीक्षक गौरव यादव, पोलिस निरीक्षक सगुण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या प्रकरणाचा अधिक तपास पीएसआय विकेश हडफडकर करत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.