

कोलवाळ: अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात कोलवाळ पोलिसांनी गुरुवारी (27 नोव्हेंबर) एक मोठी आणि यशस्वी कारवाई केली. मिळालेल्या माहितीच्या आधारे छापेमारी करुन पोलिसांनी तब्बल 5 लाख 50 हजार किमतीचा 5.400 किलो गांजा जप्त केला. या कारवाईत अंमली पदार्थांची विक्री करण्याच्या आरोपाखाली गोविंद रंगी नावाच्या 19 वर्षीय तरुणालाही बेड्या ठोकण्यात आल्या.
दरम्यान, कोलवाळ पोलिसांनी ही कारवाई अत्यंत संवेदनशील ठिकाणी केली. 11.40 ते दुपारी 2.00 वाजेदरम्यान ही छापेमारी केली. कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाकडे जाणाऱ्या रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी गोविंद रमेशकुमार रंगी (वय 19 वर्षे) याला ताब्यात घेतले. तो मूळचा राजस्थनातील जालोर बिबळसार येथील रहिवासी आहे. पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून 5.400 किलो गांजा जप्त केला, ज्याची बाजारभावानुसार किंमत अंदाजे 5,50,000/- रुपये होते. याशिवाय, पोलिसांनी आरोपीकडून मोबाइलही जप्त केला.
कोलवाळ (Colvale) पोलीस स्थानकाच्या पोलीस उपनिरीक्षक (PSI) दत्ताराम राणे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई पार पाडली. या यशस्वी कारवाईसाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले. उत्तर गोवा विभागाचे पोलीस अधीक्षक हरिश्चंद्र माडकईकर, उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO Mapusa) विल्सन डिसूझा आणि कोलवाळ पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक संजीत कांदोळकर यांच्या संपूर्ण देखरेखीखाली ही मोहीम राबवण्यात आली. पीएसआय दत्ताराम राणे यांच्यासह या पथकात हवालदार प्रताप सावंत (HC 5493), हवालदार पांडुरंग नाईक (HC 5777), पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण पाटील (PC 7341), पोलीस कॉन्स्टेबल सुदेश केरकर (PC 6366), आणि पोलीस कॉन्स्टेबल समीर नाईक (PC 9059) यांचा समावेश होता.
आरोपी गोविंद रंगी याच्यावर अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून कोलवाळ पोलीस स्थानकाचे पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र सातेळकर या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. अंमली पदार्थांच्या तस्करीची साखळी तोडण्यासाठी आणि या रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी पोलीस कसून चौकशी करत आहेत. गोव्यातील (Goa) ड्रग्ज विरोधातील कारवाई अधिक तीव्र झाल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.