पणजी : गोवा पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाचं पहिली बॅच विशेष कमांडो ट्रेनिंगसाठी सज्ज झाले आहेत. हे ट्रेनिंग पुण्यातील फोर्स वन सेंटरमध्ये दिलं जाणार असून त्याचा कालावधी 8 आठवड्यांचा असणार आहे. गोवा एटीएसचे 29 जवान या प्रशिक्षणामध्ये सहभागी होणार आहेत. गोव्यात सध्या एटीएसमध्ये 110 जवान कार्यरत आहेत.
या प्रशिक्षणात जवानांना विशेष असं शहरात उपयोगी पडणारं प्रशिक्षण देण्यात येईल, ज्यात शस्त्रांची हाताळणी, शस्त्रविरहित लढाई, ऐनवेळी आलेल्या संकटांचा सामना करण्याचं प्रशिक्षण, छोट्या-मोठ्या मोहिमा, यासोबतच इतर महत्त्वाची कौशल्यंही शिकवली जाणार आहेत.
गोवा पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकात सध्या 58 कमांडोची भरती करण्यात आली आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार प्रक्षिक्षण घेणाऱ्या 27 जवानांव्यतिरिक्त उरलेल्या जवानांना पहिलं पथक परतल्यानंतर पुण्याला पाठवलं जाणार आहे. यापूर्वी याच कमांडोना तीन महिन्यांचं कमांडो ट्रेनिंग देण्याचं नियोजन होतं. मात्र हरियाणातील नॅशनल सेक्युरिटी गार्ड कॅम्पसमध्ये जागा शिल्लक नसल्याने हे प्रशिक्षण पुढे ढकलण्यात आलं होतं.
गोवा आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ असल्यामुळे दहशतवादी हल्ल्याचा धोका राज्याला जास्त आहे. त्यामुळे या सर्व कमांडोना सध्या प्राधान्याने प्रशिक्षण दिलं जाणार आहे.
गोवा सरकारने 2009 साली क्विक रिअॅक्शन टीम स्थापन केली होती. 2014 मध्ये राज्यात एटीएस म्हणजेच दहशतवाद विरोधी पथकाची स्थापना करण्यात आली. दहशतवादविरोधी कारवायांची माहिती मिळवून त्या वेळीच रोखणं हे या पथकाचं मुख्य काम असून यात आतापर्यंत 110 जवानांची भरती करण्यात आली आहे. दहशतवादी कारवाया, देश किंवा राज्यविरोधी गुन्हे, तस्करी, माफिया, अमली पदार्थांसंबंधी गुन्हे आदी गोष्टींचा तपास करण्याची मुभा एटीएसला देण्यात आली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.