Goa Mining: गेल्या काही वर्षांपासून खाण व्यवसाय बंद असल्याने या भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे बेरोजगारीत वाढ होताना नागरिकांना आर्थिक स्थितीचा सामना करावा लागत आहे. सध्या खाण व्यवसाय हा सरकारच्या मालकीचा झाला असल्याने या भागातील खाणपट्टा त्वरित लिलावात काढून स्थानिकांना रोजगार व व्यवसाय देण्यासाठी आपले प्रयत्न असणार आहेत, असे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी सांगितले.
पिसुर्ले पंचायत सभागृहात काल आयोजित केलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी पर्ये आमदार डॉ. दिव्या राणे, होंडा जिल्हा पंचायत सदस्य सगुण वाडकर, सामाजिक कार्यकर्ते विनोद शिंदे, सरपंच देवानंद परब, उपसरपंच बिजली गावडे, रुपेश गावडे, आत्माराम परब, नामदेव च्यारी, राजेश्री जल्मी, सुवर्णा शिलकर, भिंरोड्याचे सरपंच उदयसिंह राणे, माजी सरपंच दीपाजी राणे, बी. डी. मोटे उपस्थित होते.
मंत्री राणे पुढे म्हणाले, की गेल्या पन्नास वर्षांपासून या भागाचा विकास आपले वडील तथा माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांच्यामुळे झाला आहे, त्याच धर्तीवर या भागाचा विकासाची घोडदौड सुरूच राहील. पर्ये मतदारसंघातून आपली पत्नी डॉ. दिव्या राणे यांना विक्रमी मतांनी आपण निवडून दिले आहे, त्यामुळे रोजगार आणि विकास याबाबतीत पर्ये आणि वाळपई मतदारसंघ कधीच मागे राहणार नाही.
यावेळी आमदार डॉ. दिव्या राणे म्हणाल्या, की खाण व्यवसाय सुरू करून सरकारने स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून दिला पाहिजे, लिलावात खाणपट्टा त्वरित काढून पूर्वीप्रमाणे स्थानिकांना प्राधान्य देण्यासाठी आपले प्रयत्न असतील.
नागरिकांना भेडसावणाऱ्या जमीन, पाणी व रोजगार या सर्व समस्यांवर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न राहणार आहे. आपल्या मतदारसंघात दोन औद्योगिक वसाहती आहेत, त्याचा लाभ स्थानिकांना मिळाला पाहिजे. तसेच या भागाला अतिसंवेदनशील क्षेत्रातून वगळण्यासाठी आमचे प्रयत्न असतील.
यावेळी सरपंच देवानंद परब व जिल्हा पंचायत सदस्य सगुण वाडकर यांनी स्वागत करून गावातील विविध समस्या मंत्री विश्वजीत राणे व आमदार डॉ. दिव्या राणे यांच्यासमोर उपस्थित केल्या. सूत्रसंचालन अशोक नाईक यांनी केले, तर नामदेव च्यारी यांनी आभार मानले.
‘अंबे मेटॅलिकच्या विस्ताराला माझाही विरोध’
अंबे मेटॅलिक कंपनीच्या विस्तारित प्रकल्पासंबंधी मंत्री राणे म्हणाले, की या भागात व्यवसाय करून जर या भागातील नागरिकांना त्याचा लाभ होत नाही, तर मग प्रदूषण निर्माण करणाऱ्या कंपन्या या परिसरात कशाला पाहिजेत. त्यामुळे या कंपनीच्या विस्तारित प्रकल्पाला नागरिकांसमवेत आपलाही विरोध असणार आहे. त्यासाठी आपण स्वतः प्रदूषण नियंत्रण मंडळाला लेखी कळवणार आहे.
‘प्रदूषणकारी कंपन्यांना थारा देणार नाही’
मुख्यमंत्र्यांकडे बोलणी करून लिलावाच्या अटी आणखी कडक करून कोणत्याही कंपनीने लिलावात खाणपट्टा मिळवला तरी स्थानिकांचे हित लक्षात घेतले पाहिजे. तसेच प्रदूषणकारी औद्योगिक कंपन्यांना थारा देऊ नये, असे सांगणार आहे.
त्याचप्रमाणे सध्या सुरू असलेल्या अंबे मेटॅलिक कंपनीच्या विस्तारीत प्रकल्पाला नागरिकांचा विरोध असल्यास आपलासुद्धा विरोध असेल. सत्तरी तालुक्यातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी युवा पिढीला रोजगारात प्राधान्य दिले जाणार आहे, असे मंत्री राणे यांनी सांगितले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.