Goa: आणखी एक ताजमहाल? 'खरी कुजबूज'

Goa: मांद्रेत मला ताजमहाल बांधावेसे वाटते, परंतु ते शक्य आहे का?
Govind Gawade
Govind GawadeDainik Gomantak
Published on
Updated on

Goa: जगातील सात आश्चर्यांपैकी आपल्या देशातील ताजमहालाची गणना होते. मध्यंतरी याच ताजमहालावरून गोव्यातील राजकारण पूर्णतः ढवळून निघाले होते. कारण, मंत्री गोविंद गावडे यांनी विधान केले होते की, शहाजहानने ताजमहालासाठी कोटेशन मागविले नव्हते, मग मी सरकारी प्रकल्पासाठी का करू? असे त्यांचे कथित वक्तव्य होते! त्यामुळे वादंग उठले होते! अशातच आता मांद्रेचे आमदार जीत आरोलकर बोलता बोलता म्हणाले की, आपल्याला खूप काही करावेसे वाटते.

मांद्रेत मला ताजमहाल बांधावेसे वाटते, परंतु ते शक्य आहे का? मोपा विमानतळाच्या नामकरणावरून आरोलकरांना माध्यमांनी मगोपच्या दुटप्पी भूमिकेविषयी प्रश्न केला असता आरोलकर बाब यांनी वरील वक्तव्य केले.

आता आरोलकरांनी बोलता बोलता आपल्या मनातील ही सुप्त इच्छा प्रकट केली खरी. मात्र, आग्रा-युपीमधील ताजमहालासारखे हुबेहूब दुसरे ताजमहाल गोव्यात होऊ शकते का? हा मोठा प्रश्न! परंतु राजकीय नेतेमंडळींनी ठरविल्यास ते अशक्य नाही असेच मानून चालावे लागेल!

मडगावचा मास्टर प्लॅन

मडगावच्या नियोजनबद्ध विकासासाठी अन्य दोन शहरांबरोबरच मडगावच्या विकासाचा मास्टर प्लॅन तयार केला जाणार असल्याचे पिल्लू आमदार दिगंबर कामत यांनी सोडले आहे, पण त्यांच्या या घोषणेबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.

काहींना प्रश्न पडला आहे तो या प्लॅनला इतकी वर्षे का लागली हा, तर अन्य काहीजण असा प्लॅन तयार करण्यास आता वाव राहिला आहे का असे विचारतात. आणखी एकाने तर स्वतः कामत मुख्यमंत्री असताना मुंबईतील पसरीचा या आयपीएस अधिकाऱ्याने मडगावच्या वाहतुकीचा मास्टर प्लॅन सादर केला होता त्याचे काय झाले असा सवाल करताना मडगावसाठी असे आराखडे निरुपयोगी आहेत अशी मल्लिनाथी केली आहे.

दांडेवाडो रंबलरची कथा

रस्त्यावर खड्डे पडले तरी शिव्या व रस्ते हॉटमिक्स केल्यावर वाहने भरधाव जाऊन अपघात होऊ लागले तरी शिव्या. हे प्रकार नेहमीचे झाले आहेत. पण वेळ्ळी मतदारसंघातील दांडेवाडोची कथा वेगळीच आहे. तेथून राष्ट्रीय महामार्ग जातो.

तेथील पाच रस्ते एकत्र येत असलेल्या नाक्यावर अपघात होऊ लागल्यावर लोकांच्या मागणीवरून सरकारी यंत्रणेने रंबलर धर्तीचे गतिरोधक बसवले, पण तेवढ्याने भागले नाही. आता या रंबलरवरून अवजड वाहने भरधाव जातात व त्यामुळे रात्रीच्यावेळी भयानक आवाज होतात व झोपमोड होते अशा तक्रारी त्यांनी एकत्र येऊन केल्या आहेत. यामुळे या यंत्रणेची पंचाईत झाली आहे.

Govind Gawade
Goa Police: वकील मारहाण प्रकरण! खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी चार पोलिसांवर गुन्हा दाखल

काँग्रेसवाले एरवी असतात कुठे?

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 11 डिसेंबरला गोव्यात येत आहेत. यानिमित्ताने भाजपने कंबर कसली असून कार्यकर्त्यांच्या जमवाजमवीपासून विविध कार्यक्रमांचे भव्य-दिव्य आयोजन केले आहे. नियोजनात कोणतीही कसर ठेवलेली नाही. या दिवशी पंतप्रधान अनेक प्रकल्पांचे लोकार्पण करणार आहेत.

यावर काँग्रेस आता आक्रमक झाली असून या प्रकल्पांच्या उदघाटनाची गडबड घाई ही भ्रष्टाचार झाकण्यासाठीच सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मात्र, काँग्रेसचे हे कार्यकर्ते एरवी काय करत असतात? असा प्रश्न सामान्य जनतेमधून विचारला जात आहे. की भाजपच्या मोठ्या कार्यक्रमांनंतरच काँग्रेसवाले जागे होतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

कायदा-सुव्यवस्था कशाशी खातात?

राज्यात मटका जुगार पुन्हा मोठ्या प्रमाणात फोफावला आहे. फोंड्यात तर कोपऱ्या-कोपऱ्यांवर खुलेआम टेबल टाकून, समोर चार्ट लावून मटकावाले ग्राहकांची वाट पाहतात. ग्राहकही हळूच येऊन नंबर लावून निघून जातात.

फोंडा बसस्थानक ते कुर्टी आणि पुढे ढवळीपर्यंत हे मटकावाले बिनधास्तपणे बसलेले दिसतात. एरवी मटक्यावर कायद्याने बंदी आहे, तरीही मटकावाले बिनधास्त धंदा करतात. आता पोलिसच जर मटकावाल्यांना अभय देत असतील तर मग... बोलणेच खुंटले. खरे तर बंदी असलेल्या कोणत्याही गोष्टीमुळे पोलिसांना चिरिमिरी मिळते.

मटक्यातून पोलिसांना मिळणारा हप्ता तर भरभक्कम असतो. आता 13 पगार घेणाऱ्या या लोकांना जर अशाप्रकारे चिरिमिरी मिळत असेल, तर मग कायदा आणि सुव्यवस्था खुंटीला टांगून ठेवलेलीच बरी, असे आम्ही नव्हे, सुज्ञ नागरिकच बोलत आहेत.

कोणाचे खरे? कोणाचे खोटे?

मडगाव ते काणकोण चारपदरी रस्त्याला नेमकी किती वर्षे लागणार ही चर्चा आज लोकोत्सवाच्या मंडपात सुरू झाली. सूत्रसंचालक प्रसाद पागी यांनी येणाऱ्या लोकोत्सवापूर्वी मडगाव चाररस्ता चारपदरी रस्ता वाहतुकीसाठी सुरू व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली.

मात्र, मुख्यमंत्र्यांनी दोन वर्षे लागणार असे सांगताच सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी हातवारे करून चार वर्षे लागतील याचे संकेत दिले. ‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌त्यामुळे कोणाचे नियोजन खरे याबाबत जोरदार चर्चा लोकोत्सवाच्या मंडपात सुरू झाली.

Govind Gawade
Goa International Airport: सगळे प्रकल्प उत्तरेतच? 'खरी कुजबूज'

जोसेफबाब ‘देर आये दुरुस्त आये’

ध्वनिप्रदूषण रोखण्यासंबंधी उच्च न्यायालयाने आदेश दिल्याने राज्यातील दक्षिण तसेच उत्तर गोवा जिल्ह्यातील किनारी भागांत हॉटेल्स, रेस्टॉरंट्स तसेच रिसॉर्ट व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे. याच संधीत हात धुवून घेण्याचा विचार कळंगुटचे सरपंच जोसेफ सिक्वेरा यांनीही केला असावा.

म्हणूनच की काय, त्यांनी बेकायदा डान्स बारविरोधात कधी नव्हे, इतकी जबरदस्त धडक मोहीम सुरू केली आहे. सोमवारी रात्री त्यांनी दोन डान्सबारना सील ठोकले. पर्यटनाच्या नावाखाली किनारी भागात परप्रांतीय व्यावसायिकांनी अवैध धंदे, मसाज पार्लर्स, डान्स बार सुरू केल्याने पर्यटनाचा मूळ उद्देश आणि किनाऱ्यावरील शांतता लोप पावल्याचे त्यांच्या लक्षात आल्याचे बोलले जात आहे.

सिक्वेरा यांनी याआधीच अशी धडक भूमिका घेऊन कार्यवाही करायला हवी होती. पण ‘देर आये दुरुस्त आये’, असाही सूर ध्वनिप्रदूषण आणि अन्य उपद्रवाने त्रस्त स्थानिकांतून आळवला जात आहे.

पाटीवरील नावाचे प्रेम..?

मंगळवारी म्हापशातील दोन विकास प्रकल्पांचे उद्‍घाटन सत्ताधारी गटातील कथित वादामुळे पुढे ढकलावे लागले. याचे एक कारण की, सत्ताधारी नगरसेवकांना कार्यक्रमाची शेवटच्या क्षणी माहिती देण्यात आली, तर दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे प्रकल्पाच्या पाटीवर संबंधित नगरसेवकांच्या नावांना स्थान न देणे.

त्यामुळे हे नगरसेवक वैफल्यग्रस्त झाले! त्यामुळे संबंधितांनी कार्यक्रमस्थळी बहिष्कार घालण्याची तयारी ठेवली होती. हा वाद विकोपाला जाऊ नये म्हणून शेवटी हे दोन्ही कार्यक्रम रद्द करीत नवीन तारीख जाहीर करणार असे पालिकेकडून सांगण्यात आले.

आता प्रकल्पांच्या पाटीवर सर्वांची नावे लिहायला लागल्यास ती पाटी किती मोठी होईल! मुळात पाटीवर आमदार, नगराध्यक्ष व स्थानिक नगरसेवकांची नावे असतात, परंतु सरसकट सर्वच नगरसेवकांची नावे लिहिणे म्हणजे हे जरा जास्तच झाले नसते का? त्यामुळे येणाऱ्या काळात या पाटीवर सर्वांची नावे येतात की नाही हे पाहावे लागेल!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com