Goa News: पणजीतील कर वसुली आज गुरुवारपासून सुरू होणार असून महिन्याला 2 कोटी वसूल केले जाणार आहेत. एकूण 54 कोटी घरपट्टी वसूल व्हायची आहे. त्यात बँक दुकाने कार्यालये आदी व्यावसायिक आस्थापनांची थकबाकी 11 कोटी आहे.
या व्यावसायिक आस्थापनांच्या वसुलीपासून मोहीम सुरू होईल, अशी माहिती पणजीचे महापौर रोहित मोन्सेरात यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. महापालिका मंडळाच्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेवेळी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले, मार्केट प्रकल्पातील अस्थापनांशी करार करण्याचा विषय अजून पडून आहे. हा लीज कराराचा मसुदा तयार असून तो सरकारकडे मान्यतेसाठी पाठवण्यात येणार आहे. हा करार 30 वर्षांसाठी असेल व करारावर सही करण्यापूर्वी सर्व दुकानदारांना विश्वासात घेतले जाईल. इतकी वर्षे कर वसुली का झाली नाही, असे त्यांना विचारले असता लोक कर भरण्यास टाळाटाळ करतात, असा आरोप त्यांनी केला.
कर वसुलीसाठी वेगवेगळे गट करण्यात आले आहेत, प्रत्येक गटात 6 कर्मचारी असतील, असे सांगताना घरोघरी फिरून घरपट्टी गोळा केली जाईल, यावेळी पालिकेने कडक पवित्रा घेण्याचे ठरवले आहे, असेही ते म्हणाले.
मिरामार येथील प्रमुख भाग, काकुलो आयलंड, बाजार परिसर या ठिकाणी पे पार्किंग व्यवस्था असेल, असे सांगताना सकाळी साडे आठ पूर्वी मात्र पार्किंग फी नसेल, असे त्यांनी सांगितले. कचरा गोळा करण्यावर इतर पालिकांनी ज्याप्रमाणे फी लावली आहे, त्याच पद्धतीने महापालिकेने वेगळा कर आकारावा का यावरही या बैठकीत चर्चा झाली.
शहरातील वाहनांच्या वेगावर नियंत्रण आणणे आवश्यक असल्याचा मुद्दा अनेकांनी मांडला. सिग्नल झेब्राक्रॉसिंगची मागणीही अनेकांनी बैठकीत केली. मासळी मार्केटच्या इमारतीची तपासणी अभियांत्रिकी महाविद्यालयाकरवी करवी करण्याचा निर्णय झाला. त्यानंतर ती इमारत पाडण्याचा ठरणार असल्याचे ते म्हणाले.
मळ्यातील विकास कामाचाही या बैठकीत आढावा घेण्यात आला. मार्केट प्रकल्पात पंखे बसवण्याचा प्रस्ताव कुठे रखडला यावर चर्चा झाली. फक्त पाच पंखे बसवण्यात आले आहेत एकूण 20 पंख्यांची मागणी केली होती, असा मुद्दा उपस्थित करून बैठकीत नगरसेवक सुरेंद्र फुर्तादो यांनी महापौरांना धारेवर धरले.
महापालिकेच्या शेजारी असलेली बीएसएनएल इमारत पाडून 60 कोटींचा नवा प्रकल्प बांधण्यास यापूर्वीच मंडळाची मंजुरी घेण्यात आली असली तरी जुनी इमारत पाडण्यास मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली.
बहुउद्देशीय इमारत
चर्च स्क्वेअर मधील हॉटेल राजधानी समोरील पालिकेची जुनी इमारत आजपासून पाडण्यास सुरुवात होणार आहे. या ठिकाणी आता 6 मजली बहुउद्देशीय इमारत 3 वर्षाच्या आत तयार होणार आहे.
भाडेकरू जेवढ्या लवकर इमारत खाली करतील तेवढ्या लवकर प्रकल्प पूर्ण होणार असल्याचे महापौर रोहित मोन्सेरात यांचे म्हणणे आहे. 1973 मध्ये ही इमारत बांधण्यात आली होती. नव्या इमारतीचा तळमजला वाहन पार्किंगसाठी ठेवण्यात येणार आहे. या अल्ट्रामॉडर्न प्रकल्पामुळे चर्च स्क्वेअरची शान वाढणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.