Panjim: सांतईनेज-पणजी येथील पणजी महानगरपालिकेतर्फे अलीकडेच बांधून पूर्ण केलेल्या ‘मोक्ष’ या हिंदू स्मशानभूमी, खोजा आणि सुन्नी मुस्लीम व लिंगायत यांच्यासाठी उभारलेली दफनभूमी अशा प्रकल्पांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर लक्ष वेधून घेतले आहे. या प्रकल्पाची माहिती स्थापत्यकला शास्त्रास वाहिलेल्या आर्कडेली या प्रतिष्ठित वेबसाईटवर देण्यात आली आहे.
स्थापत्य कलेतील जगातील नावीन्यपूर्ण तथा सृजनशील कलाकृतींना या वेबसाईटवर प्रसिध्दी देण्यात येते. या प्रकल्पाची रचना (डिझाईन) ओल्ड गोवा येथे स्थित राहुल देशपांडे अँड असोसिएट्स या आस्थापनाने केली आहे.
तत्कालीन विरोधी पक्षनेते तथा दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी 2011 साली या प्रकल्पासाठी प्रथम पुढाकार घेतला होता. फेब्रुवारी 2021 मध्ये गोवा राज्य शहर विकास यंत्रणा तथा जीसुडाने 8.82 कोटी रुपये खर्चून त्याची पूर्तता केली.
राहुल देशपांडे हे अमेरिकेत शिक्षण घेतलेले स्ट्रक्चरल डिझायनर आहेत आणि त्यांच्या नावावर अनेक पुरस्कार आहेत. ईडीसी पाटो प्लाझाचा फेरविकास मंगेशी मंदिर, ताळगाव कम्युनिटी हॉल आणि शिरोडा बस स्थानक ही काही त्यांची अन्य लक्षवेधी कामे आहेत.
तसेच, या संपूर्ण प्रकल्पाच्या डिझाईनची आर्कडेलीने प्रशंसा केली असून त्याचे वर्णन ‘आगळे वेगळे’ अशा शब्दांत केले आहे. एकूण चार धर्मियांसाठी एका ठिकाणी अशी सुविधा निर्माण करणारे हे अनोखे असे डिझाईन असल्याने हा प्रकल्प आगळ्या स्थापत्यवैशिष्ट्याचा ठरला आहे. या डिझाईनमुळे या सर्व समाजांना एक ओळख आणि व्यक्तिमत्त्व प्रदान केले आहे, अशी टिप्पणी करण्यात आली आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.