Goa Politics News: बाबू आजगावकर अजूनही उपमुख्यमंत्री? 'खरी कुजबुज'

बाबू आजगावकर यांना भाजप सरकारने नियुक्त उपमुख्यमंत्री केले की काय अशी लोकांमध्ये चर्चा सुरू झाली
Manohar Ajgaonkar |Goa News
Manohar Ajgaonkar |Goa NewsDainik Gomantak

Goa Politics News: पेडणे मतदारसंघातून भाजपचे आमदार म्हणून प्रवीण आर्लेकर हे निवडून आल्यानंतर त्यांनी आपले कार्यालय मालपे येथे खुले केले. मात्र, बाबू आजगावकर हे मागच्या सरकारात उपमुख्यमंत्री होते.

त्यांचे कार्यालय पेडणे येथे होते, ते कार्यालय बंद असले तरीही जो फलक त्या कार्यालयावर लावला होता, तो अद्याप तसाच आहे. त्यावर ‘श्री. मनोहर (बाबू)आजगावकर, उपमुख्यमंत्री, गोवा सरकार’ असे लिहिले आहे. त्यामुळे बाबू आजगावकर यांना भाजप सरकारने नियुक्त उपमुख्यमंत्री केले की काय अशी लोकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे.

आयआयटीबाबत अनिश्चितता

आयआयटीबाबत गोवा सरकारची सध्या व्दिधा अवस्था झालेली आहे. सांगेत जमिनीबाबत जी समस्या तयार झाली आहे ती सुटेल असे जरी मंत्री सुभाष फळदेसाई सांगत असले, तरी त्यांच्या बोलण्यात पूर्वीचा जोष राहिलेला नाही.

दुसरीकडे मडकई व अन्य काही पर्याय काही आमदारांनी सुचविलेले असले, तरी ते व्यवहार्य नाहीत. त्यामुळे विशेषतः मुख्यमंत्री सरकारी मालकीची जमीन अन्यत्र कुठे उपलब्ध होऊ शकेल का हे पडताळून पाहू लागले आहेत. त्यामुळे यापूर्वीच्या काही जागांचा विचार होऊ शकतो असे संकेत मिळत आहेत.

इमानदार अधिकाऱ्यांमुळे लाज वाचली

यावेळी इफ्फीचे वेळापत्रक जाहीर करून नंतर बदलावे लागले. चित्रपट महोत्सव संचालनालय मोडीत काढून ते एनएफडीसीकडे सोपवले आहे. त्यामुळे चित्रपट हातात न येताच अंदाजाने किंवा अति आत्मविश्‍वासाने वेळापत्रक जाहीर करण्यात आले.

त्यामुळे तेथे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना वेळापत्रक अचूक बनविताना नाकीनऊ आले. तरी इफ्फीला काळिमा लागला नाही. प्रेक्षकांची गैरसोय झाली नाही. यावेळी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चित्रपट चांगले होते. प्रेक्षकसुद्धा आहेत. काही मोजक्या इमानदार अधिकाऱ्यांमुळे इफ्फीची लाज वाचली!

विकेट कोणाची जाणार?

सत्ता टिकविण्यासाठी व सत्ता मजबूत करण्यासाठी सत्ताधाऱ्यांना अनेकांना जुळवून घ्यावे लागते. एकाला खूष करण्यासाठी दुसऱ्याचा बळी द्यावा लागतो. भाजपाने काँग्रेस मुक्त गोवा करण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी काँग्रेसचे आठ आमदार फोडले. त्यातील दोघांना मंत्री व काहीजणांना महामंडळे देण्याचे वचनही दिले.

Manohar Ajgaonkar |Goa News
P S Sreedharan Pillai: राजकीय पक्षांना देश एकसंघ न ठेवता फोडायचा आहे

आता त्या नव भाजप आमदारांना मंत्री करण्यासाठी कोणाचे मंत्रिपद जाणार ही भीती व धाकधूक सगळ्यांनाच सतावत आहे. गावडेंची खुर्ची जाणार की काब्राल घरी बसणार. सुभाषना हलविणार की निळकंठाचा कंठ सुकणार.

ढवळीकर यांना पुन्हा एकदा धक्का बसणार की बाबा राणेंची बोलती बंद करणार? शंका कुशंका अनेक आहेत. आता विकेट कुणाची उडवायची हे दोतोर प्रमोद दिल्लीत ठरवून येणार. एकाला जागा करून देण्यास दुसऱ्याला ढकलण्याची ही परंपरा किती यशस्वी ठरणार हे येणारा काळच ठरविणार आहे.

पेडण्यातील जनता बाबूंच्या प्रतीक्षेत

बाबू आजगावकर हे मंत्री असताना दर आठवड्याला पेडणे कार्यालयात यायचे. त्यावेळी शेकडो ज्येष्ठ पुरुष, महिला या कार्यालयात बाबूंच्या दरबारात शेवटपर्यंत असायच्या. बाबू त्यांना पाचशे ते हजार रुपये द्यायचे.

त्यातून काहीजण औषध, बाजार घ्यायचे. आजही काही ज्येष्ठ नागरिक या कार्यालयात येतात व आमचे बाबू आले नाहीत का असे विचारतात.

माजी नगरसेवकाला चपराक!

दुसऱ्याचे भले करायला गेलो आणि संकटात सापडलो अशी अवस्था केपे पालिकेचे माजी नगराध्यक्ष राहुल परेरा, तेरेझ यांची झाली आहे. यातून जिवंत असताना कोणताही डाग न लागलेले माजी नगराध्यक्ष दिवंगत मानुएल कुलासोही सुटले नाहीत.

वीस वर्षांपूर्वी जनतेच्या भल्यासाठी या तिघांनी नगरपालिकेचे नगरसेवक या नात्याने अपघातात कारण ठरलेली एक जागा साफ करून रस्ता रुंद केला होता. जमीन मालकाने आपल्या जागेवर अतिक्रमण केल्याचे कारण सांगून न्यायालयात खटला दाखल केला होता.

काही वर्षांनंतर नगरपालिकेने या खटल्यातून अंग काढून घेतल्यामुळे न्यायालयाने तत्कालीन नगराध्यक्ष दिवंगत मानुएल, तत्कालीन उपनगराध्यक्ष राहुल व नगरसेविका तेरेझ यांना दोषी ठरवून तीन लाख साठ हजार रुपयांचा दंड ठोठावला. तेरेझ व राहुल परेरा यांना दंड भरावा लागला. कोणाच्या म्हशी आणि कोण काढतो उठाबशी म्हणतात ते असे.

वेलिंगकर सरांचे फर्मान!

आपण काय खावे, कोणता वेश परिधान करावा, कोणता देव धर्म मानावा याचे स्वातंत्र्य आपल्या देशात आहे. मात्र, ज्या धर्माचे अस्तित्व नष्ट करणाऱ्याला संत, देव मानून भजणे कितपत योग्य? हा प्रश्न धर्म मानणाऱ्यांच्या मनात उपस्थित होणे स्वाभाविक आहे.

Manohar Ajgaonkar |Goa News
Goa Crime News: जमीन महाघोटाळ्याचा सूत्रधार विक्रांत शेट्टी याला पुन्हा अटक

गोंयच्या सायबाने गोव्यातील हिंदूंना वेदना दिल्या म्हणून त्यांना भजणे, त्यांचा सन्मान करणे, जुने गोव्याला फेस्ताला जाणे पाप असल्याचा संदेश देणारा पोस्ट सुभाष वेलिंगकर यांनी समाज माध्यमावर व्हायरल केली आहे.

वेलिंगकर सरांचा ही पोस्ट अनेकांनी शेअरही केली आहे. खरे म्हणजे सेंट झेव्हीयर यांचे फेस्त जवळ आले असून या फेस्तापासून हिंदूंना लांब ठेवण्याचा हा सुभाष सरांचा प्रयत्न कितपत यशस्वी होतो हे पाहावे लागेल. गोंयच्या सायबाचा लौकिक मोठा की सुभाष वेलिंगकर सरांची हिंदू भक्ती मोठी हे तीन डिसेंबरला सिद्ध होणार हे निश्चित.

जिल्हा पंचायतीचे नूतनीकरण

पणजीतील कला अकादमीच्या नूतनीकरणावरून निर्माण झालेला गदारोळ शांत झालेला असला, तरी विरोधक संधी मिळेल तेव्हा कला व संस्कृतीमंत्र्यांची कळ काढताना दिसतात. हल्लीच झालेल्या दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या बैठकीत पुढे आलेल्या कार्यालय नूतनीकरणाचा आहे.

जुन्या जिल्हाधिकारी इमारतीत हे कार्यालय आर्लेम येथून स्थलांतरित केल्यावेळी काही कोटी खर्चून त्याचे नूतनीकरण केले गेले होते. त्यावेळी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सीओ, सीईओ व इतरांसाठी केबिन वगैरे तयार केली गेलेली असताना आता इतक्यात पुन्हा नूतनीकरण कसले करता? की जिल्हा पंचायत निधीचा अशा नूतनीकरणावर खर्च करण्याचा तर इरादा नाही नाही ना?

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com