
पणजी : राज्यात गेल्या आठवडाभर जोरदार पावसाने हजेरी लावली. सततच्या मुसळधार सरींमुळे पाणी वाढले, तर काही भागांत पडझडीच्या घटना घडल्या. मात्र मागील दोन-तीन दिवसांपासून पावसाची तीव्रता काहीशी कमी झाल्याचे चित्र होते.
तरीदेखील पावसाचा धोका कायम असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. बुधवारी राज्यातील काही भागांत पुन्हा मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून, यासाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, मागील २४ तासांत राज्यात सरासरी ७.६ मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली आहे. यंदा आतापर्यंत एकूण २८९६.६ मि.मी., म्हणजेच तब्बल ११४ इंच पाऊस कोसळला आहे.
हा पाऊस सरासरीच्या तुलनेत ६.४ टक्क्यांनी अधिक असल्याचेही स्पष्ट झाले आहे. पावसाचे प्रमाण नेहमीपेक्षा जास्त असल्याने शेतकरी समाधानी असले तरी, मुसळधार पावसामुळे रस्ते, पूल, नाले आणि काही घरांचे नुकसान झाल्याच्या तक्रारी सातत्याने मिळत आहेत.
सांगे तालुक्यानंतर आता धारबांदोडा भागातदेखील पावसाने १५० इंचांचा टप्पा पूर्ण केला आहे. या भागांत अखंड कोसळणाऱ्या सरींमुळे शेतजमीन आणि जंगल परिसर ओलसर झाला असून, नदीकाठच्या भागात पाणीपातळी धोक्याच्या स्थितीत आहे.
स्थानिक प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. विशेषत: नदीकाठी आणि डोंगराळ भागांत राहणाऱ्या नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे निर्देश दिले आहेत.
राज्यातील वाहतूक व्यवस्थेलाही मुसळधार पावसाचा फटका बसत आहे. काही अंतर्गत रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे वाहनचालकांना अडचणी येत आहेत. वीजवाहिन्या तुटणे, झाडे कोसळणे यांसारख्या घटनाही मागील काही दिवसांत नोंदवण्यात आल्या आहेत. त्यामुळे अग्निशामक दल, वीज विभाग आणि स्थानिक प्रशासन तातडीने मदतकार्य सुरू करत आहेत.
हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार, पुढील काही दिवस राज्यात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.