

पणजी: राज्य विधानसभेच्या १६ डिसेंबर रोजी होणाऱ्या एकदिवसीय अधिवेशनातील रणनीतीसंदर्भात विरोधी आमदारांनी सोमवारी विधानसभेत बैठक घेत सरकारवर टीका केली, परंतु या बैठकीला काँग्रेस, गोवा फॉरवर्ड आणि रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्षाचे (आरजी) आमदार उपस्थित राहिले.
आम आदमी पक्षाच्या (आप) आमदारांनी मात्र बैठकीकडे पाठ फिरवली. दरम्यान, एक दिवसाचे हिवाळी अधिवेशन बोलावून सरकारने लोकशाहीची हत्या केली आहे, असा आरोप विरोधी आमदारांनी पत्रकारांशी बोलताना केला.
विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्या कार्यालयात झालेल्या बैठकीला युरींसह काँग्रेस आमदार कार्लुस फेरेरा आणि एल्टन डिकॉस्ता, गोवा फॉरर्वडचे आमदार विजय सरदेसाई आणि आरजीचे आमदार वीरेश बोरकर यांनी उपस्थिती लावली. आपच्या व्हेंझी व्हिएगश आणि क्रूज सिल्वा हे दोन आमदार मात्र बैठकीला अनुपस्थित राहिले. बैठकीची माहिती आपण आपच्या आमदारांना दिलेली होती, असे स्पष्टीकरण आलेमाव यांनी दिले.
‘‘भाजप सरकार भ्रष्ट असून मंत्र्यांचे कारनामे उघड होऊ नयेत, यासाठीच सरकारने एक दिवसाचे अधिवेशन घेतले आहे, परंतु आम्ही विरोधी आमदार जनतेचे शक्य तितके प्रश्न विधानसभेत मांडू’’, असे आमदार वीरेश बोरकर यांनी स्पष्ट केले, तर आमदार विजय सरदेसाई यांनी ‘‘एकदिवसीय अधिवेशन हाच मोठा विनोद आहे’’ असे म्हणत ‘‘सरकारला विकासच हवा असेल, तर चर्चेसाठी सरकार का घाबरत आहे?’’ असा प्रश्न उपस्थित केला.
'कालावधी ठरवण्याचा अधिकार सरकारला'
एकदिवसीय अधिवेशनाबाबत पत्रकारांनी सभापती गणेश गावकर यांना छेडले असता, ‘‘विधानसभा अधिवेशनाचा कालावधी किती असावा? हे ठरवण्याचा अधिकार सरकारला आहे, तर कामकाज सुरळीतपणे पार पाडणे ही माझी जबाबदारी आहे’’, असे त्यांनी स्पष्ट केले.
एकाच दिवसात सर्व विभागांशी संबंधित प्रश्न मांडले जाणार असलेले हे अधिवेशन अभूतपूर्व असून ही लोकशाहीची हत्या आहे. इतिहासात प्रथमच असे घडत आहे.
- युरी आलेमाव, विरोधी पक्षनेते
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.