

पणजी/म्हापसा: हडफडे येथील ‘बर्च बाय रोमिओ लेन’ नाइट क्लबमध्ये लागलेल्या भीषण आगीत २५ जणांचा बळी गेल्यानंतर, क्लबचे मुख्य जबाबदार मालक सौरभ लुथरा आणि त्याचा भाऊ गौरव लुथरा हे दोघेही फुकेतला (थायलंड) पळून गेल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. गोवा पोलिसांनी दोघांविरुद्ध लूक-आउट नोटीस जारी केली आहे.
या संशयितांना पकडण्यासाठी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानावर छापा टाकण्यात आला; पण त्यांनी आधीच भारत सोडल्याची माहिती सूत्रांनी दिली. पोलिसांनी दिल्लीतून क्लब कर्मचारी भरत कोहली या पाचव्या संशयिताला अटक केली. दुसरीकडे, राज्य सरकारने न्यायिक चौकशीसाठी उत्तर गोव्याचे जिल्हा दंडाधिकारी अंकित शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे.
या समितीत दक्षिण गोवा जिल्हा पोलिस अधीक्षक टिकमसिंह वर्मा, न्यायवैद्यक संचालक आशुतोष आपटे आणि अग्नीशमन उपसंचालक राजेंद्र हळदणकर यांचा समावेश आहे. समितीने आज घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
समितीला कोणत्याही खात्याकडून संबंधित दस्तावेज मागवण्याचे व चौकशीसाठी कोणालाही बोलावण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. दुर्घटनेपूर्वीचा घटनाक्रम ठरवणे, क्लबला सर्व परवाने होते का याची शहानिशा करणे, या घटनेची जबाबदारी निश्चित करणे यासाठी समितीला आठवडाभराचा कालावधी देण्यात आला आहे.
जखमींची प्रकृती स्थिर; एकाला डिस्चार्ज
आगीत भाजलेल्या व उपचारांसाठी दाखल करण्यात आलेल्या सर्व पाचही रुग्णांची प्रकृती स्थिर असून, त्यांच्यावर प्लास्टिक सर्जरी विभागात उपचार सुरू आहेत. हे पाचही जण १२ ते १५ टक्क्यांपर्यंत भाजले आहे. एकाला आज इस्पितळातून घरी पाठवण्यात आले.
उर्वरितांना पुढील सात दिवसांत त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता डॉक्टरांकडून वर्तवण्यात आली आहे. यामध्ये, गोव्याबाहेरील दोन कामगार आणि दोन पर्यटकांचा समावेश आहे. प्रशासनाने सर्व जखमींना योग्य वैद्यकीय उपचार पुरवण्याची व्यवस्था केली आहे. उत्तरीय तपासणीनंतर १६ मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.
क्लबचा कर्मचारी अटकेत; गोव्यात नेऊन चौकशी
प्रकरणातील तपास अधिक तीव्र करताना पोलिसांनी क्लबमधील कर्मचारी भरत कोहलीला ताब्यात घेतले. दिल्लीतील सब्जी मंडी परिसरातील रहिवासी असलेल्या कोहलीचे नाव क्लब मॅनेजरच्या चौकशीदरम्यान समोर आले. त्याला पुढील चौकशीसाठी गोव्यात आणण्यात आले आहे.
क्लब मालकाचा ‘सोशल’ संदेश
सौरभ लुथरांकडून सोशल मीडियावर शोकप्रकटीकरण करण्यात आले आहे. लुथरांनी सोशल मीडियावर ‘मनःपूर्वक दु:ख’ व्यक्त करणारा संदेश पोस्ट केला. या दुर्दैवी घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल व्यवस्थापन अत्यंत व्यथित असून पीडितांच्या कुटुंबियांना शक्य त्या सर्व प्रकारची मदत करण्यास सिद्ध आहे, असे त्यांनी इन्स्टाग्रामवर म्हटले आहे.
‘इंटरपोल’ शी समन्वय
लुथरा बंधू रविवारी, ७ डिसेंबर रोजी, पहाटे ५. ३० वा. दुर्घटनेनंतर लगेच ६-ई १०७३ या विमानाने फुकेतला गेले होते. गोवा पोलिस पथके दिल्लीला संशयितांच्या घरी गेली होती. दोघांच्या अटकेसाठी इंटरपोल विभागाशी समन्वय साधण्यात आला आहे.
प्रशासनला जाग; अधिसूचना जारी
भीषण आगीत २५ जणांचा मृत्यू झाल्याच्या धक्कादायक घटनेनंतर गोवा राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने राज्यातील नाइटक्लब, रेस्टॉरंट, बार, कार्यक्रम स्थळे व तत्सम व्यावसायिक आस्थापनांसाठी कडक नियमांची अधिसूचना जारी केली आहे.
आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील कलम २२(२)(ह), २२(२)(ई) आणि २४ नुसार बंधनकारक अंमलबजावणीचे निर्देश देण्यात आले आहेत.
प्राधिकरणाने सर्व आस्थापनांना अग्निसुरक्षा, विद्युत सुरक्षितता, आपत्कालीन तयारी आणि संरचनात्मक सुरक्षिततेसंबंधी सक्षम अधिकाऱ्यांनी ठरवलेल्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश दिले आहेत. या मार्गदर्शक तत्त्वांच्या अंमलबजावणीसाठी संबंधित विभाग तातडीने तपासण्या सुरू करण्याची शक्यता आहे.
नियमांचे उल्लंघन झाल्यास कडक पावले उचलली जातील. अलीकडील दुर्घटनेनंतर प्रशासनाने सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करणाऱ्या आस्थापनांविरुद्ध शून्य सहिष्णुतेची भूमिका घेतली असून, नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले जात असल्याचे मुख्य सचिव डॉ. व्ही कंदवेलू यांनी स्पष्ट केले आहे.
निलंबित अधिकाऱ्यांनी चौकशीकडे फिरवली पाठ
या प्रकरणी निलंबित केलेल्या तत्कालीन पंचायत संचालक सिद्धी हळर्णकर, तत्कालीन गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सदस्य सचिव डॉ. शमिला मोंतेरो आणि तत्कालीन पंचायत सचिव रमेश बागकर यांनी आज हणजुणे पोलिसांच्या चौकशीकडे पाठ फिरवली.
तर मी ठिय्या आंदोलन करणार : लोबो
या क्लबला भ्रष्टाचाराशिवाय परवाने मिळाले यावर कोणी विश्वास ठेवणार नाही. जबाबदार कोण हे पुढे आलेच पाहिजे. अन्यथा मी उत्तर गोवा पोलिस अधीक्षक कार्यालयात ठिय्या आंदोलन करीन. माझ्या मतदारसंघात एवढी घटना घडल्यानंतर सत्य जाणून घेण्याचा मला अधिकार आहे, असे कळंगुटचे आमदार मायकल लाेबो यांनी म्हटले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.