

म्हापसा: गोव्यातील हडफडे येथील नाईट क्लबमध्ये आग लागून २३ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. रोमिओ लेनमध्ये असलेल्या रेस्टॉरंट कम् क्लब ब्रीचमध्ये रात्री बाराच्या सुमारास ही घटना घडली. मृतांमध्ये पर्यटकांची संख्या अधिक असल्याची माहिती समोर आली असून, मृतांची संख्या वाढण्याची भीती वर्तवली जात आहे.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी घटनास्थळी भेट देत घटना आणि मदत कार्याचा आढावा घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा करुन घटनेचा माहिती घेतली.
पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून या घटनेत मृत झालेल्यांच्या कुटुंबीयांना दोन लाख रुपये तर जखमींना ५० हजार रुपयांचा मदत देण्याची घोषणा पंतप्रधान कार्यालयाच्या वतीने करण्यात आली आहे.
रात्रीच्या सुमारास घडलेल्या या घटनेत २३ जणांचा मृत्यू झाला आहे. यात २० पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे. गोवा सरकाकडून या घटनेचा सखोल तपास करुन, दोषींना तुरुंगात डांबण्याची हमी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली.
सावंत यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा आढावा घेतला. तसेच, यातील मृतांच्या प्रती सहवेदना व्यक्त केल्या तसेच, जखमींना आवश्यक सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. राज्यात पहिल्यांदाच एवढी मोठी घटना घडल्याचेही त्यांनी नमूद केले.
“घटनेची माहिती मिळताच गोवा पोलिस, अग्निशामक दलाचे बंब, रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशामक दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले असून, मृतांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.
याप्रकरणाचा सखोल तपास करुन यात दोषी असणाऱ्या विरोधात कठोर कारवाई केली जाईल”, अशी माहिती राज्याचे पोलिस महासंचालक आलोक कुमार यांनी दिली आहे.
आगीच्या घटनेमुळे अस्वस्थ झाल्याचे मत कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी व्यक्त केले आहे. एकूण २३ जणांचा या घटनेत मृत्यू झाला असून, यात काही पर्यटक तर प्रामुख्याने स्थानिकांचा समावेश आहे.
अनेकजण याठिकाणी काम करत होते. राज्यातील इतर क्लबचे सेफ्टी ऑडिट करण्याची गरज असल्याचे लोबो म्हणाले. अशा घटना पुन्हा घडल्या नाही पाहिजेत, पर्यटक आणि कामगारांची सुरक्षा महत्वाची असल्याचे लोबो यांनी नमूद केले.
देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देखील या घटनेमुळे दु:ख झाल्याचे म्हटले आहे. मृतांच्या कुटुंबीयांप्रती मुर्मू यांनी सहवेदना व्यक्त केल्या आहेत.
दरम्यान, रात्रीच्या सुमारास ब्रीर्च रेस्टॉरंट कम क्लबमधून मोठा धमाका झाल्याचा आवाज ऐकू आल्याचे येथील स्थानिक आणि सुरक्षा रक्षकांनी सांगितले. कदाचित सिलिंडरचा स्फोट झाला असावा अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली. शॉर्ट सर्किटमुळे देखील ही आग लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.