Goa Murder Case: गोव्यात घडणाऱ्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे राज्यासह देशभरात खळबळ माजत असून धक्कादायक गोष्ट म्हणजे गोव्यात सध्या खुनाच्या मालिकांचे सत्र सुरू झाले आहे. अशाच एका घटनेविषयी माहिती हाती येतेय.
मालिम- बेती जेटीवरून मच्छीमारीसाठी खोल समुद्रात गेलेल्या ओडिशाच्या कामगाराचा खून झाल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी वास्कोतील हर्बर पोलिसांनी अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा नोंद केला आहे.
पद्मलोचन सलीमा (20, रा. ओडिशा) असे या मृत कामगाराचे नाव असून तो 8 जानेवारीच्या रात्रीपासून बोटीवरून बेपत्ता झाला असल्याची माहिती मिळाली आहे.
या घटनेसंबंधी मिळालेल्या माहितीनुसार ‘एस्टेला-II’ नामक IND-GA-01-MM-3487 या क्रमांकाची मच्छीमार बोट 8 जानेवारी रोजी मालिम जेटीवरून खोल समुद्रात मासेमारीसाठी गेली होती. या बोटीवर कामगारांसह 32 खलाशी होते.
या कामगारांपैकी पद्मलोचन सलीमा (20, रा. ओडिशा) त्याच रात्री बोटीवरून गायब झाला आहे, अशी तक्रार बोटीचा मालक इशान डिसोझा यांनी 10 रोजी पर्वरी पोलीस स्थानकात दाखल केली होती.
या घटनेला अवघे दोन दिवस उलटाच 12 जानेवारी रोजी या पद्मलोचनचा मृतदेह वास्को किनाऱ्यावर हर्बर पोलीस स्थानकाच्या हद्दीत कुजलेल्या अवस्थेत सापडला.
मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी प्रथम बोटमालक इशान डिसोझा यांना बोलावले. मात्र, ते संबंधित मृतदेह ओळखू शकले नाहीत. त्यामुळे मृतदेह ओळख पटेपर्यंत तो मृतदेह शवागारात ठेवून पोलिसांनी बेपत्ता कामगाराच्या वडिलांना बोलावणे पाठवले.
पद्मलोचनचे वडील आल्यानंतर त्यांनी मृतदेहाच्या पायावरील जन्मखुणेवरून तो मृतदेह बेपत्ता पद्मलोचन याचाच असल्याचे सांगितले.
ओळख पटल्यानंतर मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आलीत्याच्या मिळालेल्या अहवालावरून पद्मलोचनच्या छातीवर जोरदार प्रहार झाल्याचे आढळून आले आहे. या अहवालावरून वास्को हर्बर पोलिसांनी अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.
गोव्यात 2023 च्या अखेरीस राजवत कुटुंबातील संशयास्पद मृत्यू, 2024 च्या पहिल्याच आठवड्यात सूचना सेठने घेतलेला आपल्या चिमुकल्याचा बळी आणि अगदी काही दिवसांपूर्वीच दीक्षा कटियारचा झालेला दुर्दैवी अंत पाहता गोवा हे गुन्हेगारीचे ठिकाण बनलंय का? प्रश्न आता या निमित्ताने उपस्थित होऊ लागलाय.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.