

मोरजी: मोपा-उगवे-तोरसे परिसरात ‘ओंकार’ हत्तीने पुन्हा एकदा धुमाकूळ घालत नागरिकांच्या चिंतेत भर टाकली आहे. हा हत्ती आलटून-पालटून लोकवस्ती तसेच बागायती क्षेत्रात घुसून मोठ्या प्रमाणावर नुकसान करत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अद्याप ठोस उपाययोजना न झाल्याने संतप्त नागरिकांनी सरकारविरोधात रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे.
या पार्श्वभूमीवर उगवे येथील माऊली मंदिरात शुक्रवार, १७ रोजी सायंकाळी ग्रामस्थ, शेतकरी पंचायत मंडळाची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे.
मागील सहा दिवसांपासून कडशी-मोपा-तोरसे-उगवे असा हत्तीचा वावर सुरू असून, वन खात्याचे अधिकारी व कर्मचारी त्याचा सतत पाठलाग करत आहेत. मात्र, रात्रीच्या वेळी तो अचानक वस्तीमध्ये प्रवेश करून नुकसान करत असल्याने नागरिकांसह वन खात्यालाही मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
सहा महिन्यांपूर्वी सरपंच महाले यांच्या निवासस्थानी दोन वाहनांची तोडफोड केल्यानंतर, १५ एप्रिलच्या मध्यरात्री पुन्हा त्याच परिसरात हत्तीने धुमाकूळ घातला. अधिकाऱ्यांनी त्याला हाकलण्यात यश मिळवले असले, तरी सध्या तो उगवे बांध परिसरात विसावा घेत असल्याचे दिसत आहे.
विशेष म्हणजे, खाण्यानंतर हा हत्ती ३-४ तास सावलीत विश्रांती घेतो आणि नंतर पुन्हा बागायतींचे नुकसान करण्यासाठी सक्रिय होतो. त्याच्या हालचालींवर वन खात्याचे लक्ष असले, तरी तो कधी दिशा बदलतो याचा नेम लागत नाही.
लोकवस्तीत शिरून नासधूस!
मोपाचे सरपंच सुबोध महाले यांनी सांगितले की, ओंकार हत्ती रात्री-अपरात्री लोकवस्तीत शिरून गाड्यांची नासधूस करत आहे. त्यामुळे ग्रामस्थ व शेतकरी भयभीत झाले आहेत. यावर तातडीने कायमस्वरूपी उपाय करणे गरजेचे आहे. यासाठी प्रथम आमदार प्रवीण आर्लेकर यांच्याशी चर्चा करण्यात येणार असून, तोडगा न निघाल्यास पुढील निर्णय ग्रामसभेत घेतला जाईल.
कायमस्वरूपी उपाययोजना करा!
ओंकार हत्तीला महाराष्ट्र-गोवा सीमारेषेवरून एकमेकांकडे ढकलले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून, हत्तीचा फुटबॉल होत असल्याची टीका केली आहे. जर हा हत्ती राष्ट्रीय महामार्गावर आला आणि एखाद्या वेगवान वाहनाशी अपघात झाला, तर मोठा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे सरकारने तातडीने आणि कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी होत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.