
Goa Monsoon Travel: गोवा म्हटलं की डोळ्यासमोर येतात ते किनारे, बीच शॅक्स, किनार्यावरच्या सूर्यास्ताचा आनंद आणि निवांत दुपार, पण लक्षात घ्या ही गोव्याची एकच बाजू नाही. पावसाळा सुरू झाला की, या सागरी राज्याची एक वेगळीच बाजू समोर येते जी शांत, हिरवीगार आणि मनमोहक असते. किनारी भागातील गजबजाट कमी झाल्यावर, गोव्याचे घनदाट हिरवेगार अंतरंग, समृद्ध संस्कृती, स्थानिक बाजारपेठा, मसाल्यांचे मळे, ऐतिहासिक घरे आणि आत्म्याला तृप्त करणारे स्थानिक खाद्य अनुभवण्याची संधी मिळते. पावसाळ्यातील गोवा खरोखरच एक वेगळे जग बनून जातो.
नेत्रावळी (दक्षिण गोवा)
सांगे तालुक्यात वसलेले नेत्रावळी हे गाव गर्दीपासून दूर आहे. शांततेच्या शोधात असलेल्या जोडप्यांसाठी उत्तम ठिकाण म्हणावे लागते. इथले नेत्रावळी वन्यजीव अभयारण्य दाट हिरवळ, पक्ष्यांचे किलबिलाट आणि पानांच्या सळसळीने गजबजलेले असते. प्रसिद्ध बडबुड्यांची तळी बुडबुड्यांनी एक गूढता निर्माण करते. येथे होमस्टे किंवा इको-लॉजमध्ये राहून तुम्ही तंत्रज्ञानापासून दूर राहून निसर्गाच्या शांततेचा अनुभव घेऊ शकता.
दिवर बेट (जुने गोवे)
जुन्या गोव्यातून थोड्याच फेरी राइडने दिवर बेटावर पोहोचता येते. येथील ऐतिहासिक घरे, शांत रस्ते, हिरवीगार शेते आणि स्वागतार्ह स्थानिक लोक यामुळे हे ठिकाण ऑफबीट अनुभव शोधणाऱ्या जोडप्यांसाठी योग्य आहे. विशेषतः पावसाळ्यात, येथील नयनरम्य शेतात सायकल चालवा, मांडवी नदीवर सूर्यास्त अनुभवा किंवा अस्सल ग्रामीण जीवनाचा अनुभव घेण्यासाठी हेरिटेज होमस्टेमध्ये राहा.
तांबडी सुर्ला धबधबा (मोले)
१२ व्या शतकातील तांबडी सुर्ला महादेव मंदिरापासून थोड्याच अंतरावर असलेला हा लपलेला धबधबा शांत जंगल सफरीसाठी योग्य आहे. घनदाट झाडी आणि हिरवळीने वेढलेले हे ठिकाण निसर्गाचे एक वेगळेच रूप दाखवते. पावसाळ्यातील दिवसात शांत सहलीसाठी हे उत्तम ठिकाण आहे.
हरवळे धबधबा (साखळी )
हरवळे धबधबा त्याच्या रुंद घोड्याच्या नालेच्या आकाराच्या प्रवाहासाठी आणि नयनरम्य परिसरासाठी प्रसिद्ध आहे. जवळच रुद्रेश्वर मंदिर आणि हरवळ्याच्या गुहा आहेत. त्यामुळे प्राचीन शिळा,तुडुंब वाहणारा धबधबा आणि शांत मंदिराचा अनुभव इथे घेता येतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.