
Mollem Travel Guide: मोले म्हटलं की डोळ्यासमोर उभा राहतो घनदाट हिरवागार निसर्ग, उंच डोंगर आणि खळखळणारे धबधबे. गोव्याच्या गजबजाटापासून दूर, मोले गाव आणि त्याच्या आसपासचा परिसर पर्यटकांसाठी एक अद्भुत अनुभव घेऊन येतो. इथं निसर्गाची मुक्त उधळण पाहायला मिळते, जिथे प्रसिद्ध दूधसागर धबधब्यापासून ते भगवान महावीर वन्यजीव अभयारण्यापर्यंत अनेक विस्मयकारक गोष्टी आहेत. मोलेची ही सफर म्हणजे केवळ पर्यटन नाही, तर निसर्गाच्या अंतरंगात डोकावणं आहे. सध्या गोव्यात पाऊस सुरु होणार आहे आणि अशा स्थितीत जर का एखाद्या सुंदर जागेला भेट द्यायची असेल तर मोले हा पर्याय सर्वोत्तम ठरतो.
मोले राष्ट्रीय उद्यान आणि भगवान महावीर वन्यजीव अभयारण्य:
मोले राष्ट्रीय उद्यान आणि भगवान महावीर वन्यजीव अभयारण्य हे इथले प्रमुख आकर्षण. इथं जीप सफारीचा अनुभव घेणं म्हणजे रोमांचक आणि माहितीपूर्ण प्रवास असतो. या सफारीमध्ये बिबट्या, वाघ आणि रानगवा यांसारख्या वन्यजीवांना पाहण्याची संधी मिळते. केवळ मोठे प्राणीच नव्हे, तर विविध प्रकारचे पक्षी, ज्यात स्थलांतरित पक्ष्यांचाही समावेश असतो, त्यांचं दर्शनही इथे घडतं. अभयारण्यातील हिरवीगार वनराई आणि विविध वनस्पतींचे सौंदर्य डोळ्यांना तृप्त करतं. ट्रेकिंगसाठीही हे उत्तम ठिकाण आहे.
दूधसागर धबधबा: (Dudhsagar Waterfall Goa)
दूधसागर धबधब्यापर्यंत पोहोचण्याचा प्रवास जीप सफारीने अधिक आनंददायी होतो. भारतातील सर्वात उंच धबधब्यांपैकी एक असलेला दूधसागर आपल्या नावाप्रमाणेच दुधासारखा फेसाळत खाली येतो. या धबधब्याचे विहंगम दृश्य अक्षरशः चित्तथरारक असतं.
धबधब्याच्या थंडगार पाण्यात डुबकी घेण्याचा अनुभव तर अविस्मरणीय असतो. निसर्गाच्या या अद्भुत सौंदर्याला कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी इथे अनेक उत्तम जागा देखील उपल्बध आहेत.
मसाल्याच्या बागा:
मोलेच्या आसपास मसाल्याच्या अनेक सुंदर बागा आहेत. या बागांना भेट देणं म्हणजे गोव्याच्या कृषी संस्कृती आणि विविध मसाले व फळांच्या लागवडीबद्दल माहिती मिळवणं. काळी मिरी, वेलची आणि लवंग यांसारख्या मसाल्यांचा सुगंध वातावरणात दरवळत असतो. इथे स्थानिक पातळीवर तयार झालेले पदार्थ आणि गोव्याच्या पारंपरिक चवींचा अनुभव घेता येतो. मोलेच्या जवळ असलेले केरी गाव आपल्या नैसर्गिक सौंदर्य आणि मसाल्याच्या बागांसाठी ओळखले जाते. या गावाला भेट दिल्यावर गोव्याची पारंपरिक जीवनशैली, संस्कृती, खाद्यपदार्थ आणि स्थानिक कला यांचा अनुभव घेता येतो. इथले सी-फूड आणि गोड पदार्थ नक्कीच चाखण्यासारखे आहेत.
मोलेच्या जवळ असलेले तांबडी सुर्ला मंदिर हे ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण आहे. याशिवाय, साळावली धरण हे बोटिंग आणि शांत वातावरणाचा आनंद घेण्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे. निसर्गरम्य ठिकाणी जेवणाचा आनंद घेणं किंवा स्थानिक रेस्टॉरंटमध्ये गोव्याच्या पारंपरिक पदार्थांची चव घेणं हा अनुभवही खास असतो.
वाहतूक: मोले राष्ट्रीय उद्यानात धबधब्यांपर्यंत आणि इतर ठिकाणी जाण्यासाठी जीप सफारीचा वापर करणं सोयीचं असतं.
प्रवेश शुल्क: भगवान महावीर वन्यजीव अभयारण्यात प्रवेश करण्यासाठी शुल्क लागू केले जातात.
भेट देण्यासाठी उत्तम काळ: मोले या गावाला भेट देण्यासाठी कोरड्या हवामानाचा काळ (नोव्हेंबर ते मे) सर्वोत्तम असतो, कारण या काळात हवामान सुखद असतं आणि वन्यजीव सहज दिसू शकतात, मात्र पावसाच्या काळात दूधसागर बघता येतो, फक्त पाऊस अधिक नाही ना याची काळजी घ्यावी लागते.
टूर पॅकेजेस: मोले राष्ट्रीय उद्यान आणि दूधसागर धबधब्याच्या सफारीसाठी अनेक टूर पॅकेजेस उपलब्ध आहेत, ज्यात मसाल्याच्या बागा आणि गावाची सफर देखील समाविष्ट असते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.