Accident On Banastarim Bridge: मेघनाला वाचवण्यासाठी पोलिसांची ‘सेटिंग’? कारवाईत चालढकल होत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप

जामीन अर्जामुळे कोर्टाकडून तूर्त अटकेला मज्जाव
Mardol Police Station
Mardol Police Station Dainik Gomantak

Major Accident On Banastarim Bridge बाणस्तारी अपघातप्रकरणी बुधवारी परेश सावर्डेकर याची पत्नी मेघना हिचा जामीन अर्ज फोंडा उपजिल्हा सत्र न्यायालयात आल्यानंतर पुढील सुनावणीपर्यंत तिला अटक करू नये, असा आदेश न्यायालयाने दिला.

तिच्या जामीन अर्जावर 16 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. त्यामुळे मेघनाला वेळ मिळावा यासाठीच पोलिसांकडून अटक करण्यासाठी चालढकल केली गेली, असा आरोप दिवाडीवासीयांनी केला. मात्र, जोपर्यंत फडते कुटुंबीयांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत लढा देऊ, असा इशाराही जमावाने बुधवारी दिला.

बाणस्तारी येथील अपघातप्रकरणी मृतांना न्याय मिळावा, या मागणीसाठी मंगळवारपासून झटणाऱ्या दिवाडीवासीयांना, पोलिसांनी मेघनाला बुधवारी अटक करू, अशी ग्वाही दिली होती. मात्र, तत्पूर्वीच तिने न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला.

त्यामुळे फोंडा अतिरिक्त सत्र न्यायालयाने तिला अटक न करण्याचा आदेश देत तिच्या अर्जावरील सुनावणी 16 ऑगस्टपर्यंत तहकूब केली. त्यामुळे तिला दिलासा मिळाला; परंतु दिवाडीवासीयांच्या जखमेेवर मीठ चोळले गेले आहे. मात्र, परेश सावर्डेकर याच्या रिमांडमध्ये पाच दिवसांची वाढ केली आहे.

बाणस्तारी येथील भीषण अपघातातील संशयित आरोपी परेश सावर्डेकर याला आज (बुधवारी) फोंड्याच्या प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर उभे केले असता पाच दिवसांचा रिमांड देण्यात आला, तर परेशची पत्नी मेघना हिने फोंडा उपजिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला.

मंगळवारी दिवाडीवासीय तसेच लगतच्या भागातील नागरिकांनी म्हार्दोळ पोलिस स्थानकावर मोर्चा नेऊन मेघनाला अटक करण्याची जोरदार मागणी केली होती. त्यावेळी मेघनाला बुधवारी अटक करण्यात येईल, असे आश्‍वासन पोलिसांनी दिले होते. मात्र, त्यापूर्वीच तिला न्यायालयाकडून दिलासा मिळाला.

Mardol Police Station
Goa Petrol Diesel Price: गोव्यातील पेट्रोल-डीझेलच्या प्रतीलीटर दरांमध्ये बदल; जाणून घ्या आजच्या किंमती

मेघनाला अटक करावी या मागणीसाठी बुधवारी सकाळी दिवाडी तसेच इतर भागातील काही नागरिकांनी म्हार्दोळ पोलिस स्थानकासमोर धरणे धरले. यावेळी मृत फडते दाम्पत्यांचे नातेवाईक तसेच ‘तृणमूल’चे नेते समील वळवईकर, सामाजिक कार्यकर्ते मारियानो फेर्राव आणि इतर उपस्थित होते.

बुधवारी सकाळी मेघना सावर्डेकर हिला अटक करण्यात येईल, असे पोलिस उपअधीक्षक आशिश शिरोडकर यांनी जमावाला आश्‍वस्त केले होते. त्यामुळे लोक मोठ्या संख्येने जमा झाले होते; पण म्हार्दोळ पोलिस स्थानकात संबंधित पोलिस अधिकारी नसल्याने लोकांनी तेथेच थांबणे पसंत केले.

त्यानंतर दीड वाजण्याच्या सुमारास पोलिस निरीक्षक मोहन गावडे आल्यानंतर समील वळवईकर व इतरांनी त्यांची भेट घेऊन मेघनाच्या अटकेचा आग्रह धरला. यावेळी मेघना सावर्डेकर सध्या घरी नाही, पोलिस तिचा शोध घेत आहेत, असे उत्तर देण्यात आले.

Mardol Police Station
Goa Medical College मध्ये ‘रोबोट’ने केली गुडघ्यावर शस्त्रक्रिया, रोबोटीक शस्त्रक्रिया करणारे GMC देशात प्रथम

त्यामुळे संतप्त जमावाने, सामान्य माणूस असता तर अशीच कारवाई झाली असती का, असा सवाल करून ताबडतोब मेघनाला पोलिस स्थानकात आणण्याची मागणी केली.

त्यावर येत्या 24 तासांत मेघनाला अटक करण्यात येईल, अशी ग्वाही निरीक्षक गावडे यांनी दिली. त्यावर जमावाचे समाधान झाले नाही. जोपर्यंत मेघनाला अटक केली जात नाही, तोपर्यंत पोलिस स्थानकासमोरून हलणार नसल्याचा इशारा लोकांनी दिला.

मेघनाचा कालच घेतला होता जबाब!

म्हार्दोळ पोलिसांनी मेघनाचा मंगळवारीच जबाब घेतला होता. अपघातानंतर पलायन केल्यानंतर कारचा चालक म्हणून मेघनाचा पती परेश याला अटक केल्यानंतर जमावाने आग्रह धरल्यानंतर प्रशासन जागे झाले. पण पोलिसांनी मंगळवारीच मेघनाचा जबाब तिच्या घरी जाऊन घेतल्याचे स्पष्ट झाले. मेघनाच्या जामीन अर्जात तशी नोंद आहे.

म्हणून मिळाला दिलासा

न्यायाधीश चोलू गावस यांनी मेघनाच्या जामीन अर्जावर, पोलिसांनी १६ ऑगस्टला होणाऱ्या सुनावणीपूर्वी मेघनाला अटक करू नये, असा आदेश दिला. मेघनाला गंभीर दुखापत आहे, तसेच पती परेशला यापूर्वीच अटक केली आहे.

शिवाय मेघनाचा पोलिसांनी जबाब नोंदवल्याने तिच्या अटकेची आवश्‍यकता नाही आपल्या मुलांची देखभाल करण्यासाठी मेघनाला कारवाईतून सूट द्यावी, असा युक्तिवाद तिच्या वकिलांनी न्यायालयात केला.

मेघना सावर्डेकरची घरी जाऊन जबानी का?

१ मेघनाला दिलासा मिळावा, यासाठी पूर्वीच ‘सेटिंग’ करण्यात आले होते, असा आरोप दिवाडीवासीयांनी बुधवारी केला. खरे तर मेघनाला यापूर्वीच अटक करायला हवी होती; पण तिची वैद्यकीय तपासणी केलीच नाही.

२ मात्र, जमाव आक्रमक होत असल्याचे दिसताच मेघनाची घरी जाऊन जबानी घेण्यात आली आणि तिला जामिनासाठी वेळ मिळावा यासाठी हे सगळे सेटिंग केले आहे. पैसेवाल्यांच्या तालावर सगळे काही चालले असल्याचा आरोप दिवाडीवासीयांनी बुधवारी केला.

ठाण्याजवळ पोलिस बंदोबस्त

मंगळवारी म्हार्दोळ पोलिस स्थानकावर जो गोंधळ झाला, तो पुन्हा होऊ नये यासाठी बुधवारी पोलिस स्थानक परिसरात कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. लोकांना पोलिस ठाण्यात येण्यास मज्जाव करून गेट बंद केले होते. त्यामुळे लोकांनी रस्त्यावरच उभे राहून जोरदार घोषणा दिल्या.

बाणस्तारी अपघातात मरण पावलेल्या आई-वडिलांचा मुलगा हा आमचा पोलिस खात्यातील सहकारी आहे. त्यामुळे त्याला न्याय मिळवून देणारच. कोणीही, कितीही दबाव आणला तरी आरोपीला शिक्षा होणारच. त्यामुळे लोकांनी आमच्यावर विश्‍वास ठेवावा.

- मोहन गावडे, पोलिस निरीक्षक, म्हार्दोळ.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com