Pravin Arlekar: 24 तास उपलब्ध असणारे पेडण्याचे आमदार गेले कुणीकडे?'खरी कुजबुज'

प्रवीण आर्लेकर लंडनला पंधरा दिवस जाऊन राहिले. या घटनेवरून पेडण्याचे आमदार आहेत कुठे
Pravin Arlekar | Goa News
Pravin Arlekar | Goa News Dainik Gomantak
Published on
Updated on

Pravin Arlekar: पेडण्याचे आमदार प्रवीण आर्लेकर हे जनतेला 24 तास उपलब्ध असणार असे निवडणुकीपूर्वी आणि निवडणुकीनंतरही जाहीरपणे सांगत होते, परंतु हल्ली ते गेले कुणीकडे? असा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे.

आमदार प्रवीण आर्लेकर यांच्यावर पाणी चोरण्याचा आळ काँग्रेसचे प्रवक्ते संजय बर्डे यांनी घातल्यानंतर ते दुसऱ्या दिवशी कतारला फुटबॉल स्पर्धा पाहण्यासाठी गेले. यापूर्वीही ते लंडनला पंधरा दिवस जाऊन राहिले. या घटनेवरून पेडण्याचे आमदार आहेत कुठे? असा सवाल पेडण्यात केला जात आहे.

कारमालक कसा निसटला?

स्थानिक असोत वा पर्यटक म्हणून आलेले असोत, पण गोव्यात वाहनचालकांमध्ये बेदरकारपणा व मग्रुरी प्रचंड वाढल्याचा अनुभव आहे. अल्पवयीनांनी वाहने हाकणे हे नित्याचेच असते असे वाहतूक पोलिसच सांगतात. त्यासाठी अल्पवयीनांकडे वाहन सापडले, तर सदर वाहनमालकाविरुध्द गुन्हा नोंदविण्याची तरतूद केली गेली.

मात्र, दोन दिवसांमागे अशाच एका वाहनाची धडक बसून ज्येष्ठ महिला मृत्युमुखी पडूनही या वाहनाच्या मालकावर कारवाई का झाली नाही असे सवाल होऊ लागले आहेत. कारण या अल्पवयीनाने कायद्याच्या अक्षरशः चिंधड्या उडविल्या आहेत व त्याला त्याच्या इतकाच त्याच्या हाती कार देणारा कारमालकही जबाबदार आहे.

नाकापेक्षा मोती जड

‘काना मागून आली आणि तिखट झाली’ या म्हणीचा खरा अर्थ गोवा भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांना नक्कीच समजला असणार. रिपब्लिक टीव्हीवर डिबेटमध्ये भाजपाचे समर्थन करणारे सावियो रोड्रीगीस यांना अल्पसंख्याक चेहरा म्हणून भाजपावाले भुलले.

सावियोना भाजपात एंट्री दिली, वेळळीची उमेदवारी दिली आणि निवडणुकीत जमानत जप्त झाल्यावर पक्षाचे प्रवक्ते पद बहाल केले. मात्र, हे सावियो आता भाजपची डोकेदुखी बनायला लागले आहेत.

असे आम्ही नव्हे भाजपावालेच सांगत आहेत. भाजपाच्या नीतीच्या विरोधात हे प्रवक्ते बोलतात. मुख्यमंत्री व प्रदेश अध्यक्षांना न जुमानता सावियो माध्यमांवर पक्ष हिताविरुद्ध बोलतात. खलाशांना कायमस्वरूपी पेन्शन सरकारने दिलेच पाहिजे, अशी भूमिका आता सावियो यांनी घेतली आहे. एकूण काय सावियो भाजपसाठी नाकापेक्षा मोती जड ठरले आहेत.

खलाशांची पेन्शन, सरकारला टेन्शन!

गरजवंताला मदत करायलाच हवी. उपाशी असलेल्यांना अन्न, तहानलेल्या पाणी, घर नसलेल्यांना निवास व गरिबांच्या हातात चार पैसे राहायचे म्हणून पेन्शन योजना कल्याणकारी हे आपण समजू शकतो.

मात्र, ज्याची तिजोरी भरून उतू लागली आहे, त्याला सरकारने पेन्शन का म्हणून द्यावे? सध्या राज्यात खलाशांसाठीची पेन्शन योजना कायमस्वरूपी करा म्हणून काँग्रेस, आप, गोवा फॉरवर्ड व खलाशी संघटना पेटून उठले आहेत.

एकीकडे जनता उपाशी झोपते आणि दुसऱ्या बाजूने बोट भरलेल्यांना पेन्शन? हा कुठला न्याय यात चूक सरकारची आहे. कोणताही अभ्यास न करता अल्पसंख्याक मतपेटीवर डोळा ठेवून खलाशी पेन्शन योजना सरकारने सुरू केली होती, ती आता सरकारच्या गळ्यातील हाड बनत आहे.

फोंड्यातील रस्त्यांची दैना

फोंड्यातील रस्त्यांची दैना झाली आहे. मलनिस्सारण प्रकल्पाचे काम रखडत चालल्याने रस्ते काही चकाचक पाहण्याचे भाग्य फोंडावासीयांच्या नशिबी नाही हे खरे.

बरे हे मलनिस्सारण प्रकल्पाचे काम कधी संपणार ते पण कुणी स्पष्ट सांगू शकत नाही. त्यामुळे सध्या चालते ते चालवून घेऊया असाच विचार बहुदा फोंडावासीय करीत असावेत.

सांगेवासीयांचे सुभाषना आव्हान!

सांगे तालुक्यात नियोजित एनआयटीला काही लोक विरोध करीत आहेत. विरोध करणे हा त्यांचा अधिकार. आता विरोध करणाऱ्यांपैकी कितीजण शेतकरी आहेत व कितीजण एनआयटीच्या नावाने सुभाषना विरोध करतात हा भाग वेगळा.

मात्र, शेती आमची म्हणणाऱ्यांनी कागदपत्रे दाखवावीत असे आव्हान सांगेचे आमदार व मंत्री सुभाष फळदेसाई यांनी दिल्यामुळे सुभाष विरोधकांनी त्यांना राजीनामा देऊन आयआयटी मुद्यावर निवडून येण्याचे प्रतिआव्हान देणे हे अतीच झाले.

सीएम स्टार प्रचारक

सध्या गुजरात विधानसभा आणि दिल्ली महानगरपालिकेच्या निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. यासाठी भाजपने देशभरातून आपले मुख्यमंत्री, मंत्री, केंद्रातील मंत्री आणि खासदारांना सक्रिय केले आहे.

Pravin Arlekar | Goa News
CM Pramod Sawant: मोदींजींच्या गावी ‘सीएम’ 'खरी कुजबुज'

यात राज्याचे मुख्यमंत्री स्टार प्रचारक म्हणून सहभागी होत आहेत. त्याला त्या त्या राज्यांमधील जनतेकडून मोठा प्रतिसाद लाभत आहे. ही किमया नक्की कशाची? भाजपची की मुख्यमंत्र्यांचे राज्याबाहेर वाढत असलेले वजनाची याची सध्या भाजपात चर्चा आहे.

रस्ते चकाचक; विरोधक नाराज

लोकोत्सव हा आदर्श युवा संघाचा. या आदर्श युवा संघाचे संस्थापक आहेत सभापती रमेश तवडकर. स्थापनेवेळी जे काही सदस्य होते ते आज त्या संघटनेत वैचारिक मतभेदांमुळे दूर असले, तरी संघटना व लोकोत्सवाचे कार्य अविरत चालू आहे.

मध्यंतरी काही कार्यकर्ते माजी उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांच्या कळपात शिरले, परंतु तेही भाजपवासीच झाले. अनेक आदर्श युवा संघाच्या लोकोत्सवाच्या बालपणात इजिदोर फर्नांडिस हे तवडकर यांना मदतीचा हात देत होते.

Pravin Arlekar | Goa News
Panaji Vegetable Price: भाजीपाल्याच्या दरात किंचित झाली घट

एक मात्र खरे, लोकोत्सवाच्या निमित्ताने काणकोणातील अंतर्गत भागातील रस्त्यांचे डांबरीकरण होत आहे. रस्ते चकाचक बनत आहेत. आता रस्त्यांच्या या कामामुळे विरोधकांच्या पोटात मात्र, दुखत आहे... याच्या कारणाविषयी न बोललेच बरे.

काँग्रेस कधी जागी होणार?

एकेकाळी दिल्ली महानगरपालिका आणि गुजरातमध्ये सत्ता उपभोगलेल्या काँग्रेसची देशभरातील आजची अवस्था अत्यंत वाईट आहे. अशा बिकट स्थितीत ज्यांनी नव्याने काँग्रेसचा झेंडा हातात घेतला आहे, अशा नेते म्हणणाऱ्या व्यक्तींना त्या पदासाठी सक्रिय राहणे गरजेचे का वाटत नाही? उपरोक्त दोन्हीही राज्यांमध्ये सध्या निवडणुकांची धामधूम आहे.

या निवडणुकांच्या प्रचारासाठी राज्यातील इतर पक्षांचे नेते चढाओढीने सहभागी होत आहेत. काँग्रेसमध्ये मात्र पराकोटीची सुनसानता जाणवत आहे. याला नक्की जबाबदार कोण? हे या नेत्यांनी आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com