

म्हापसा: बेकायदेशीरपणे जमिनी बळकावणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी राज्य सरकारचे विशेष तपास पथक (एसआयटी) कार्यरत असतानाच बार्देश तालुक्यात जमीन बळकावण्याची दोन नवी गुन्हेगारी प्रकरणे समोर आली आहेत.
म्हापसा व पर्वरी पोलि स ठाण्यांत लागोपाठ दोन नवीन एफआयआर दाखल झाल्याने बार्देश हा एकप्रकारे जमीन घोटाळ्यांचा केंद्रबिंदू बनत असल्याचे स्पष्ट होत आहे.जरी हे दोन्ही गुन्हे वेगवेगळ्या व्यवहारांशी संबंधित असले, तरी या दोन्ही प्रकरणांत करण परब (रा. पिळगाव) याचे नाव संशयित आरोपी म्हणून पुढे आले आहे. त्यामुळे या दोन्ही प्रकरणांमागे एकच टोळी सक्रिय आहे का, या अनुषंगाने पोलीस तपास करत आहेत.
एसआयटीच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह
दरम्यान, म्हापसा येथील जमीन प्रकरणाबाबत यापूर्वी एसआयटीकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र, ''हा कथित संघटित गुन्हा नाही,'' असा निष्कर्ष काढत हे प्रकरण म्हापसा पोलिसांकडे वर्ग करण्यात आले. त्यानंतर झालेल्या सखोल चौकशीत हा एक नियोजित आणि संघटित गुन्हा असल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे एसआयटीच्या तपास अधिकाऱ्यांनी केलेल्या निष्कर्षावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
दोन्ही प्रकरणांत ‘करण परब’चे नाव
दोन्ही गुन्ह्यांमध्ये करण परब याचे नाव समान असल्याने, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणांतील आर्थिक व्यवहार, महसूल नोंदी आणि कागदपत्रांची सखोल तपासणी सुरू आहे. तपासात हे संघटित गुन्हेगारी रॅकेट असल्याचे निष्पन्न झाल्यास, या तपासाची व्याप्ती आणखी वाढविण्यात येणार आहे.
बनावट कागदपत्रांच्या आधारे पोंबुर्फा येथील जमिनीचे हस्तांतरण
पहिल्या प्रकरणात पोंबुर्फा येथील एका सर्व्हे क्रमांकातील १,८५० चौरस मीटर जमिनीचा गैरव्यवहार उघडकीस आला आहे. ही जमीन मूळची फ्रान्सिस्को दो रोझारिओ फर्नांडिस यांची होती. त्यांचे १९७० मध्ये झिम्बाब्वेतील हरारे येथे निधन झाले होते.
ॲड. उसगावकर यांच्या तक्रारीवरून म्हापसा पोलिसांनी शांताराम देसाई, दत्ताराम देसाई, काशीबाई देसाई (सर्व रा. सत्तरी), गणपत परब, ज्योती परब (रा. म्हापसा), करण परब (रा. पिळगाव), ‘चेतन डेव्हलपर्स’ तसेच इतर अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मयत जमीनमालकाच्या नावाने बनावट मुखत्यारपत्र, वारस नोंदी आणि विक्रीपत्र तयार करून ही मालमत्ता आरोपींनी स्वतःच्या नावावर करून घेतली. त्यानंतर ती एका रिअल इस्टेट कंपनीला विकून मूळ कायदेशीर वारसांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.
२ कोटी रुपयांच्या आगाऊ रकमेच्या व्यवहारात फसवणूक
दुसरे प्रकरण पर्वरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सांगोल्डा येथील एका सर्व्हे क्रमांकातील जमिनीशी संबंधित आहे. तक्रारदार धरमपाल कुकरेजा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांनी वांद्रे (मुंबई) येथील जमीनमालक फ्रान्सिस फर्नांडिस आणि रोमाना फर्नांडिस यांच्याशी सांगोल्डा येथील जमिनीसाठी खरेदी करार केला होता.
त्यासाठी त्यांनी २ कोटी रुपये आगाऊ रक्कम म्हणून दिले होते. मात्र, हा व्यवहार पूर्ण होण्यापूर्वीच तीच जमीन गोव्यातील एका रिअल इस्टेट कंपनीला विकण्यात आली. या प्रकरणात पर्वरी पोलिसांनी फ्रान्सिस फर्नांडिस, रोमाना फर्नांडिस, दलाल नुरू फैजल भटकळ (रा. बेती), विनीत शेट (रा. नासोळा) आणि करण परब (रा. पिळगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.