
पणजी: भू-बळकाव प्रकरणातील अटकेत असलेला मास्टरमाईंड सुलेमान खान उर्फ सिद्दीकीने पुन्हा एकदा गोवा पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. सुलेमानने त्याच्या जीवाला धोका असल्याचे म्हणत, दुसरा व्हिडिओ पोलिसांनी गन पाईंटवर करुन घेतल्याचे म्हटले आहे. खानला रिमांडसाठी कोर्टात हजर केले असता त्याने प्रसार माध्यमांशी बोलताना हे मत मांडले.
सुलेमान खानचे रिमांड वाढवण्यासाठी त्याला कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी सुलेमान खानने गोवा पोलिसांवर गंभीर आरोप केले. "पोलिसांनी अटक केल्यानंतर गन पाईंटवर दुसरा व्हिडिओ करण्यास भाग पाडले. माझ्या जीवाला धोका आहे", असे सुलेमानने यावेळी म्हटले. जमीन हडप प्रकरणात त्याला अटक केल्यानंतर गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये तो गुन्हे शाखेच्या कोठडीतून फरार झाला होता. केरळमधून त्याला पुन्हा अटक करण्यात आली होती.
सुलेमान खानला कोठडीतून फरार होण्यासाठी आयआरबी कॉन्स्टेबल अमित नाईकने मदत केली. पुढे कर्नाटकात त्याला आणखी एकाने मदत केली. दरम्यान, सुलेमान खानने एक व्हिडिओ प्रसिद्ध करत गोवा पोलिसांसह एका राजकीय नेत्यावर गंभीर आरोप केले. यावेळी त्यांने त्याच्या जीवाला धोका असल्याचे वक्तव्य केले होते.
सुलेमान खान ऊर्फ सिद्दीकीच्या दुसऱ्या व्हिडिओत त्याने एक आमदार व पोलिसांवर जे आरोप केले आहेत ते ‘आप’चे गोव्यातील निमंत्रक ॲड. अमित पालेकर यांच्या सांगण्यावरून केल्याचे सांगितले. तसेच, जामीन मिळण्याची शक्यता नसल्याने पोलिस कॉन्स्टेबलला मदत करण्यास सांगितले. त्यासाठी त्याला पैसे देण्याचे आमिष दाखवले, असेही त्याने या व्हिडिओत म्हटले होते.
दरम्यान, पुन्हा एकदा सुलेमान खानने गोवा पोलिसांवर आरोप करत जीवाला धोका असल्याचे म्हटले आहे. सुलेमानचा रिमांड वाढविण्यासाठी त्याला कोर्टात हजर केले असता तो माध्यमांशी बोलत होता. सुलेमानने दुसऱ्या व्हिडिओत भूमिका बदलली होती. एकप्रकारे केलेल्या आरोपांना माघारी घेण्याचा प्रयत्न त्याने केला होता. आता त्याने हा व्हिडिओ गन पाईंटवर करवुन घेतल्याचा आरोप केल्याने यात किती तथ्य आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.