Sudin Dhavalikar फोंडा ते बाणस्तारीपर्यंतच्या चौपदरी रस्त्याच्या कामाला चालना देण्यात आली असून शापूर - चिरपुटेवासीयांसाठी बांदोडा ते मुख्य रस्त्याच्या तिठ्यावर भुयारी मार्ग बांधून या लोकांची सोय केली जाणार असल्याचे मडकईचे आमदार तथा वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी स्पष्ट केले.
दोन महिन्यांपूर्वी शापूर व चिरपुटेवासीयांनी फर्मागुढीला वळसा घालून पुन्हा शापूर - चिरपुटे येथे येणे शक्य नसल्याने त्यासाठी आवश्यक तरतूद करण्याची मागणी करीत मुख्य रस्ता काही वेळ रोखून धरला होता. त्याला अनुसरून वीजमंत्र्यांनी ही भुयारी मार्गाची योजना पुढे नेली आहे.
बांदोडा ते कदंब बसस्थानक असा हा भुयारी मार्ग असेल. या मार्गामुळे फोंड्याहून शापूर तसेच चिरपुटे व कदंब बसस्थानकाकडे जाणाऱ्या वाहनांना सोयीस्कर ठरेल, असे सुदिन ढवळीकर म्हणाले. वास्तविक शापूर येथून कदंब बसस्थानकाकडे जायला भुयारी मार्गाची योजना आखण्यात आली होती, असे सुदिन ढवळीकर म्हणाले.
उंडीर येथील नियोजित मलनिस्सारण प्रकल्पाला सरकारने चालना दिली असून या प्रकल्पासाठी आवश्यक सर्व कायदेशीर सोपस्कार पूर्ण करण्यात आले आहेत.
या प्रकल्पाला विरोध करणारे अवघेच असून वास्तविक उच्च न्यायालय आणि हरित लवादाने या प्रकल्पाला हिरवा कंदील दर्शवला आहे.
या प्रकल्पाच्या कामासाठी आलेल्या मशिनरीला रोखणे तसेच सरकारी अधिकाऱ्यांना धमकी देणे गैर असल्याचेही सुदिन ढवळीकर म्हणाले.
लोकांचे हित सांभाळूनच या प्रकल्पाचे काम करण्यात येत असून प्रकल्पासोबतच उद्यान, सभागृह तसेच इतर वास्तू उभारण्यात येत असल्याचे ढवळीकर यांनी सांगितले.
जोडरस्त्याचे कामही मार्गी लागणार
उसगाव ते कुर्टीपर्यंतच्या चौपदरी रस्त्यावेळी नवीन खांडेपार पुलाची योजना मार्गी लागली आणि नवीन पूल आकाराला आला. या मार्गावर एकेरी वाहतुकीचा जुना पूल असल्याने कायम वाहतुकीची कोंडी होत होती, ती आता दूर झाली आहे.
तरीपण एका घराच्या वादामुळे या पुलाच्या खांडेपार बाजूच्या जोडरस्त्याचे काम अपूर्ण राहिले, ते आता नजीकच्या काळात सुरू होणार आहे, अशीही माहिती सुदिन ढवळीकर यांनी दिली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.