Goa Theatre: '..अन्यथा नाट्यस्पर्धा फक्त कागदोपत्रीच राहतील'! नाटकांना कमी गर्दी का?

Goa Marathi Natak: कला अकादमीला या परिस्थितीची थोडीफार जरी चाड असेल तर त्यांनी नुकतीच उजेडात आलेली ही प्रकरणे तडीस न्यायला हवी. अन्यथा या नाट्य स्पर्धा फक्त कागदोपत्रीच राहतील, यात शंकाच नाही.
Goa Marathi Natak
Goa Marathi NatakDainik Gomantak
Published on
Updated on

मिलिंद म्हाडगुत

नुकतीच कला अकादमीची ‘ब’ गट मराठी नाट्यस्पर्धा साखळीच्या रवींद्र भवनात पार पडली. मध्यंतरी ‘ब’ गट स्पर्धा ही ‘अ’ गटात जाण्याची शिडी समजली जात असे. ‘ब’ गट स्पर्धेत ठरावीक गुण मिळालेल्या संस्थांनाच पुढच्या वर्षीच्या ‘अ’ गट स्पर्धेत प्रवेश मिळत असे. आणि ते योग्यही होते. त्यामुळे ‘अ’ गट नाट्यस्पर्धेचा दर्जा राखण्यास मदत होत असे.

पण आता ती अट शिथिल केल्यामुळे या स्पर्धा ’ओपन’ झाल्या आहेत. यामुळे ‘ब’ गट नाट्यस्पर्धेचे महत्त्व कमी होऊन ती एक दुय्यम स्पर्धा असे समीकरण तयार होऊ लागले आहे.

याचा अर्थ ‘ब’ गट नाट्यस्पर्धेत दर्जेदार नाटके सादर होत नाहीत असा होत नाही. या स्पर्धेतही चांगली नाटके सादर केली जातात. पण या समजुतीपोटी लोक या नाटकांना विशेष गर्दी करताना दिसत नाहीत.

पूर्वी या स्पर्धेतील काही नाटके ‘अ’ गटाकरता पात्र होत असल्यामुळे कला अकादमी पणजी इथे होणाऱ्या या स्पर्धेला बऱ्यापैकी गर्दी व्हायची. पण आता साखळीत ती गर्दी होताना दिसत नाही. यंदा तर बरीच नाटके रिकाम्या खुर्च्यांना दाखवावी लागली होती.

ऑक्टोबरमध्ये फोंडा इथे झालेल्या कोकणी नाट्यस्पर्धेतही हेच चित्र बघायला मिळाले होते. दर्जा चांगला असूनसुद्धा प्रेक्षकांनी पाठ फिरविल्याचे दिसून आले होते. हे पाहिल्यास प्रेक्षकांचा आता नाट्यस्पर्धेतील रस कमी व्हायला लागला आहे, असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.

आणि आता कला अकादमीच्याच ‘अ’ गट नाट्यस्पर्धेतील परीक्षक लाच प्रकरण उघडकीस आल्यामुळे तर लोकांचा या स्पर्धेतील उरलासुरला रसही संपुष्टात यायला लागला आहे. या स्पर्धा म्हणजे सेटिंगचा प्रकार असल्याचे लोक उघडपणे बोलताना दिसत आहेत. हा चोर सोडून संन्याशाला धरण्याचा प्रकारही असू शकतो; नाही असे नाही. पण कला अकादमी या परीक्षक लाच प्रकरणाबाबत तोंडात गुळणी धरून गप बसलेली दिसत असल्यामुळे लोकांच्या संशयास अधिकच पंख फुटायला लागले आहेत हेही तेवढेच खरे.

त्यामुळे राज्यातील नाट्य कलेलाच ग्रहण लागल्यासारखे झाले आहे. गोव्यात आजपर्यंत अनेक रंगकर्मी झाले. त्यांनी आपल्या कलेच्या आविष्काराने लोकांना दीपवूनही टाकले.

त्यांना मिळालेले पुरस्कार उचित होते हेही कोणच नाकारू शकणार नाही. पण कला अकादमीच्या या मौनव्रतामुळे या रंगकर्मींच्या अथक मेहनतीवरच पाणी पडल्यासारखे झाले आहे. वास्तविक कला अकादमीने या परीक्षक लाच प्रकरणाची तसेच नुकत्याच प्रकाशात आलेल्या वाङ्मयचौर्य प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून त्याचा अहवाल जनतेसमोर आणायला हवा होता.

त्यात किती दम आहे हेही लोकांना कळले असते. सत्य उजेडात आणणे हे कला अकादमीचे कर्तव्य ठरते हे विसरता कामा नये. आणि तसे झाले असते तर ‘दूध का दूध और पानी का पानी’ असे होऊ शकले असते.

Goa Marathi Natak
Goa Marathi Natyaspardha: '..असे प्रकार घडत राहिले तर मात्र सगळ्या नाट्यस्पर्धांवरच पडदा पडेल'; निकालांवरच प्रश्नचिन्ह?

मुख्य म्हणजे यामुळे रसिकांच्या वाढत चाललेल्या संशयाला खीळ बसू शकली असती. पण अजूनपर्यंत तसे न झाल्यामुळे प्रेक्षक परीक्षक, कलाकार, संस्था असे सगळ्या संबंधितांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात बसवायला लागले आहेत. आणि त्याचा परिणाम गर्दीवर होताना दिसायला लागला आहे.

कला अकादमी काहीच बोलत नसल्यामुळे ते या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न तर करत नाहीत ना, असेही अनेकांना वाटायला लागले आहे. मध्यंतरी काही कलाकारांनी कला अकादमीच्या पदाधिकाऱ्यांना याबाबत प्रश्न विचारल्यावर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याचे बघायला मिळाले होते. याचा अर्थ या प्रकरणावर पडदा पडल्यातच जमा आहे असा होऊ शकतो.

Goa Marathi Natak
तपश्चर्येच्या मंदिरात भ्रष्टाचाराची वाळवी! 'कला अकादमी'च्या विश्वासार्हतेचे 'थडगे' कुणी बांधले?

पण कला अकादमीच्या दृष्टीने पडदा पडला असला तरी लोकांच्या मनावर पडदा पडेल असे वाटत नाही. आणि यामुळेच या स्पर्धांचे भवितव्य धूसर वाटायला लागले आहे. लक्षात घ्या कोणत्याही कलेचा कणा हा प्रेक्षक वर्ग असतो. प्रेक्षकच नसतील, किंवा अल्प प्रमाणात असतील तर त्या कलेच्या सादरीकरणाला काहीही अर्थ राहत नाही.

आणि सध्या हीच परिस्थिती नाट्यस्पर्धांतील प्रयोगांच्या वेळी दिसत आहे. आणि कला अकादमीला या परिस्थितीची थोडीफार जरी चाड असेल तर त्यांनी नुकतीच उजेडात आलेली ही प्रकरणे तडीस न्यायला हवी. अन्यथा या नाट्यस्पर्धा फक्त कागदोपत्रीच राहतील, यात शंकाच नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com