

पणजी: ‘जुन्ता हाऊस’ इमारत आणि तिच्या भाडेपट्ट्याशी (लीज) संबंधित प्रलंबित प्रकरणात प्रतिज्ञापत्र सादर करण्यास तब्बल नऊ महिन्यांचा विलंब केल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने गुरुवारी राज्य सरकारची कानउघाडणी केली. वारंवार मुदतवाढ घेऊनही सरकारकडून स्पष्ट भूमिका मांडली जात नसल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत न्यायालयाने सामान्य प्रशासन विभागाच्या अवर सचिवांना वैयक्तिकरित्या दंड भरण्याचे निर्देश दिले.
या याचिकेवरील सुनावणीदरम्यान १४ जानेवारी आणि ११ फेब्रुवारीपासून आत्तापर्यंत तब्बल सहा वेळा मुदतवाढ देऊनही राज्य सरकारने प्रतिज्ञापत्र सादर केले नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले. यावर खंडपीठाने सरकारी अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र ताशेरे ओढले. सरकारी अधिकारी या प्रकरणाकडे अत्यंत सामान्य पद्धतीने पाहत असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. संबंधित व्यक्तीच्या कराराची मुदत संपली असेल, तर अधिकाऱ्यांनी त्याबाबत ठोस आणि स्पष्ट भूमिका घेणे आवश्यक आहे. एखादे प्रकरण वर्षभर प्रलंबित ठेवून वादग्रस्त इमारत तशीच उभी राहू देता येणार नाही, अशा शब्दांत न्यायालयाने सरकारला सुनावले.
या इमारतीत पूर्वी व्यावसायिक गाळे असलेल्या तीन दुकानदारांनी दाखल केलेल्या स्वतंत्र याचिकांवर उच्च न्यायालयात सुनावणी झाली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील समितीने पुनर्विकसित इमारतीत समतुल्य बांधकाम क्षेत्र देऊन बाधित दुकानदारांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतला होता. या आश्वासनामुळेच आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत बजावण्यात आलेल्या नोटिसांविरोधातील यापूर्वीचे कायदेशीर आणि लवादविषयक दावे मागे घेतल्याचे याचिकाकर्त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
दुसरीकडे, सरकारच्या कामकाज नियमांनुसार औपचारिक मान्यता मिळेपर्यंत समितीच्या इतिवृत्ताला सरकारचा बंधनकारक निर्णय मानता येणार नाही, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला. तसेच, भाडेपट्ट्याची मुदत संपणे आणि कराराच्या अटींचे कथित उल्लंघन हे दिवाणी व कराराशी संबंधित वाद असल्याने ते रिट अधिकारक्षेत्राच्या कक्षेत येत नाहीत, अशी भूमिका सरकारने मांडली.
याचिकाकर्त्यांना प्रत्येकी ३ हजार द्या
सरकारच्या भूमिकेवर असमाधान व्यक्त करत न्यायालयाने सुरुवातीला संबंधित अधिकाऱ्याला १० हजार रुपयांचा दंड ठोठावण्याचे प्रस्तावित केले होते. मात्र, नंतर दंडाची रक्कम प्रमाणशीररीत्या कमी करून याचिकाकर्त्यांना प्रत्येकी तीन हजार रुपये देण्याचे आदेश दिले. हा दंड सामान्य प्रशासन विभागाच्या अवर सचिवांनी वैयक्तिकरित्या भरावयाचा आहे. तसेच, येत्या ४ डिसेंबरपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे अंतिम निर्देश देत न्यायालयाने पुढील सुनावणी ९ डिसेंबर रोजी निश्चित केली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.