Goa Politics: खरी कुजबुज, चर्चिलच्‍या आखाड्यात ‘हाऊजी’वर बंदी

Khari Kujbuj Political Satire: लोकसभा निवडणूक चालू असताना भाजपामध्‍ये मोदी है तो मुमकीन है। अशी घोषणा लोकप्रिय झाली होती.
Goa Latest Political Updates
Khari Kujbuj Political SatireDainik Gomantak
Published on
Updated on

चर्चिलच्‍या आखाड्यात ‘हाऊजी’वर बंदी

बाणावलीचे माजी आमदार चर्चिल आलेमाव हे मुख्‍यमंत्री प्रमोद सावंत यांना अगदी जवळ असलेले नेते, असे मानले जाते. आलेमाव यांची दोतोरांबराेबर होत असलेली ऊठ-बस पाहता ते खरे आहे, असे वाटते. असे जरी असले तरी दाेन दिवसापूर्वी म्‍हणजे बुधवारी चर्चिल समर्थकांना एक जबरदस्‍त धक्‍का बसला. चर्चिल मुख्‍यमंत्र्यांना अगदी ‘घट्ट’ याची खात्री असल्‍याने आलेमाव यांच्‍या समर्थकांनी वार्का येथे हाऊजीचा कार्यक्रम आयोजित केला होता. असे म्‍हणतात, यासाठी चर्चिलने मुख्‍यमंत्र्यांकडे शद्बही टाकला होता. पण या हाऊजीच्‍या आयोजकांनी साेशल मीडियावर एक व्‍हिडिओ टाकला आणि त्‍यामुळेच बुधवारचा हा ‘हाऊजी’चा शो रद्द करण्‍याची पाळी आयोजकांवर आली. चर्चिलच्‍या घरच्‍या आखाड्यात असे होणे चर्चिलच्‍या इभ्रतीला धक्‍का पोचवणारे नाही का? ∙∙∙

बाबू है ताे मुमकीन है!

लोकसभा निवडणूक चालू असताना भाजपामध्‍ये मोदी है तो मुमकीन है। अशी घोषणा लोकप्रिय झाली होती. आता अशीच घोषणा पेडण्‍यात थोडासा बदल होऊन लोकप्रिय होणार की काय? असे वाटण्‍याचे कारण म्‍हणजे, पेडण्‍याचे माजी आमदार बाबू आजगावकर यांनी पुन्‍हा एकदा पेडण्‍यातून निवडणूक लढविण्‍याचा व्‍यक्‍त केलेला निर्धार. बाबू यांनी हल्‍लीच वितरित झालेल्‍या व्‍हिडिओत आपल्‍या पक्षांतरांचे समर्थन करताना, आपण विविध पक्षांतरे केली, ती फक्‍त पेडणेचा विकास व्‍हावा या एकाच उद्देशाने. कारण सत्तेत आल्‍याशिवाय विकास होत नाही, हे आपल्‍याला माहीत होते, असे बाबू म्‍हणतात. मी असताना पेडणेतील एकही काम बाकी राहिले नव्‍हते, असेही त्‍यांनी म्‍हटले आहे. म्‍हणजे, पेडण्‍यासाठी ‘बाबू है तो कुछ बी मुमकीन है’ असे म्‍हणायचे का? ∙∙∙

पिता-पुत्रांची ‘भजने’!

संत तुकारामांचा प्रसिद्ध अभंग आहे. तुकाराम म्हणतात ‘कोणी निंदा कोणी वंदा। आम्हा स्वहिताचा धंदा।। काय तुम्हांसी गरज। आम्ही भजू पंढरीनाथ ।।’ या ओवीच्या सुरुवातीच्या दोन ओळींचा वापर करून कोणावर कशी टीका करायची ती केली जाते. गेली काही महिन्यांपासून स्मार्ट सिटीच्या कामांवर अधून-मधून पिता-पुत्र म्हणजे आमदार बाबूश मोन्सेरात आणि महापौर रोहित मोन्सेरात टीका करीत आहेत. स्मार्ट सिटीची कामे करणाऱ्या इमेजिन पणजी स्मार्ट सिटी विकास लिमिटेडच्या (आयपीएससीडीएल) मंडळावर ते आहेत. विषेश बाब म्हणजे मंडळ स्थापन झाल्यापासून आमदार म्हणून बाबूश हे कार्यरत आहेत. तर महापौर झाल्यापासून रोहित यांची मंडळावर वर्णी लागली आहे. सध्या पणजीकरांना तुकारामांच्या अभंगातील वरील ओळी निश्चित आठवत असतील. फक्त ‘आम्ही भजू पंढरीनाथ’ ऐवजी त्यांना जे काय भजायचे आहे, ते नेमेकेपणाने भजत असतील नाही का? ∙∙∙

पालकांचा पवित्रा कायम

कळंगुट परिसरातील दोन विद्यालयांच्या पालकांनी नव्या शैक्षणिक सत्राला विरोध कायम ठेवला आहे. पालकांनी पर्वरीत निदर्शने केल्यानंतर हा विषय विस्मृतीत जाईल असे सरकारी पातळीवर वाटत होते. मात्र कळंगुटच्या पालकांनी आपले म्हणणे कायम राखले आहे. त्यामुळे सध्या पालकांचे म्हणणे चर्चेचा विषय ठरले आहे. एरव्ही एप्रिलमध्ये शिक्षक विद्यालयात असत पण विद्यार्थ्यांना सुट्टी असे. त्यामुळे शिक्षकांना फारसा फरक पडलेला नाही. पालकांना मात्र सुट्टी का रद्द केली हा प्रश्न सतावू लागला आहे.∙∙∙

बाबूलाही मिळाले दहा हत्तींचे बळ!

आपले मुख्यमंत्री डॉ सावंत व भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक सध्या भाजपाच्या सर्व आजी व माजी आमदारांना बळ वाटत फिरत आहेत, असे दिसते. ते मांद्रेत गेले व त्या मतदारसंघात पुढे भाजपचाच आमदार असणार, अशी घोषणा करून पार्सेकर सरांना दहा हत्तीचे बळ देऊन आले. ते प्रियोळला गेले व गोविंद गावडेंना दहा हत्तीचे बळ वाटून आले. मुख्यमंत्री मडगावला आले आणि शर्मंद यांना बळ मिळाले. महत्वाचे म्हणजे गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री फातर्पा येथे मेळाव्याला गेले आणि आम्हाला एल्टन ची गरज नाही, असे सांगून बाबू कवळेकर यांना दहा हत्तींचे बळ देऊन आले. ∙∙∙

Goa Latest Political Updates
Goa Politics: भंडारी समाज भाजपपासून दुरावतोय? डॅमेज कंट्रोलसाठी प्रदेशाध्यक्ष दामू - मंत्री रवी नाईक यांच्यात खलबते

दामू पात्रांवाचे वाढते दावे

प्रदेश भाजपचे अध्यक्षपद हातात आल्यापासून आमच्या फातोर्डाचे दामूबाब भलतेच फॅार्मात आले आहेत असे त्यांचे रोजचे दावे व घोषणा पाहून सगळ्यांनाच वाटू लागले आहे. मग तो ५२ टक्के मतांचा दावा असो वा २७+ जागांचा दावा असो. या २७प्लस जागांमध्ये फोतोर्ड्याला जमेस धरले आहे का? अशी विचारणा विरोधक नव्हे तर एकेकाळचे (आताचे नव्हेत) त्यांचे फातोर्ड्यातील सहकारीच करत आहेत. बाकी आपले सहकारी व कार्यकर्त्यांना उमेदीत ठेवण्यासाठी अशा घोषणा हव्या आहेत हे खरे असले तरी सद्यस्थिती सरकारची व आपल्या पक्षाची काय आहे, त्याचा विचार दामबाबांनी अवश्य करावा, असे त्यांचे हितचिंतक सांगू लागलेत. ∙∙∙

Goa Latest Political Updates
Goa Politics: खरी कुजबुज, भाजपात जुना-नवा वाद संपता संपेना!

‘रेन्ट अ कॅब’ चर्चेत

टॅक्सीवाले विरोधात रेन्ट अ कॅबवाले हा संघर्ष संपता संपेना असा आहे. टॅक्सीवाल्यांना कळंगुटमध्ये प्रवेश करू दिला जाणार नाही अशी जाहीर धमकी गुरुवारी देण्यात आल्याने त्याचे पडसाद उमटू शकतात. टॅक्सीवाल्यांची बाजू आधी आमदार मायकल लोबो मांडत होते. आता मांद्रेचे आमदार मोपावरील टॅक्सीवाल्यांच्या मदतीला धावून जात आहेत. त्यामुळे या प्रश्नाला नाही म्हटला राजकीय कोन आहेच. त्यात या रेन्ट अ कॅबवाल्यांचे प्रश्न लटकतात की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे.∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com