Railway देशाच्या उर्वरित भागाशी संपर्क बळकट करण्यासाठी लोंढा ते वास्को लोहमार्गाच्या दुपदरीकरणाचे घोडे सरकार दामटत असले, तरी दुपदरीकरणाचा फायदा प्रवासी वाहतूक वाढण्यास होणार नाही हे आज पुन्हा एकदा स्पष्ट झाले.
दक्षिण पश्चिम रेल्वेचे सरव्यवस्थापक संजीव किशोर यांनी तिनईघाट परिसरामुळे गोव्याकडे जाण्यासाठी, येण्यासाठी आणखीन प्रवासी रेल्वे सुरू करता येणार नाहीत, असे स्पष्टपणे सांगितले.
राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल यांच्या उपस्थितीत आज हुबळी येथे झालेल्या दक्षिण पश्चिम रेल्वे विभागीय रेल्वे प्रवासी सल्लागार समितीची बैठक झाली. त्या बैठकीत त्यांनी हे विधान केले.
या बैठकीला गोव्यातून या समितीचे सदस्य कुडचडे येथील देवानंद नाईक भंडारी उपस्थित होते. त्यांनीही या माहितीची पृष्टी केली.
ते म्हणाले, पूर्वी वास्को - मिरज एक्सप्रेस व वास्को - चेन्नई एक्सप्रेस आठवड्यातून एकदा धावत होत्या, त्या सध्या बंद असलेल्या गाड्या पुन्हा सुरू करून त्याला एक काचेचा ‘विस्ता डोम’ कोच पर्यटकांसाठी जोडावा, वास्को - बिजापूर - सोलापूर रेल्वे पुन्हा सुरू करावी अशा मागण्या बैठकीत केल्या.
यापूर्वीही तसे निवेदन सादर केले होते. आज पुन्हा विषय काढला असता घाटामुळे या रेल्वे पुन्हा सुरू करता येणार नाहीत, असे सरव्यवस्थापकांनी सांगितले. त्यामुळे लोहमार्ग दुहेरीकरणाचा आम्हाला काय फायदा असा प्रश्न निर्माण झाला आहे.
दक्षिण पश्चिम रेल्वेच्या विभागीय प्रवासी सल्लागार समितीच्या २३ व्या बैठकीत दक्षिण पश्चिम रेल्वेने सणासुदीच्या काळात ८३ खास रेल्वे सोडल्या आहेत अशी माहिती देण्यात आली. १७९८ जादा डबे रेल्वेंना जोडले आहेत.
यापैकी गोव्याच्या वाट्याला काहीही आले नसल्याचे या बैठकीच्या कामकाजावेळी दिसून आले. या बैठकीला प्रवासी सल्लागार समितीचे सदस्य खासदार नारायण कोरगप्पा, जी. पी. आपेगौडा, वेणू यादव, रवी कुमार वेमुल्लापल्ली, दामोदरदास राठी, विनय जवळी, एम. बाबू राव, के. व्ही. वसंत कुमार, महेंद्र सिंघी, सुरेश कुमार, माचेर्ला सुकुमार, कॅ. हिमांशू शेखर, पी. के. देयवसिगामनी, कृष्णमूर्ती पी. आणि प्रसाद कुलकर्णी उपस्थित होते.
लोंढा - वास्को विद्युतीकरण नाही
लोंढा ते वास्को रेल्वे सध्या धूर ओकणाऱ्या डिझेल इंजिनांद्वारे चालवण्यात येतात. असे असले तरी दक्षिण पश्चिम रेल्वेच्या ७१ टक्के (८७४ किलोमीटर) लोहमार्गावर विद्युतीकरण करण्यात आले आहे.
यामुळे दुपदरीकरण करण्यासाठी घाई केली जात असली, तरी दक्षिण पश्चिम रेल्वेच्या विद्युतीकरण प्राधान्य यादीवर लोंढा - वास्को हा टापू नसल्याचेही आजच्या बैठकीत उघड झाले आहे.
सामाजिक कार्यकर्त्यांचे आरोप ठरले खरे
राज्यातील अनेक सामाजिक कार्यकर्ते लोहमार्ग दुपदरीकरण हे कोळसा वाहतुकीसाठीच आहे असा आरोप करत आहेत. त्यांनी आंदोलन केल्यानंतर त्यांच्यावर सरकारने गुन्हेही दाखल केले होते.
सरकार राष्ट्रीय कारणास्तव लोहमार्ग दुपदरीकरण करण्यात येत असल्याचे कारण पुढे करत आहे. असे असले तरी जनतेच्या फायद्यासाठी हे लोहमार्ग दुपदरीकरण नाही असे आजच्या बैठकीत स्पष्ट झाले.
गोव्यातून पूर्वी सोलापूर, मिरज, चेन्नई येथे जाणाऱ्या, पण कोविड काळात बंद पडलेल्या रेल्वेही सुरू करण्यास या बैठकीत सरळपणे नकार दिला आहे.
गोव्याच्या मागण्यांवर ठोस निर्णय नाहीच : बैठकीत गोव्याविषयी विविध मागण्यांबाबत ठोस निर्णय झाला नाही. यात वास्कोहून सकाळी सहा वाजता मिरजसाठी निघणारी आणि मिरजहून सायंकाळी ७.२० वाजता परतीच्या प्रवासासाठीची ‘गोमंतक एक्सप्रेस’ पुन्हा सुरू करावी.
तसेच वास्को विजापूरमार्गे सोलापूर आठवड्यातून दोनदा धावणारी एक्सप्रेस व वास्को चेन्नई आठवड्यातून एकदा धावू शकणारी एक्सप्रेस पुन्हा सुरू करावी व तिचे नामकरण ‘दूधसागर एक्सप्रेस असे करावे. वास्को ते यशवंतपूर एक्सप्रेसचे नामकरण सिद्धारुढ स्वामी एक्सप्रेस असे करावे या मागण्यांचा समावेश होता.
केवळ उड्डाण पुलाला मंजुरी
कुडचडे मतदारसंघाचे प्रश्न मी मांडले. एका ठिकाणी उड्डाण पुलाची गरज होती, त्याला मंजुरी मिळवली आहे. इतर मागण्या या रेल्वे सुरू करण्यासंदर्भात होत्या.
- नीलेश काब्राल, सार्वजनिक बांधकाममंत्री
प्रत्येकवेळी गोव्यासाठी रेल्वे सुरू करण्याची मागणी केली, की तिनईघाट क्षेत्राचा अडसर दक्षिण पश्चिम रेल्वे सांगते. निदान वास्कोहून पूर्वी सुटणाऱ्या पण कोविड काळात बंद पडलेल्या रेल्वे तरी पुन्हा सुरू करण्याची गरज आहे.
- देवानंद नाईक भंडारी, सदस्य, दक्षिण पश्चिम रेल्वे विभागीय रेल्वे प्रवासी सल्लागार समिती सदस्य
अमृत भारत योजनेखाली कुडचडे आणि वास्को रेल्वे स्थानकाचा विकास करण्यासाठी निविदा मागवण्यात येणार असल्याचे या बैठकीत सांगण्यात आले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.