
डिचोली: पंधरा दिवसांनंतर पुन्हा एकदा पावसाचा धुमाकूळ सुरू झाला असून मुसळधार पावसाने सर्वत्र झोडपून काढले आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सक्रिय झालेल्या पावसाने आता अचानक जोर धरला. त्यामुळे डिचोलीसह बहुतेक सर्व भागातील जनतेची दाणादाण उडाली. मुसळधार पावसामुळे डिचोलीतील वाळवंटी नदीसह अस्नोड्याच्या ‘पार’ आदी नद्यांच्या पाण्याची पातळी वाढू लागली आहे.
गावातील नाले, ओहोळही आता पुन्हा खळखळून वाहात आहेत. सायंकाळपर्यंत नदीचे पाणी धोक्याच्या पातळीपर्यंत पोचले. दरम्यान, सायंकाळी पाचनंतर पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याने स्थिती नियंत्रणाखाली होती.
मात्र, रात्रभर पावसाचा जोर कायम राहिल्यास नदीचे पाणी बाहेर फुटण्याची शक्यता आहे. आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणाही सतर्क झाली आहे. पावसामुळे शिरगावसह मये आदी सकल भागातील शेतीत पाणी भरू लागले आहे. जोरदार पर्जन्यवृष्टी होतच राहिल्यास भातशेती पाण्याखाली येण्याची शक्यता आहे.
डिचोली शहरासह तालुक्यातील बहुतेक भागात आज दिवसभर जोरदार पाऊस पडला. आकाशातही ढग साचून राहिल्याने आज दिवसभर सूर्यदर्शनही झाले नाही. आजच्या पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले.
सकाळपासूनच पावसाचा जोर वाढला होता. पावसाने जोर धरल्याने अनेकांची तारांबळ उडाली. काहीजण अडकून पडले. डिचोली-साखळी रस्त्यावर काही ठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याची माहिती मिळाली. दरम्यान, पावसामुळे डिचोली अग्निशमन दलाच्या कार्यक्षेत्रात झाडांची पडझड वा अन्य कोणतीही विपरीत घटना घडली नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.