

पणजी: २००६ मधील गाजलेल्या १७ वर्षीय कायदा शाखेचा विद्यार्थी मंदार सुर्लकर याच्या अपहरण व खून प्रकरणातील जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या रोहन पै धुंगट, शंकर तिवारी आणि जोव्हिटो रायन पिंटो या तीन दोषींची मुदतपूर्व सुटका करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिले.
राज्य सरकारने या दोषींचे सुटकेचे अर्ज फेटाळण्याचा घेतलेला निर्णय न्या. डॉ. नीला गोखले आणि न्या. अमित जामसंडेकर यांच्या खंडपीठाने रद्दबातल ठरवला. केवळ गुन्ह्याचे गांभीर्य किंवा तो किती निर्घृण होता, या एकाच निकषावर शिक्षेत सूट नाकारता येत नाही, असे स्पष्ट मत उच्च न्यायालयाने नोंदवले आहे.
या आदेशानुसार तिघांची तुरुंगातून मुदतपूर्व सुटका होणार आहे. या तिघांनीही १४ वर्षांपेक्षा जास्त प्रत्यक्ष कारावास आणि शिक्षेतील सुटीसह जवळजवळ २० वर्षांची शिक्षा पूर्ण केली आहे. उत्तर गोव्याचे पोलिस अधीक्षक वगळता सर्व प्राधिकरणांनी दोषींमध्ये सुधारणा झाल्याची पुष्टी केली होती. सविस्तर
सुटीसह २० वर्षांची शिक्षा पूर्ण
पणजी येथील बाल हक्क न्यायालयाने २३ जून २०१४ रोजी या तिघांना भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ (हत्या), ३६४-अ (खंडणीसाठी अपहरण), २०१, १२०-ब आणि गोवा बाल कायद्यांतर्गत दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. उच्च न्यायालयाने ४ मार्च २०१९ रोजी ही शिक्षा कायम ठेवली होती. तत्पूर्वी दोषी २००६ पासून कोठडीत होते.
नेमके प्रकरण काय?
विधी (कायदा) शाखेचे शिक्षण घेणाऱ्या या आरोपींनी १४ ऑगस्ट २००६ रोजी ५० लाख रुपयांच्या खंडणीसाठी मंदार सुर्लकर याचे अपहरण केले होते. मंदारला मारहाण करून, दोरीने बांधून त्याच्याकडून खंडणीची मागणी करणारा संदेश रेकॉर्ड करण्यात आला. १५ ऑगस्ट २००६ रोजी फोंडा येथे त्याचा मृतदेह आढळून आला. गळा आवळून तसेच बेसबॉल बॅटने डोक्यावर प्रहार करून त्याची हत्या केल्याचे अहवालात स्पष्ट झाले होते.
आरोपींमध्ये सकारात्मक बदल
रोहनने एलएलबी, बीए, आयटी आणि कम्युनिकेशन्स आणि पत्रकारितेत पदव्युत्तर पदविका पूर्ण केली आहे. तो उत्कृष्ट चित्रकार व कवी असून त्याला कला आणि साहित्यासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. त्याचा ‘फॉर बेटर ऑर व्हर्स’ हा काव्यसंग्रहही प्रकाशित झाला आहे.
तिवारी याने इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठातून पर्यटन व ट्रॅव्हल मॅनेजमेंटमध्ये पदवी व पदव्युत्तर पदवी तसेच ‘फायनान्स अँड अकाउंटिंग’मध्ये डिप्लोमा पूर्ण केला. त्याने जिल्हा कायदेशीर सेवा प्राधिकरणात ‘पॅरा लीगल व्हॉलिंटियर’ म्हणूनही काम केले.
पिंटो याने बी.ए. आणि एम.ए. पूर्ण केले असून संगणक व बेकरीचे प्रशिक्षण घेतले आहे. त्याने ग्रंथपाल आणि वॉर्डन म्हणून काम पाहिले आहे.
वेदनेचा आवाज हरला
मंदार सुर्लकर यांच्या खुन्यांना कसलीच मोकळीक मिळू नये, यासाठी वडील दीपक सुर्लकर यांनी निकराचा लढा दिला; परंतु अखेर त्यांच्या आक्रोशापुढे न्यायालयीन निर्णयाचे पारडे जड ठरले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.