

पणजी: वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) माध्यमातून राज्य सरकारने गेल्या पाच वर्षांत २९,१३७ कोटींचा महसूल जमा केला. गत चार वर्षांत केंद्राकडून राज्याला परताव्यापोटी २,०३९ कोटी रुपये मिळाले आहेत.
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेतील लेखी प्रश्नाच्या उत्तरातून सादर केलेल्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे. देशभरातील करप्रणाली सुलभ करण्याच्या हेतूने केंद्र सरकारने १ जुलै २०१७ रोजी देशात जीएसटी लागू केला. त्यापूर्वी देशात व्हॅट, सेवा कर, केंद्रीय उत्पादन शुल्क, मनोरंजन कर आणि जकात याच्या रूपात वेगवेगळे कर आकारण्यात येत होते. परंतु, जीएसटीच्या माध्यमातून हे सर्व कर एकत्रितरित्या जमा करण्यात येतात.
जीएसटीच्या माध्यमातून राज्य सरकारे केंद्राला प्रत्येक वर्षी जो कर जमा करतात, त्याचा परतावा म्हणून त्यातील काही वाटा केंद्राकडून राज्यांना देण्यात येतो. जीएसटीच्या माध्यमातून गोवा सरकारने गेल्या पाच वर्षांच्या काळात केंद्राला २९,१३७ कोटी रुपये दिले. त्याचा वाटा म्हणून राज्याला केंद्राकडून चार वर्षांच्या काळात २,०३९ कोटी रुपये मिळाले, असे मंत्री चौधरी यांनी सादर केलेल्या आकडेवारीतून दिसून येते.
२०२१-२२ यावर्षी राज्यात जीएसटीच्या माध्यमातून ४,३४३ कोटींचा महसूल जमा झाला होता. पण, त्यातून गोव्याला किती वाटा मिळाला, हे उत्तरात सांगितलेले नाही. चालू आर्थिक वर्षात जानेवारीपर्यंत राज्यात ५,७७९ कोटींचा महसूल जमा झाला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.