
पणजी: गोविंद गावडे यांना मंत्रिमंडळातून हटविण्यासह मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चेसाठी भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक दिल्लीतच तळ ठोकून आहेत. मात्र, अद्याप त्यांना राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांची भेट मिळालेली नाही.
आक्षेपार्ह विधाने केल्याने सरकारसाठी डोकेदुखी ठरलेले कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांना हटविण्यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून संमती मिळणे बाकी आहे. त्यासाठी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांची भूमिका महत्त्वाची मानली जाते. या भेटीनंतर पुढील कार्यवाही मार्गी लागेल.
अभ्यासवर्गाच्या निमित्ताने दामू नाईक हे दिल्लीला गेलेले असले तरी मंत्री गोविंद गावडे यांना हटविण्यासाठी पक्षश्रेष्ठींकडून संमती घेऊन येण्याची मोठी जबाबदारी त्यांच्यावर आहे. शनिवारी सायंकाळी राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई हे केरळवरून नियोजित वेळेपूर्वीच गोव्यात पोहोचल्याने मंत्री गावडे यांच्या राजीनाम्याची आणि त्यांच्या जागी नव्या मंत्र्याच्या नियुक्तीची चर्चा सुरू झाली होती. भाजपच्या गोटातही याविषयी उलटसुलट चर्चेला उधाण आले होते.
‘मी अजूनही भाजपचे सरचिटणीस बी. एल. संतोष यांच्या भेटीसाठी थांबलो आहे’, असे नाईक यांनी ‘गोमन्तक’ला सांगितले. त्यावरून दामू नाईक यांचा दिल्लीतील मुक्काम आणखी काही काळ लांबणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
‘उटा’च्या कार्यक्रमात गावडे यांनी ‘आदिवासी कल्याण खात्यात देवाण-घेवाणीनंतर फाईल्स मार्गी लागतात; खात्याचा कारभार कोलमडला आहे’, मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीतील खात्यात भ्रष्टाचार चालतो, असे सूचित केले होते.
उपरोक्त वक्तव्य कुणा विरोधकाचे नाही तर एक मंत्री करतो आणि तोही मुख्यमंत्र्यांच्या खात्याकडे अंगुलीनिर्देश दाखवून! त्यामुळे गोमंतकीयांच्या भुवया उंचावल्या होत्या.
फर्मागुढीला झालेल्या ‘उटा’च्या मेळाव्यात प्रकाश वेळीप यांनी, ‘गावडे सत्य तेच बोलले’ असे म्हटल्याने आरोपांची तीव्रता वाढली आहे. तर प्रदेशाध्यक्षांनी गावडेंवर कारवाई करण्याचा चंग बांधला आहे. एकूणच हा विषय प्रतिष्ठेचा बनला आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंत्री गावडे यांच्याविषयीचा चेंडू दिल्लीश्वरांच्या कोर्टात टोलवला आहे. त्यामुळे भाजपसह राज्यातील जनतेचे दिल्लीश्वरांच्या निर्णयाकडे लक्ष लागून राहिले आहे. येत्या दोन दिवसांत दिल्लीतून स्पष्टपणे आदेश येतील, असे जाणकारांना वाटते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.