Goa Politics: खरी कुजबुज; गावडे काय गमावतील?

Khari Kujbuj Political Satire: कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांच्यावरील लांबलेल्या कारवाईचा अर्थ कार्यकर्ते आपल्या पातळीवर मंत्रिमंडळ फेरबदलाशी लावू लागले आहेत.
Goa Latest Political Updates
Khari Kujbuj Political SatireDainik Gomantak
Published on
Updated on

गावडे काय गमावतील?

कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यास त्यांना गमावण्यासारखे आता काय बाकी राहिले आहे. गावडे यांच्यावर कधीतरी कारवाई होणार हे ठरून गेलेले होते. आजवर तंबीवर ते सुटत आले. अपक्ष गावडे भाजपमध्ये आले आणि राजकीय कुंपण त्यांच्याभोवती पडले. ते कुंपण आता ते भेदणार का? राजकीय धाडस गावडे यांनी केल्यास त्यांना प्रियोळमधील राजकीय स्थिती फायदेशीर ठरेल असे नाही. गावडे यांनी आता कधीही राजीनामा दिला तरी तो चर्चेचा विषय ठरेल असे नाही, याउलट त्यांच्यावरील कारवाईला होत चाललेला विलंबच चर्चेचा ठरला आहे. ∙∙∙

उत्सुकताच जास्त

आपला आमदार मंत्री होणार काय याची उत्सुकता कार्यकर्त्यांना वाटू लागली आहे. कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांच्यावरील लांबलेल्या कारवाईचा अर्थ कार्यकर्ते आपल्या पातळीवर मंत्रिमंडळ फेरबदलाशी लावू लागले आहेत. काहीजणांनी शनिवारी तीन मंत्र्यांना वगळले जाणार असे ठरवले. ती माहिती प्रसारीत होईल याची दक्षता घेतली आणि मंत्रिमंडळात तिघांचा समावेशही करून टाकला. राजकीय चर्चा रंगत जाणार, मात्र या निमित्ताने प्रत्येक भागातील राजकीय कार्यकर्त्यांचा कल्पनाविलास काय असू शकतो याचे प्रत्यंतर यानिमित्ताने येऊ लागले आहे. ∙∙∙

...तर आदिवासी नेताच हवा!

‘गाकुवेध’ने मंत्री गोविंद गावडे यांना हरवले, तर त्यांच्या जागी आदिवासी समाजातूनच दुसरा मंत्री असावा अशी मागणी करून एक नवा अध्याय लिहिला जात आहे. गावडे सोडून आदिवासी समाजाचे आणखी तीन आमदार आहेत आणि यात सभापती रमेश तवडकर यांचे नाव आघाडीवर आहे. त्यामुळे ‘गाकुवेध’ने अप्रत्यक्षपणे ‘आम्हाला तवडकर मंत्री हवे’ असाच संकेत दिला अशी चर्चा सुरू झाली. त्यामुळे आता समाजात एक वेगळाच ‘खेळ’ सुरू झाला आहे. ‘उटाला’ (गावडे यांच्या समर्थकांना) गावडे हवेत, तर ‘गाकुवेध’ला तवडकर! राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही, पण आदिवासी समाज मात्र आता ‘मंत्रिपदा’साठी एकवटला आहे, हे नक्की! ∙∙∙

पहावे ते नवलच!

आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी पणजी शहर पोलिस स्थानकात निरीक्षकांना घेराव घातला. यावेळी फ्रान्सिस कोएल्हो यांनी त्यांच्यासह आपच्या कार्यकर्त्यांविरोधात पोलिसांत दाखल झालेल्या ‘एफआयआर’ची सुबक फोटोफ्रेम बनवून आपल्या कार्यालयाच्या भिंतीवर लावण्यासाठी ती आणलेली असल्याचे त्यांनी दाखविले. भाजपने राजकीय सूडबुद्धीने तक्रार नोंदवून खऱ्याअर्थाने समाजासाठी काम करणाऱ्यांना पदवी दिली आहे. ही तक्रार म्हणजे ‘चमकदार पदक’ आहे आणि ते आमच्या संघर्षाची पावती आहे, असे कोएल्हो यांना वाटते. विशेष बाब म्हणजे पोर्तुगीज काळात असलेल्या सालाझारशाहीसारखा सध्याच्या सरकारचा कारभार सुरू असल्याचीही त्यांनी तुलना केली. अनेकजण शाळा, महाविद्यालयांच्या पदव्या, प्रमाणपत्रांच्या फोटोफ्रेम करून घरातील भिंतीवर लावतात. परंतु पोलिस तक्रारीची फोटोफ्रेम करून भिंतीवर लावणे म्हणजे नवलच मानायला हवे. ∙∙∙

पावसाने सर्वांनाच चकवले

गोव्यात पावसाचे यंदा लवकरच आगमन झाले आहे. या पावसाने सर्वांचाच थरकाप उडविला हे खरे आहे. पाऊस सालाबादप्रमाणे जूनच्या पहिल्या पंधरवड्यानंतर येईल असा विचार करून स्वस्थ बसलेल्या सर्वांचीच या पावसाने झोप उडविली. अनेक भागात तर मंत्री - आमदारांनी सकाळी हॅाटमिक्स कामाचा शुभारंभ केला व सायंकाळीच पावसाने हजेरी लावली आणि तो सलग पडत राहिला. त्यामुळे बेत केलेले अनेक रस्ते हॅाटमिक्सविना राहिले. काही नगरपालिकांचा गटार उपसा अर्धवट राहून पाणी तुंबले, तर अशी कामेच हाती न घेतलेल्या ग्रामपंचायतींचे पितळ उघडे पडले. आता ही मंडळी पाऊस लवकर सुरू झाल्याने ही कामे करता आली नाहीत असे सांगत आहेत. अनेक सरकारी शाळांची छप्पर दुरुस्ती अर्धवट राहिली, ठेकेदार व अधिकारी पावसाला दोष देत आहेत, पण छप्परांची कामे मे महिन्यापर्यंत हाती का घेतली नाहीत याची उत्तरे मात्र त्यांच्याकडे नाहीत. ∙∙∙

Goa Latest Political Updates
Goa Politics: राज्यपाल 24 तास आधीच गोव्यात, भाजपच्या तंबूत वादळापूर्वीची शांतता; मंत्रिमंडळ फेरबदलाविषयी दिल्लीकडे डोळे

कॉंग्रेसच्या गोटात शांतता

भाजप विरोधी गोटात असताना सत्ताधारी कॉंग्रेसच्या मंत्र्याने कोणतेही वावगे विधान केले असते, तर भाजपने राज्यभर आंदोलने केली असती. त्या मंत्र्याला फिरू दिले नसते. प्रतिमांचे दहन, मोर्चे आदी निघाले असते. आता परिस्थिती उलटी आहे. भाजप सत्तेत आहे आणि कॉंग्रेस विरोधात. कला संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांनी विरोधी कॉंग्रेसला सरकारविरोधी आंदोलन करण्याची मोठी संधी मिळवून दिली. कॉंग्रेस मात्र निषेधाची चार दोन भाषणे करून गपगार पडली आहे. त्यामुळे जनतेच्या प्रश्नावर कॉंग्रेस कधीतरी आवाज उठवेल असे वाटणाऱ्यांच्या पदरी निराशा आली आहे. ∙∙∙

Goa Latest Political Updates
Goa Politics: खरी कुजबुज; मढ्याच्या टाळूवरील लोणी!

‘स्थितप्रज्ञ’ रवी नाईक

कृषिमंत्री रवी नाईक यांच्या राजकीय यशाचे एक गमक म्हणजे ते सहसा ‘रिॲक्ट’ होत नाहीत आणि कोणाबद्दल वाईटही बोलत नाहीत. परवा याचा प्रत्यय आला. शनिवार हा त्यांचा नागरिकांना भेटण्याचा दिवस. असेच दोघेजण आपले काही काम घेऊन रवींकडे आले होते आणि पात्रांवावर ‘इंप्रेशन’ मारण्याकरता त्यांच्या एका विरोधकाबाबत वाईट बोलायला लागले. लगेच पात्रावने त्यांना हात करून थांबवले आणि कोणाबद्दल काही बोलू नका फक्त तुमचे काम बोला अशी सूचना केली. या त्यांच्या ‘स्थितप्रज्ञ’ वृत्तीमुळेच ५० वर्षे राजकारणात असूनसुद्धा ते कधी वादात सापडले नाहीत. खरेच आजच्या बोलघेवड्या राजकारण्यांनी

त्यांचा कित्ता गिरवायला हवा. हे आम्ही नाही बोलत हो... तिथे जमलेले रवींचे कार्यकर्तेच बोलताना दिसत होते. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com