Goa Governor PS Sreedharan Pillai Statement On Nathuram Godse: महात्मा गांधींनी अखेरपर्यंत हिंदू धर्माचा पुरस्कार केला. त्यांनी हिंदू धर्मातील कोणतीही गोष्ट नाकारली नव्हती. अशा महात्म्याची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेचा उल्लेख पापी असा करण्यात काही चूक केली असे मला वाटत नाही.
मी मल्याळममध्ये केलेल्या भाषणात मल्याळम भाषेतील ‘पाबी’ हा शब्द गोडसेसाठी वापरला होता. यापुढेही तसाच विचार मांडायचा झाल्यास तोच शब्द मला वापरावा लागेल, असे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी दै. ‘गोमन्तक’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
कालिकत येथे पुस्तक प्रकाशन सोहळ्यात रविवारी त्यांनी गोडसेबाबत केलेल्या विधानामुळे समाज माध्यमावर चर्चा सुरू झाली आहे.
कालिकत येथे ज्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला मी गेलो होतो, त्या पुस्तकाचे लेखक राजीव हे वकील आहेत, कोलमच्या बार असोसिएशनचे अध्यक्ष या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
लेखकाने गांधी हत्याकांडाच्या खटल्याशी संबंधित दस्तावेज, कपूर आयोगाचा अहवाल आणि इतर कागदपत्रांचा अभ्यास करून हे पुस्तक लिहिले आहे. त्याच्या सुधारीत आवृत्तीचे प्रकाशन करावे अशी मला विनंती केली म्हणून मी तो कार्यक्रम स्वीकारला होता, असे राज्यपालांनी सांगितले.
गांधीजींनी आयुष्यभर तत्त्व व नियम यांचा पुरस्कार केला. जगात भांडवलशाही व साम्यवादाचा पाडाव झाल्यानंतर गांधीजींच्या तत्त्वज्ञानाकडे आशेने पाहिले जात आहे. त्यांनी स्वराज्यासह सुराज्य ही संकल्पना मांडली होती.
ग्रामस्वराज्य, कुटिरोद्योग आणि श्रमप्रतिष्ठा यावर भर दिला होता. त्यांच्या आर्थिक विचारांवर काम करण्यासाठी जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. त्यांनी देश स्वातंत्र्य झाल्यानंतर रशियन पंचवार्षिक योजनेचा ढाचा स्वीकारला.
परिणामी १९९१ मध्ये तत्कालीन केंद्रीय वित्तमंत्री मनमोहन सिंग यांना देश आर्थिक गर्तेत सापडल्याचे जाहीरपणे सांगावे लागले. त्यांनी तसे निवेदन संसदेत करत अटलबिहारी वाजपेयी आणि जॉर्ज फर्नांडिस यांची मदत मागितली.
गांधीजींच्या विचारांचा पुरस्कार स्वातंत्र्यानंतर केला असता, तर देशावर ही वेळ आली नसती. अशा व्यक्तीची हत्या करणे ही चूकच आहे. अशी चूक करणारा हा पापी आहे अशी मांडणी मी भाषणात केली होती, असे राज्यपालांनी सांगितले.
‘नथुराम पापीच’
राज्यपाल म्हणाले, महात्मा गांधींचे जीवन हाच एक संदेश आहे. अशा व्यक्तीची हत्या करण्याचे समर्थन केले जाऊ शकत नाही. हिंदू धर्माचे समर्थन करणाऱ्या गांधीजींच्या कुडीतून प्राण हिरावून घेण्याचे पाप नथुराम गोडसे याने केले आहे.
पुस्तकावर नव्हे अभ्यासावर निरीक्षण
राज्यपालांनी आपल्या भाषणात नेमके काय सांगितले हे जाणून घेण्यासाठी त्यांची भेट घेतली असता ते म्हणाले, गोडसेचे गुणगान काही वर्षांपर्यंत कोणी करत नव्हते. याउलट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला गांधीजी प्रातः स्मरणीय आहेत.
ते पुस्तक गांधी विरुद्ध गोडसे असे असले तरी त्या पुस्तकातील विचारांबाबत मी काही बोललो नाही. माझे निरीक्षण हे माझ्या अभ्यासावर आधारीत होते.
काही वर्षांपूर्वी नथुराम माहीतही नव्हता
जोवर गांधीजींची स्मृती कायम राहील, तोवर गोडसे आठवत राहील असे मी म्हटलेले नाही. गोडसे आता चर्चेत आला असला तरी काही वर्षांपूर्वीपर्यंत त्याच्याबाबत कोणाला माहितीही नव्हती.
त्याने गांधीजींची हत्या केली त्यावेळी तो चर्चेत आला, त्यानंतर त्याला काही प्रांत वगळता इतर भागात कोणी ओळखत होते याविषयी शंका आहे, असे राज्यपाल म्हणाले.
‘सर्वसामान्यांच्या विचारांचीच भाषणात चर्चा’
महात्मा गांधी, दीनदयाळ उपाध्याय आणि राम मनोहर लोहिया यांनी नेहमीच सर्वसामान्यांचा विचार केला. त्याचीच चर्चा माझ्या भाषणात केली, असे राज्यपालांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.