Tillari Dam: गोव्याच्या वाट्याला आणखीन पाणी येणार! 'तिळारी'ची उंची वाढवण्याबाबतचा प्रस्ताव विचाराधीन

CM Pramod Sawant: यापूर्वी नियंत्रण मंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी तिळारी धरणाची उंची वाढवण्याचा विषय मांडला होता
CM Pramod Sawant: यापूर्वी नियंत्रण मंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी तिळारी धरणाची उंची वाढवण्याचा विषय मांडला होता
Tillari Dam NewsDG
Published on
Updated on

Goa Tillari Dam

पणजी: गोव्याची वाढीव तहान भागवण्यासाठी तिळारी धरणाची उंची आणखीन वाढवावी. त्यामुळे धरणातील जलसाठ्यात वाढ करता येईल आणि आणखीन पाणी गोव्याच्या वाट्याला येईल असा प्रस्ताव गोवा सरकारने महाराष्ट्र सरकारला सादर केला असून तो महाराष्‍ट्र सरकारने विचाराधीन घेतल्याची माहिती मिळाली आहे. तिळारीचे पाणी कर्नाटककडे वळवण्‍यासाठी कर्नाटक सरकारने महाराष्ट्र सरकारशी बोलणी सुरू केल्याची माहिती मिळाल्याने त्याविषयी चौकशी केली असता जलसंपदा खात्यातून ही माहिती मिळाली.

जलसंपदा खात्याचे मुख्य अभियंता प्रमोद बदामी यांनी सांगितले, की तिळारी जलसिंचन प्रकल्पाविषयी गोवा महाराष्ट्रात करार झाला आहे. त्यानुसार तिळारीच्या ८० टक्के पाण्यावर गोव्याचा अधिकार आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकार परस्परपणे कर्नाटककडे पाणी वळवू शकणार नाही.

औद्योगिक कारणास्तव महाराष्ट्रालाही पाण्याची वाढीव गरज आहे. त्यामुळे ते कर्नाटकला पाणी देण्याचा प्रश्नच उद्‍भवत नाही. कर्नाटक सरकारने महाराष्ट्र सरकारकडे पाणी वाटपाबाबत वा पाण्याच्या मागणीबाबत कोणता प्रस्ताव दिला आहे याची अधिकृत माहिती गोवा सरकारला मिळालेली नाही. अनौपचारिक चर्चेतही महाराष्ट्राच्या अधिकाऱ्यांकडून त्याची पृष्टी करण्यात आलेली नाही. त्यामुळे कर्नाटक तिळारीचे पाणी मागत आहे हा मुद्दा केवळ माध्यमांतील चर्चेच्या पातळीवर आहे.

तिळारी जलसिंचन प्रकल्प हा महाराष्ट्रात असला तरी तो गोवा व महाराष्ट्राचा संयुक्त प्रकल्प आहे. या प्रकल्पासाठी गोवा सरकारने स्वतंत्र महामंडळही स्थापन केले होते. पाणी वाटपाबाबत करार केला आहे. खर्चाचीही विभागणी झाली आहे. प्रकल्प देखभालीवर कोणी किती खर्च केला पाहिजे हेही पूर्वीच ठरले आहे. त्यामुळे त्या कराराचा भंग महाराष्ट्राला करता येणार नाही असे गोवा सरकारला वाटते. तरीही त्यांनी या घडामोडींवर लक्ष ठेवले आहे.

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे आदेश

तिळारी धरणाची उंची वाढवण्याच्या प्रकल्पावर ३३० कोटी रुपये खर्च येणार असा प्राथमिक अंदाज आहे. धरणाची उंची वाढवण्याच्या प्रकल्पाचा आराखडा तयार करण्याचा आदेश महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. यापूर्वी नियंत्रण मंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी तिळारी धरणाची उंची वाढवण्याचा विषय मांडला होता. त्यानंतर धरणग्रस्त अशा २२ कुटुंबांना गोवा सरकारने प्रत्येकी ५ लाख रुपयांची भरपाई दिली होती.

CM Pramod Sawant: यापूर्वी नियंत्रण मंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी तिळारी धरणाची उंची वाढवण्याचा विषय मांडला होता
Tillari Dam: अखेर 50 दिवसानंतर तिळारीतून आले गोव्यासाठी पाणी; पर्वरी, साळगावची तहान भागणार

गोव्याचा वाटा मोठा

तिळारी धरणात २१.९३ अब्ज घनफूट पाणी साठवले जाते. गोव्याच्या वाट्याला १६.१० अब्ज घनफूट पाणी येते, तर महाराष्ट्राकडून ५.८३ अब्ज घनफूट पाण्याचा वापर होतो. या प्रकल्पावर गोवा सरकारने एकूण खर्चापैकी ७३.३ टक्के भार उचलला होता.

तिळारीच्या पाण्यावर कर्नाटक दावाच करू शकत नाही. तो गोवा व महाराष्ट्राचा प्रकल्प असल्याने पाणी वाटपाबाबतच्‍या कराराच्या आधारे सर्व निर्णय घेतले जातात. धरणाची उंची वाढल्यावर गोव्याच्या वाट्याला आणखीन पाणी येईल.

डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com