Goa Police News: पोलिस प्रमुखच रजेवर! 'खरी कुजबुज'

पोलिस महासंचालक जसपाल सिंग यांनी रजा रद्द करण्याचा आदेश जारी केला आहे.
Goa News | Khari KujBuj
Goa News | Khari KujBuj Dainik Gomantak
Published on
Updated on

राज्यातील इफ्फीच्या काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये म्हणून पोलिस महासंचालक जसपाल सिंग यांनी पोलिस खात्यातील सर्व कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द करण्याचा आदेश जारी केला आहे. ज्यांनी या काळात रजेसाठी अर्ज केले होते, त्यांचे अर्ज रद्द केल्याचा शेरा त्यांनी मारला आहे.

ज्यांनी हा आदेश काढला आहे, तेच स्वतः रजेवर गेले आहेत. त्यामुळे यासंदर्भातची चर्चा सध्या पोलिस वर्तुळात सुरू आहे. इफ्फीसाठी आवश्‍यक असलेला पोलिस फौजफाटा कमी असल्याने विविध विभागातून जमा करण्यात आला आहे व त्यामुळे प्रत्येक पोलिस स्थानकात मनुष्यबळाची बोंबाबोंब आहे.

हे आदेश पोलिसांना लागू आहेत, तर ते वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही लागू असणे आवश्‍यक आहे. काहींनी हा आदेश येण्यापूर्वीच रजेसाठी अर्ज केले होते, तेही रद्द करण्यात आले आहेत व त्यांना ड्यूटीवर हजर राहण्याचे फर्मान काढण्यात आले आहे.

एका पोलिस उपअधीक्षकाची इफ्फी काळातील रजा मंजूर झाली होती. त्यामुळे त्याची फाईल वरिष्ठांकडे पुन्हा निर्णय घेण्यासाठी गेली. मात्र, ती रद्द न होता मंजुरी कायम ठेवण्यात आली आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांना आदेश लागत नाही का अशी चर्चा पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये सुरू आहे.

घोटाळ्यास बीपीएलवालेही कारणीभूत

सार्वजनिक वितरणासाठी आलेले धान्य चोरबाजारात जाताना पकडल्याने सध्या संबंधित खाते आरोपीच्या पिंजऱ्यात उभे आहे. मुख्यमंत्र्यांसह कोणी कितीही सारवासारव केली, तरी पकडलेले धान्य सार्वजनिक वितरण प्रणालीतील आहे हे सर्वांना माहीत आहे.

पण मुद्दा तो नाही, या प्रकरणातून गोव्यात मोठ्या संख्येने असलेली बीपीएल रेशनकार्डे व त्यावर वितरित होणारे पोतीच्या पोती धान्य हा मुद्दाही आता पुढे आला आहे.

अनेक ठिकाणी बीपीएल कार्डधारक आलिशान गाड्या घेऊन येतात व मिळणाऱ्या धान्याची पोती नेतात. ही पोती त्यांच्या घरी जातात की आणखी कुठे याचा शोध घेतला तर बरीच माहिती पुढे येईल, पण तसे करण्याचे कुणाला पडून गेलेले नाही.

मंत्र्यांची गोवा यात्रा कधी?

वर्षभरापूर्वी गोव्यात दाखल झालेले राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी हाती घेतलेली गोवा दर्शन यात्रा सुफळ संपन्न झाली आहे. याद्वारे राज्यपाल राज्यातील बहुतेक पंचायतींपर्यंत पोचले. मात्र, जे राज्यपालांना सुचले ते लोकांनी निवडून दिलेल्या मंत्र्यांना सुचले नाही अशी खंत आता लोक व्यक्त करत आहेत.

मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्री आहेत. मुख्यमंत्री विविध कार्यक्रमानिमित्त अनेक भागात पोचतात, पण असे काही मंत्री आहेत की त्यांचे तोंडही पेडणे, काणकोण, सांगे, वाळपईतील लोकांनी पाहिलेले नाही. ते राज्यपालांप्रमाणे यात्रा हाती घेणार का? म्हणजे त्यांनाही खरा गोवा काय हे कळेल ना!

आनंदाचा निर्देशांक

गोव्याचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी आपल्या गोवा दर्शन यात्रेच्या शेवटच्या चरणात मडगाव व नावेली मतदारसंघाला दिलेल्या भेटीत साक्षरतेत व सधनपणात अग्रेसर असलेल्या गोव्याचा आनंदी निर्देशांक कमी हा मुद्दा उपस्थित करून अनेकांना विचार करायला प्रवृत्त केले आहे.

वास्तविक आतिथ्यशिलतेत तसेच धर्मनिरपेक्षतेत गोवा राष्ट्रीयच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही प्रसिध्द आहे. मग राज्यपालांनी उपस्थित केलेला मुद्दा गोव्याची अनेक पटींनी वाढलेली लोकसंख्या, विकासाबाबतच्या भ्रामक समजुती व त्यातून झालेला भ्रमनिरास यातून तर निर्माण झालेला नसावा ना? किंवा गोंयचा सुशेगादपणा हरवत चालला आहे याचे हे द्योतक तर नाही ना?

फातोर्डा शायनिंग की मडगाव?

स्पर्धा असायला हवी. मात्र, स्पर्धेमुळे संबंध बिघडता कामा नयेत. मडगाव व फातोर्डा असे दोन वेगवेगळे मतदारसंघ असले, तरी आपण मडगाव व फातोर्डा हे मडगाव शहरच म्हणून ओळखतो.

फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी मडगावचे आमदार दिगंबर कामत यांना मडगाव शायनिंग की फातोर्डा शायनिंग यावर डिबेट करण्याचे जाहीर आव्हान दिले आहे. दिगंबर मुख्यमंत्री असताना मडगावात जे करू शकले नाहीत ते आपण फातोर्डा मतदारसंघात करून दाखविल्याचा दावा विजयबाब करतात आणि ते खरेही आहे.

फातोर्डा मतदारसंघात स्टेडिअम आहे, जिल्हा इस्पितळ आहे, रवींद्र भवन आहे, घाऊक व किरकोळ मासळी बाजार आहे. आयनॉक्स आहे, बस स्थानक आहे, स्वीमिंग पूल आहे, वॉकिंग ट्रॅक आहे, जिल्हाधिकारी कार्यालय आहे, आरटीओ कार्यालय आहे, सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यालय आहे, जिल्हा पंचायत कार्यालय आहे आणि मडगावात काय आहे? ओल्ड बस स्थानक, ओल्ड जिल्हा इस्पितळ, ओल्ड आरटीओ, ओल्ड जिल्हाधिकारी कार्यालय, ओल्ड मासळी बाजार मग झाले ना पक्के फातोर्डा इज शायनिंग!

Goa News | Khari KujBuj
Cooperative Week in Goa: सहकार क्षेत्र होणार डिजिटल; ई बँकिंगचे पंचायत मंत्र्यांनी दिले आश्वासन

अनैसर्गिक सौंदर्य...

फोंड्यात सध्या काय चालले तेच कळत नाही. आता हेच पाहा फोंड्यातील जुन्या बसस्थानकावर पेट्रोल पंपशेजारील चांगल्या उंच वाढलेल्या झाडांची काटछाट करण्यात आली आणि लोकांना धक्काच बसला.

या कापलेल्या झाडांच्या खोडांना विजेची रोषणाई करणाऱ्या माळा वेढण्यात आल्या आहेत. त्यामुळे नैसर्गिकता सोडून हे काय बरे आर्टिफिशियल चालले आहे तेच कळत नाही. बरं झाडं कापली ती कापली, पण रस्त्याच्या कडेची जागाही बांधकामासाठी वापरली आहे. त्यामुळे लोकांनी चालायचे कुठून असे लोकच विचारत आहेत.

पिंक फोर्सची गाडी घसरतेय...

महिलांच्या मदतीसाठी सरकारने पोलिस खात्यातर्फे पिंक फोर्स वाहने सुरू केली व त्यावर महिलांची नियुक्ती करण्यात आली होती. या योजनेला पुढील महिन्यात एक वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच ते बारगळण्याच्या स्थितीत आहे.

प्रत्येक पोलिस स्थानकाच्या क्षेत्रात तसेच किनारपट्टी परिसरात ही पिंक फोर्स वाहने फिरतीवर असतील अशी घोषणा करण्यात आली होती. मात्र, आता या पिंक फोर्सवर नेमणूक केलेल्या महिलांनीच त्यातून काढता पाय घेण्यास सुरवात केली आहे.

Goa News | Khari KujBuj
Goa Crime News: सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजवरून मृत्यूची उकल

या पिंक फोर्स वाहनावर नेमणूक करण्यात आलेल्या महिला कॉन्स्टेबल या एकाच बॅचच्या होत्या. त्यामुळे त्यांच्या बदली दुसऱ्यांना तयार करण्यात आलेले नाही. काहींचा विवाहाचा विचार सुरू झाला आहे. मात्र, त्यांच्या ड्युटीमुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत. पिंक फोर्स सेवा ही 24 तास असल्याने तीन वेगवेगळ्या वेळेत या महिलांना काम करावे लागते.

अनेकदा एखाद्यावेळी बदली कर्मचारी गैरहजर राहिल्यास पुढील ड्यूटी करण्याची वेळ येते. या सेवेसाठी कोणी महिला कॉन्स्टेबल पुढे येत नाहीत. सध्या आहेत त्यांनीही राजकीय वजन वापरून आपली सुटका करून घेण्याचे प्रयत्न चालविले आहेत.

ही चिंता की भीती ?

तहान लागल्यावर विहीर खोदणे अशी ग्रामीण भागात एक म्हण आहे. अल्ताफ या शिक्षित मुस्लिम मुलाशी ‘लिव्ह इन रिलेशन’मध्ये असलेल्या श्रद्धा या हिंदू मुलीचा खून करून ३५ तुकडे केले या विकृत घटनेचे आता पडसाद दिसायला लागले आहेत.

या घटनेमुळे ‘लव्ह जिहाद’ची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. हिंदू मुलींना आता पालकांनी इतर धर्मीय युवकांपासून लांब ठेवावे. मुलांवर धार्मिक संस्कार करावेत. हिंदू परंपरा व हिंदू संस्कृतीची शिकवण मुलांना द्यावी असे विचार आता काही हिंदू पालक सोशल मीडियावर शेर करायला लागले आहेत.

‘नो मोर अल्ताफ हॅश टॅग’, ‘नो मोर श्रद्धा’ची सोशल मीडियावर चर्चा रंगत आहे. मात्र, मुलींना धर्माची शिकवण द्या, मुलांना इतर धर्मीय युवकापासून लांब ठेवा असा सल्ला देणारेच आपल्या मुलांना गैर हिंदू शाळेत पाठवीत आहेत याला म्हणतात लोका सांगे तत्त्वज्ञान आपण मात्र कोरडे पाषाण.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com