Gomantak Bhandari Samaj भंडारी समाजाच्या घटनेत तरतूद नसतानाही ऑनलाईन आमसभा बोलावून 2021 साली केंद्रीय समिती निवडलीच कशी, असा प्रश्न उपस्थित करून आज (रविवारी) मडगावात झालेल्या भंडारी समाजाच्या आमसभेत अध्यक्ष अशोक नाईक यांच्यावर काही सदस्यांनी प्रश्नांचा भडिमार केल्याने ही आमसभा अर्ध्यावरच गुंडाळण्यात आली.
अशोक नाईक यांच्या अध्यक्षतेखाली निवडलेली ही समिती पूर्णत: बेकायदेशीर असल्याचा आरोप ॲड. अतिश बकाल, सुनील सांतीनेजकर, तुषार आसोलकर आदींनी करून अध्यक्षांवर आरोपांची सरबत्ती केली. शेवटी या गोंधळातच आमसभा आटोपती घेण्यात आली.
तब्बल दोन वर्षांनंतर पाजीफोंड-मडगाव येथे ही आमसभा बोलावली होती. यापूर्वी या समाजाच्या कार्यकारिणीचे माजी सरचिटणीस उपेंद्र गावकर यांनी या समितीच्या कारभारावर प्रचंड टीका केल्याने या आमसभेत त्याचे पडसाद उमटणार, हे अपेक्षितच होते.
याच पार्श्वभूमीवर, शुक्रवारी समाजाचे नेते उपेंद्र गावकर यांनी पणजीत पत्रकार परिषद घेऊन विद्यमान समितीवर विविध आरोप केले होते. समाजाचे अध्यक्ष अशोक नाईक यांनीही सोशल मीडियाद्वारे गावकर यांच्या आरोपांना उत्तर देत, त्यांच्यावर टीकाही केली होती.
उपेंद्र गावकर यांनी ‘भंडारी समाजाची समिती बेकायदेशीर आहे. त्यामुळे ज्ञातीबांधवांनी या आमसभेस उपस्थित राहू नये’, असे आवाहन पत्रकार परिषदेत केले होते. असे असतानाही रविवारच्या आमसभेत जवळपास २०० लोकांनी उपस्थिती लावली होती.
ही उपस्थिती कमी असल्याने इतर सदस्यांमध्ये नाराजीही निर्माण झाली. आमसभेत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. त्यातील महत्त्वाचा प्रश्न होता तो अध्यक्ष निवडीचा. ऑनलाईन पद्धतीने अध्यक्षांना कशी काय मुदतवाढ देण्यात आली, घटनेमध्ये असा कोणताही उल्लेख नसताना असा निर्णय का घेण्यात आला, असा प्रश्न अशोक नाईक यांना विचारण्यात आला.
यावर नाईक यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. त्यामुळे सदस्यांमध्ये हमरीतुमरीची भाषाही करण्यात आली. वाद वाढत असल्याचे लक्षात आल्यानंतर नाईक यांनी अर्ध्यावरच बैठक सोडली.
‘त्यावेळीच आक्षेप का नाही; अशोक नाईक यांचा सवाल
आजची आमसभा सूचिपत्रावर असलेले सर्व कामकाज पार पाडून आम्ही ती संपवली, अशी प्रतिक्रिया समाजाचे अध्यक्ष अशोक नाईक यांनी व्यक्त केली. तर समितीचे सहखजिनदार सुनील नाईक यांनी ही आमसभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली, असे सांगितले.
आमची समिती बेकायदेशीर आहे, असे वाटत होते तर तिला आक्षेप घेण्यासाठी दोन वर्षांची वाट का पाहावी लागली, त्यावेळीच आक्षेप का घेतला नाही, असा सवाल अशोक नाईक यांनी केला.
‘तो’ व्हिडिओ लावताच भर सभेत उडाली खळबळ
गेल्या वर्षी ऑनलाईन आमसभा घेतली, त्यावेळी या सभेस एक हजारहून अधिक बांधव उपस्थित होते, असे प्रसारमाध्यमांना सांगण्यात आले होते.
मात्र, त्यावेळी केवळ 72 सभासदांची उपस्थिती होती, असे सचिव पणजीकर यांनी सांगताच उपस्थित बांधवांनी तो व्हिडिओ सर्व सभासदांना ऐकून दाखवला. त्यांनी देवानंद नाईक यांची फजिती उडवली. तसेच ही समितीच नको, असा आक्रमक पवित्रा लोकांनी यावेळी घेतला.
अन् नाईक निरुत्तर
रविवारी झालेल्या या सभेत समाजाचे अध्यक्ष अशोक नाईक यांच्यावर उपस्थित युवकांच्या एका गटाने प्रश्नांचा भडिमार केला. काहीजणांनी समितीत जागा अडवून ठेवल्या आहेत, त्यांनी आपली पदे सोडावीत, अशीही मागणी केली.
या युवकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना नाईक यांना समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत. अखेर नाईक यांच्यासह 12 सदस्यांनी ही बैठक अर्ध्यावर सोडली. त्यामुळे आमसभेत प्रचंड गोंधळ निर्माण झाला.
न्यायालयात जाण्याचा इशारा
अशोक नाईक यांच्या अध्यक्षतेखालील ही समिती पूर्णपणे बेकायदेशीर आहे. कोविडचा फायदा उठवून या समितीने टर्म संपायला तीन महिने बाकी असतानाच ऑनलाईन आमसभा बोलावून आपले टर्म तीन वर्षांनी वाढवून घेतले, असा आरोप उपेंद्र गावकर यांनी करत यासंबंधी आम्ही न्यायालयात याचिका दाखल करू, अशी माहिती ''गोमन्तक''ला दिली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.