

पणजी: ढोल-ताशांचा निनाद, ‘मोरया’चा जयघोष, अंगणात पडलेला सडा, दाराशी खुललेली रांगोळी आणि घराघरांत सुरू झालेली लगबग... लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी सारा गोमंतक सज्ज झाला असून सर्वत्र चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.
सोमवारी गणेश चतुर्थीच्या मंगलपर्वावर विघ्नहर्त्या गणरायाच्या स्वागतासाठी गोमंतकीयांच्या उत्साहाला उधाण आले आहे. वर्षभर जपून ठेवलेल्या परंपरा, कुटुंबीयांच्या भेटीगाठी आणि भक्तिभावाच्या वातावरणामुळे चतुर्थीची चाहूल आता प्रत्येक घराच्या उंबरठ्यावर जाणवू लागली आहे.
चतुर्थी म्हणजे केवळ पंचांगातील एक तिथी नव्हे; ती गोमंतकीयांच्या भावविश्वातील जिवंत परंपरा आहे. गणपतीची मूर्ती घरी आणण्यापासून माटोळी सजविण्यापर्यंत, नैवेद्यापासून आरतीच्या स्वरांपर्यंत प्रत्येक गोष्टीत मातीशी, निसर्गाशी आणि कुटुंबाशी जोडलेली आपुलकी दिसते. त्यामुळे चतुर्थीच्या आदल्या दिवशीच घराघरांत लगबग शिगेला पोहोचली होती.
मखर उभारताना हातांना लागलेली लगबग, मोदकांच्या सुगंधाने दरवळणारे स्वयंपाकघर, आरतीसाठी सज्ज झालेली ताटे आणि बाप्पासमोर तेवणारा दिवा... या साऱ्यांतून चतुर्थीचे खरे सौंदर्य उमलते. मोठ्यांच्या श्रद्धेला लहानग्यांच्या उत्साहाची जोड मिळते आणि घराचे रूपच पालटून जाते. वर्षभर आपापल्या कामात व्यस्त असलेली माणसे या निमित्ताने पुन्हा एका छताखाली येतात. त्यामुळे गणेशोत्सव हा देवपूजेइतकाच नात्यांचा, आठवणींचा आणि एकत्र येण्याचा उत्सव ठरतो.
निसर्गाशी घट्ट नाते
चतुर्थीच्या या आनंदात निसर्गालाही विशेष स्थान आहे. रानावनातून आणलेली पत्री, फळाफुलांनी सजलेली माटोळी आणि स्थानिक परंपरांशी जोडलेले पदार्थ यामुळे गोमंतकीय चतुर्थीला मातीचा आणि निसर्गाचा सुगंध लाभतो. बदलत्या काळानुसार उत्सवाचे स्वरूप बदलत असले तरी त्यामागची भावना मात्र तितकीच जिवंत आहे—निसर्ग जपायचा, परंपरा जपायची आणि ही संस्कृती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायची.
आजपासून घुमटांच्या निनाद...
उद्या सकाळी पूजा-अर्चेने गणरायाचे स्वागत होईल आणि ‘मोरया रे ’च्या जयघोषाने घराघरांत मंगलध्वनी घुमेल. घुमटांचा निनाद, आरतीचे स्वर आणि भक्तीमय वातावरणाने गोमंतक दुमदुमून जाईल. कुणी मनातील इच्छा बाप्पाच्या चरणी ठेवेल, कुणी कुटुंबाच्या सुखासाठी प्रार्थना करेल, तर कुणी त्याच्या प्रसन्न मुखाकडे पाहत मन भरून घेईल.
३ दिवसांत कोटींची उलाढाल
काही दिवसांपूर्वी बाजारात मंदी दिसत होती. मात्र,गेल्या तीन दिवसांत कोट्यवधींची उलाढाल झाल्याने व्यापारी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात आले. बाजारपेठांमध्ये फुले,फळे, पत्री,माटोळीचे साहित्य आणि चतुर्थीसाठी लागणाऱ्या विविध वस्तूंनी रंग भरला होता.कुठे गणरायाच्या मूर्तीला अंतिम रूप दिले जात होते,तर कुठे मखर सजविण्याची लगबग सुरू होती. परदेशात तसेच अन्य राज्यांत असलेले गोमंतकीयही सणासाठी गावी परतल्याने गावागावांत पुन्हा एकदा कुटुंबीयांच्या भेटीगाठींना उधाण आले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.