

मडगाव: वेर्णा येथे एका शीतगृहात साठवून ठेवलेले सुमारे १७०० किलो चिकन अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) दोन दिवसांपूर्वी नष्ट केले. धक्कादायक बाब म्हणजे, यातील काही चिकन जून महिन्यापासून साठवून ठेवण्यात आले होते.
ख्रिसमसच्या मोसमात ते बाजारात विक्रीसाठी आणण्याचा बेत होता, अशी माहिती पुढे आली आहे. या चिकनची किंमत सुमारे साडेपाच लाख रुपये होती. गोव्यात पर्यटन हंगाम सुरू झाल्याने चिकनच्या विक्रीत वाढ झाली आहे. मात्र, पर्यटकांसह स्थानिक नागरिकांच्या ताटात जाणारे चिकन आरोग्यासाठी सुरक्षित आहे का, असा प्रश्न एफडीएच्या अलीकडील कारवाईमुळे उपस्थित झाला आहे. वेर्णा येथे शीतगृहात सापडलेला चिकनचा साठा याचे गंभीर उदाहरण ठरले आहे.
गोवा पोल्ट्री उत्पादन विक्रेते संघटनेचे अध्यक्ष प्रिस्को सिक्वेरा यांनी ही घटना केवळ एक उदाहरण असल्याचे सांगितले. गोव्यात अनेक ठिकाणी अशा प्रकारे चिकनचा साठा आणि विक्री होत असल्याचा दावा त्यांनी केला. या प्रकारांना आळा घालण्यासाठी सक्षम यंत्रणा आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.दिल्ली, कर्नाटक आणि महाराष्ट्रातील काही भागांतून गोव्यात आणले जाणारे चिकन अत्यंत अस्वच्छ पद्धतीने वाहतूक करून आणले जाते.त्यामुळे ते आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते, असे सिक्वेरा यांनी सांगितले. दूरच्या राज्यांतून अशा प्रकारे आणल्या जाणाऱ्या चिकनवर बंदी घालण्याची मागणी केल्याचे त्यांनी सांगितले.
ऑफ सिझनमध्ये खरेदी करून साठवणूक
राज्यात श्रावण महिन्यात मांसाहार टाळला जातो. त्यानंतर दिवाळीपर्यंतही चिकनची मागणी तुलनेने कमी असते. त्यामुळे या काळात चिकनचे दर घसरतात. काही विक्रेते या संधीचा फायदा घेत मोठ्या प्रमाणात चिकन खरेदी करून शीतगृहात साठवतात. दिवाळीनंतर चिकनच्या विक्रीला तेजी येते, तर ख्रिसमसच्या काळात मागणी आणखी वाढते. या काळात दरही वाढलेले असतात. त्यामुळे ऑफ सिझनमध्ये खरेदी केलेला साठा नंतर विक्रीसाठी बाहेर काढला जातो.
पहाटे किंवा रात्रीचीच वाहतूक
१. गोव्यात चिकनचा दर किलो ३४० रुपये असताना दिल्ली आणि अन्य भागांतून आणलेले चिकन २५० ते २७० रुपये किलो दराने उपलब्ध होते.
२. कमी दरामुळे काही विक्रेते या चिकनला पसंती देतात. मात्र, नाकारलेल्या कोंबड्यांचे मांस अशा प्रकारे विकले जाते.
३. दिल्लीहून येणारे चिकन पहाटे सहाच्या सुमारास किंवा रात्री आठनंतर उतरवले जाते. एफडीएच्या तपासणीचा ससेमिरा चुकवण्यासाठीच या वेळांची निवड केली जाते.
४. एफडीएचे कार्यालय सकाळी ९ वाजता सुरू होते आणि अधिकारी साधारणत: रात्री ८ वाजेपर्यंत काम करतात.
१८ लाखांच्या साठ्याची विल्हेवाट
एफडीएच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील दोन महिन्यांत अस्वच्छ पद्धतीने गोव्यात आणलेले सुमारे सहा हजार किलो चिकन नष्ट करण्यात आले आहे. या चिकनची बाजारातील एकूण किंमत सुमारे १८ लाख रुपये होती. वेर्णा येथील शीतगृहात पकडलेल्या १७०० किलो चिकनची किंमत साडेपाच लाख रुपये होती. या कारवाईमुळे चिकनच्या साठवणुकीसह वाहतुकीच्या पद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दिल्लीहून दररोज चार ते पाच टन चिकन रेल्वेने गोव्यात आणले जाते. या वाहतुकीला तब्बल ३६ तास लागतात. कर्नाटक आणि महाराष्ट्रातूनही चिकन आणले जाते. चार तासांपेक्षा अधिक काळ वाहतूक करायची असल्यास चिकन उणे १० अंश तापमानात ठेवणे आवश्यक असते. मात्र, थर्माकोलच्या बॉक्समध्ये केवळ बर्फ घालून चिकन आणले जाते.
- प्रिस्को सिक्वेरा, अध्यक्ष (गोवा पोल्ट्री उत्पादन विक्रेते संघटना
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.