Goa Electricity : राज्यातील प्रत्येक मतदारसंघामध्ये 60 कोटींच्या भूमिगत वीज वाहिन्या घालण्याचे काम सुरू आहे.
पावसाळापूर्व वीज खात्यातर्फे वीज उपकरणांची दुरुस्ती तसेच वीज तारांवर आलेली झाडेझुडपे तसेच झाडांच्या फांद्या तोडण्याची कामे काही तासांपुरती वीज खंडित करून सुरू झाली आहे.
पावसाळ्यात अधिक काळ वीजपुरवठा खंडित होऊ नये, यासाठी आवश्यक ती तयारी ठेवण्याबाबत आराखडा तयार करण्यात येत आहे, अशी माहिती वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी दिली.
दक्षिण गोव्यातील दरवर्षीप्रमाणे पावसाळापूर्व कामे हाती घेण्यासाठी येत्या 21 मे रोजी सकाळच्या सत्रात किमान 3 ते 4 तास वीज पुरवठा बंद केला जाणार आहे.
दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात झाडे उन्मळून किंवा मोडून पडत असल्याने किंवा झाडांच्या फांद्या वीज वाहिन्यांवर पडल्याने वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढत आहेत. प्रत्येक मतदारसंघासाठी मोबाईल ट्रान्स्फॉर्मरची सोय करण्यात आली आहे.
मात्र अनेकदा एकाच मतदारसंघात एकापेक्षा अधिक ठिकाणी वीज समस्या उद्भवत असल्याने त्यावर मात करणे वीज खात्याच्या आवाक्याबाहेर जात आहे.
ग्रामीण भागातील मतदारसंघात मोठ्या प्रमाणात झाडी असल्याने वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार हे घडत असतात. वीज खात्यात मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची कमतरता आहे, मात्र त्यासाठी काही कंत्राटी कामगार घेण्याबाबत विचार सुरू आहे, अशी माहिती खात्याच्या अधिकाऱ्याने दिली.
अभियंत्यांना तातडीने वीज उपकरणे खरेदी करायची आहेत, त्याची प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना वरिष्ठ पातळीवर दिल्याचे ते म्हणाले.
वाहनांची कमतरता!
ज्या भागात वीज खंडित होण्याचे प्रकार वारंवार घडतात तसेच जुन्या ट्रान्स्फॉर्मर तसेच फिडरच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. पावसाळ्यात रात्रीच्यावेळी वीज खंडित झाल्यास ती पूर्ववत करण्यासाठी काही मतदारसंघासाठी एकच वाहन असते.
सांताक्रुझ व सांत आंद्रे या दोन वेगवेगळ्या मतदारसंघासाठी वीज कर्मचाऱ्यांनी एकच गाडी असते. त्यामुळे एकापेक्षा अधिक ठिकाणी वीज खंडित झाल्यास लोकांना काळोखात राहण्याची पाळी येते.
त्यामुळे त्यावर तोडगा काढण्यासाठी भूमिगत वीज वाहिन्यांचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची गरज आहे, असेही ढवळीकर म्हणाले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.