

मडगाव: दंड आकारणीच्या मुद्यावरून गोव्यातील वीज बिलांची रक्कम अचानक वाढू लागल्यामुळे दक्षिण गोव्यातील किनारपट्टी भागात लोकांमध्ये असंतोषाचे वातावरण पसरले आहे. सामान्य ग्राहकांप्रमाणेच पर्यटन व्यावसायिकांनीही या दरवाढीला विरोध केला आहे.
ही दरवाढ अशीच कायम राहिल्यास आमच्यावर आर्थिक संकट कोसळेल, असा दावा त्यांनी केला आहे. या संकटातून बाहेर काढण्यासाठी त्यांनी राजकारण्यांचे उंबरठे झिजवण्यास सुरुवात केली आहे. बाणावलीत काहींना ५० हजारांहून अधिक बिले आली आहेत.
बाणावली मतदारसंघातील सुरावली व सखुभाट भागातील वीज ग्राहकांनी स्थानिक आमदार वेन्झी व्हिएगस यांची भेट घेऊन आपल्या अडचणी मांडल्या. बाणावली मतदारसंघात काहींना ५० हजारांपासून एक लाख रुपयांपर्यंत वीज बिल आल्याचे त्यांनी सांगितले.
एवढी मोठी रक्कम लोक कशी भरतील, असा सवाल व्हिएगस यांनी उपस्थित केला. हे असेच सुरू राहिल्यास लोकांना रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
डिजिटल मीटरमधील नोंदींच्या आधारे अशा तफावतींचा शोध घेण्याची मोहीम सुरू करण्यात आली असून डिजिटल मीटरमध्ये कमाल मागणी (मॅक्सिमम डिमांड) नोंदवण्याची सुविधा उपलब्ध असल्याने ग्राहकाने किती भार वापरला याची अचूक नोंद ठेवली जाते. या नोंदींच्या आधारे मंजूर क्षमतेपेक्षा अधिक वापर आढळल्यास दरमहा दंडात्मक आकारणी केली जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.