Goa Election: गोव्यात आम आदमी पार्टीच भाजपला पर्याय ठरणार

असा ठाम विश्वास मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार ॲड. अमित पालेकर यांनी व्यक्त केला.
Amit Palekar
Amit PalekarDainik Gomantak

पणजी: राज्यात आम आदमी पक्षाचे सरकार सत्तेवर येताच विकासकामांच्या नावाखाली गेली अनेक वर्षे सुरू असलेला भ्रष्टाचार रोखण्याचे लक्ष्य राहील. पक्षाने जाहीर केलेल्या योजना सरकारी महसुलातून लोकांसाठी देण्याचा प्रयत्न असेल. राज्यातील बेरोजगारी दूर करण्यासाठी सहा महिन्यांत खाण व्यवसाय सुरू केला जाईल. राज्यात 'आप'च्या उमेदवारांना मोठा प्रतिसाद मिळत असून पुढील सरकार हे ‘आप’चे (AAP) असेल यात शंका नाही. आम आदमी पक्ष हा भाजपला (BJP) पर्याय असेल, असा ठाम विश्‍वास आपचे सांताक्रुझचे व पक्षाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार ॲड. अमित पालेकर यांनी ‘गोमन्तक’चे संपादक संचालक राजू नायक यांनी घेतलेल्या मुलाखतीत व्यक्त केला. (Amit Palekar AAP Latest News)

Amit Palekar
ज्येष्ठ साहित्यिक रामनाथ नाईक यांचे निधन

प्रश्न: राजकारणात पाऊल ठेवताच व आम आदमी पक्षामध्ये अनुभवी नेते असतानाही तुम्हाला आम आदमी पक्षाने मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून घोषणा केली?

उत्तर: मी हल्लीच राजकारणात प्रवेश केला तरी माझे समाजाशी पूर्वीपासून संबंध आहेत. हे संबंध मी वकिली व्यवसायातून तसेच गरजवंताना मदत करण्यामधून बनवले आहेत. काही लोक स्वतःच्या गुणवत्तेवर उंची गाठतात त्यापैकी मी असू शकतो त्यामुळेच तर पक्षाच्या प्रमुखांनी मला हा मान दिला. पक्षात प्रवेश केल्यापासून केलेल्या कामाची पावती व माझ्या विचारांना संधी देण्यात आली आहे. जुने गोवे येथील बेकायदा बांधकामाविरोधात केलेले उपोषण, कोविड काळात समाजकार्य म्हणून केलेले कार्य, 22 वर्षे वकिली व्यवसायात असल्याने लोकांशी आलेला संबंध याचा लोकांशी जुळवून घेण्यात मदत झाली आहे. सामान्य व गरीबांना मदतीचा हात नेहमीच पुढे ठेवला त्याचा हा मान असावा.

प्रश्न: आम आदमी पक्षाने गोव्याला भंडारी समाजाचा मुख्यमंत्री देण्याची घोषणा केली होती म्हणून या समाजाची मते मिळवण्यासाठी तुमची मुख्यमंत्रीपदासाठी निवड झाली का?

उत्तर: मी भंडारी समाजाचा एक सुशिक्षित, बुद्धिमान व सामाजिक संपर्क असलेला व्यक्ती आहे. भंडारी या राज्यात उपेक्षित राहिलेल्या समाजाचा विकास करण्यासाठी पक्षाने विचार करूनच माझी निवड केली. इतरमागसवर्गीय समाजामध्ये अनेक सुशिक्षित मात्र त्यांना जे पाठबळ हवे ते सरकारकडून मिळालेले नाही. आम आदमी पक्षाने कधीच जात-पात असा भेदभाव केलेला नाही. उमेदवारी देतानाही त्याचा कधीच विचार करण्यात आला नाही. गेली 60 वर्षे गोव्यामध्ये जातीवर राजकारण केले जात आहे. बहुजन समाजाचा विकास होण्यासाठी कोणत्याच सरकारने या समाजाला संधी दिली नाही. येथील लोक उपेक्षित नाही तर राजकारण उपेक्षित असे पालेकर यांनी स्पष्ट केले.

प्रश्न: शिरोड्यातील महादेव नाईक हे काही नवीन चेहरा नाही?

उत्तर: नाईक यांचे शिरोडा मतदारसंघातील कार्य मोठे आहे. त्यांच्यावर काही आरोप झाले असतील व असे आरोप राजकारणात प्रत्येकावर होत असतात. भाजपने 34 उमेदवार दिले आहेत त्यातील 28 उमेदवार हे नवे असले तरी ते आयात केलेले आहेत. भाजपमध्ये चांगले नवे चेहरे आहेत त्यापैकी उत्पल पर्रीकर. त्यांना का स्थान दिले गेले नाही. भाजप सत्तेसाठी भुकेलेला पक्ष आहे. त्यामुळे त्यांनी उमेदवार निवडताना त्याचे चारित्र्य व प्रामाणिकपणा नव्हे तर विजयाची क्षमता तसेच पक्षाचा स्वार्थ हे निकष ठेवूनच पुढे जात आहेत. ज्या उमेदवारावर मागील निवडणुकीत या भाजपच्या नेत्यांनी प्रचारात शिंतोडे उडवले होते त्याला कवटाळले आहे त्यातच भाजपची वाटचाल दिसून येत आहे. लोकांना हे रुचलेले नाही.

प्रश्न: भाजपने उमेदवारी नाकारल्यानंतर उत्पल पर्रीकर यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचे ठरवले आहे तर त्याला आम आदमी पक्ष पाठिंबा देण्यास तयार आहे का?

उत्तर: उत्पल पर्रीकर याने आता गरुडझेप घेण्यासाठी सर्व तयारी ठेवली पाहिजे. आम आदमी पक्षात त्याने प्रवेश केला तर त्याला पणजीतून उमेदवारी देण्याची तयारी होती. वाल्मिकी नाईक यांनीही स्वतः मोठेपणा दाखवत आपण मागे हटून ही उमेदवारी त्याला देण्याची तयारी दाखवली होती. अपक्ष उमेदवार पर्रीकर यांना आपतर्फे पाठिंबा देणे अशक्य कारण जिंकून आल्यावर तो भाजपमध्ये जाणार नाही याबाबत त्यांनी भूमिका स्पष्ट करायला हवी.

Amit Palekar
'सत्तेच्या सारीपाटासाठी आम्हाला गृहकलह नकोय'

प्रश्न: आम आदमी पक्ष हा गोव्याबाहेरील पक्ष असे राष्ट्रीय व प्रादेशिक पक्ष प्रचार करत आहेत तसेच आपने मोफत विविध योजना जाहीर केल्यावर सरकारचा खर्च वाढतो?

उत्तर: मगो व गोवा फॉरवर्ड वगळता काँग्रेस व भाजप हे प्रादेशिक पक्ष आहेत का? भ्रष्टाचार बंद झाल्यास लोकांना मोफत योजना देण्यात काहीच खर्च वाढत नाही. अटल सेतू, झुआरी पूल या प्रकल्पांवरील अंदाजित खर्चापेक्षा कितीतरी अधिक खर्च भाजप सरकारने वाढवला आहे. या वाढीव खर्चातून जो खर्च वाचेल व भ्रष्टाचार बंद करून त्यातून वाचणाऱ्या महसुलातूनर लोकांना या योजना दिल्या जातील असे त्यांनी सांगितले.

प्रश्न: खाण व्यवसाय हा सरकारी महसुलाचा कणा आहे. खाणींचा लिलाव केल्यास सुमारे एक हजार कोटी रुपये तिजोरीत येतील त्यामुळे खाणींचा लिलाव सुरू करणे कितपत योग्य आहे तसेच शाश्‍वत खाण व्यवसाय कशाप्रकारे सुरू करणे शक्य आहे का? खाण घोटाळाप्रकरणी चौकशीही रेंगाळत पडली आहे?

उत्तर: खाणींचा पुनर्लिलाव व्हावा हे पक्षाचे मत आहे. सत्तेवर आल्यापासून सहा महिन्यात राज्यातील खाण व्यवसाय सुरू करण्याबाबत पक्ष ठाम आहे. भाजप सरकारच्या स्वार्थी हेतूमुळे खाण व्यवसाय सुरू होत नाही. खाण घोटाळ्यासाठी जी सरकारने ‘एसआयटी’ स्थापन केली आहे ते चौकशी गेली दहा वर्षे करत असले तरी त्यातून काहीच निष्पन्न झालेले नाही. आपचे सरकार सत्तेवर आल्यावर खाण घोटाळा केलेल्यांविरुद्ध कडक कारवाई केली जाईल. 35 हजार कोटी नकोच निदान 3 हजार कोटी तरी वसूल करून या सरकारने दाखवण्याची गरज होती. या सरकारचा स्वार्थ व भ्रष्टाचार यामुळेच ते काहीच करू शकलेले नाही, असा आरोप त्यांनी केला.

प्रश्न: राज्यातील खाणी बंद आहेत तसेच पर्यटन बीच व्यवसायही धोक्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील बेरोजगारी कमालीची वाढली आहे. यावर उपाय म्हणून तसेच शाश्‍वत उपाययोजना आपकडे काय आहेत?

उत्तर: गोव्याच्या पर्यटनसंदर्भात गोव्याबाहेर जाहिरातीवर खर्च केला जात आहे त्याऐवजी गोव्यात मनोरंजन पार्कवर होण्याची गरज आहे. मात्र हे सरकार पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी गेमिंग झोनवर भर देत आहे. अजून सरकारचा सीझेडएमपी तयार झालेला नाही. समुद्रकिनाऱ्यांवरील कर्कश संगीत नृत्यरजनी पार्ट्यांवर नियंत्रण नाही की जाणूनबुजून त्यावर लक्ष दिले नाही. त्यासाठी ध्वनी प्रदूषण कायद्यात दुरुस्तीची गरज आहे.

प्रश्न: राज्यात पुन्हा भाजपचेच सरकार येईल अशी हवा केली जात आहे त्यामुळे आपचे आमदार भाजपमध्ये जाणार नाहीत याची काय शाश्‍वती आहे? राज्यातील मतदार की आमदार भ्रष्ट?

उत्तर: आमचे उमेदवार प्रामाणिक आहेत व त्यांच्यावर ‘आप’चा पूर्ण विश्‍वास आहे. गेली अनेक वर्षे ते पक्षाशी एकनिष्ठ आहेत. निवडणूक (Election) आल्यावर काही मतदार त्यांना दाखविलेल्या आमिषांकडे वळतात. त्यामुळे काहीअंशी ते सुद्धा या भ्रष्ट व्यवहाराला जबाबदार आहेत. यावेळी मतदार अशा आमिषांना बळी पडणार नाही. मी केलेल्या दौऱ्यात लोकांची विचारसरणी काही प्रमाणात बदललेली आहे, असे मत व्यक्त केले.

Amit Palekar
'आपण भ्रष्टाचारापासून मुक्त आहोत का? याचे नोकरशहांनी आत्मपरीक्षण करावे'

प्रश्न: अनेक वर्षांचा भ्रष्टाचार रोखण्याचे लक्ष्य आम आदमी पक्षाची सत्ता राज्यात आल्यास प्रथमच इतरमागासवर्गीय समाजाचा मुख्यमंत्री होईल यावरून राजकीय मतभेद होण्याची शक्यता आहे, असे आपणास वाटते का?

उत्तर: सध्याचे भाजपचे काय राजकारण सुरू हे सध्या सर्व पाहत आहेत. मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) असताना व आताचे भाजपचे राजकारण यामध्ये जमीन आस्मानाचा फरक आहे. राज्यात बहुजन समाजाने भाजप पक्ष उभा केला. त्यामुळेच या निवडणुकीत आता आम आदमी पक्ष हा भाजपला पर्याय झाला आहे.

प्रश्न: राज्यात निवडणुकीत असलेले अनेक राजकीय पक्ष व गेल्या दोन वर्षापासून लोकांच्या आंदोलनात सहभागी होऊन प्रश्‍न सोडविण्यास घेतलेला पुढाकार हे पाहता आम आदमी पक्ष स्वबळावर सरकार राज्यात बनवू शकेल का?

उत्तर: राज्याच्या उत्तर ते दक्षिणेपर्यंत मी केलेल्या दौऱ्यात आम आदमी पक्षाच्या उमेदवाराबरोबर मोठ्या संख्येने कार्यकर्ते सोबत आहेत. प्रचारही जोरात सुरू आहे. या पक्षाने गोमंतकियांना नवे चेहरे दिले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com