

मडगाव: गोव्यात येणाऱ्या पर्यटकांचे समुद्रात बुडून मृत्यू होत असल्याने गोव्याचे समुद्रकिनारे धोकादायक असल्याची प्रतिमा काही वर्षांपूर्वी निर्माण झाली होती. मात्र प्रत्यक्ष आकडेवारी वेगळे चित्र दाखवत आहे. गोव्यात समुद्रापेक्षा नद्या, कालवे, खाड्या, विहिरी आणि इतर पाणवठे अधिक जीवघेणे ठरत असल्याचे यंदाच्या घटनांवरून स्पष्ट झाले आहे.
यावर्षी १ जानेवारी ते २० एप्रिल या ११० दिवसांत राज्यात तब्बल ४२ जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. त्यापैकी केवळ १० जणांचा मृत्यू समुद्रात, तर उर्वरित ३२ मृत्यू इतर पाणवठ्यांमध्ये झाले आहेत. गोव्यात दर तिसऱ्या दिवशी एकाला जलसमाधी मिळत असल्याचे स्पष्ट होते.
आतापर्यंत जी आकडेवारी दै. ‘गोमन्तक’ला उपलब्ध झाली आहे, यंदा सर्वाधिक मृत्यू नद्यांमध्ये झाले आहेत. आंघोळ करताना किंवा मासेमारीदरम्यान १३ जणांचा बुडून मृत्यू झाला. त्याखालोखाल समुद्रातील मृत्यूंची संख्या १० आहे.
तसेच नद्यांत उड्या मारून आत्महत्या करणारे ५, खाडीत बुडून मृत्यू ४, कालव्यात बुडून मृत्यू ३, विहिरीत बुडून २, बंधाऱ्यात बुडून २, स्वीमिंग पूलमध्ये १ तर बादलीतील पाण्यात बुडून दहा महिन्यांच्या एका बालकाचा मृत्यू झाला आहे. तसेच काल केपेत दोन युवक बुडाले. इग्नेशियस शॅरी (२४, फातोर्डा) आणि हरजितसिंग धनू (२२, उत्तराखंड) अशी मृतांची नावे आहेत. हे दोघेही रविवारची सुट्टी मौजमजेत घालवण्यासाठी मडगाव येथून केपे येथे आले होते. दुपारच्या सुमारास कालव्यात उतरल्यावर पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने ते वाहून गेले.
स्थानिकांसह पर्यटक, कामगारांचाही बळी
बुडून मृत्यू झालेल्या ४२ जणांपैकी २७ जण स्थानिक गोमंतकीय आहेत. त्यातील दहा जण आंघोळीसाठी पाण्यात उतरले असताना दुर्घटनेत सापडले. तसेच ६ पर्यटक व ९ बिगरगोमंतकीय कामगारांचा बुडून मृत्यू झाला.
बुडून मृत्यूच्या वारंवार घडणाऱ्या घटना चिंताजनक आहेत. काही प्रमाणात निष्काळजीपणा कारणीभूत असला, तरी प्रशासनाचे दुर्लक्षही तितकेच जबाबदार आहे. धोकादायक पाणवठ्यांवर सूचना फलक लावणे, सुरक्षाव्यवस्था उभारणे आणि जनजागृती मोहीम राबवणे अत्यावश्यक आहे..
- ॲड. संजीत सावंत देसाई
आवश्यक उपाययोजना
सर्व पाणवठ्यांसाठी स्वतंत्र आणि सर्वसमावेशक सुरक्षा धोरण
पंचायत व नगरपालिका स्तरावर प्रशिक्षित स्वयंसेवकांची फळी
स्थानिक स्वराज्य संस्थांकडे जीव वाचवणारी सामग्री उपलब्ध करणे
धोकादायक ठिकाणी इशारा फलक लावणे
भरल्या पोटी किंवा मद्यप्राशनानंतर पाण्यात न उतरण्याबाबत जनजागृती
शाळा आणि महाविद्यालयांत जलसुरक्षा प्रशिक्षण सुरू करणे
समुद्रकिनाऱ्यांवर जीवरक्षकांचा फायदा
जीवरक्षकांमुळे समुद्रातील मृत्यूंवर नियंत्रण आले आहे. मागील ११० दिवसांत विविध किनाऱ्यांवर ४१ जणांचे प्राण वाचवण्यात जीवरक्षकांना यश आले आहे. याउलट नद्या, कालवे, खाड्या आणि इतर पाणवठ्यांवर अशा प्रकारची सुरक्षा यंत्रणा नाही. धोकादायक स्थळांवर सूचना फलकही नसल्याने अपघातांचे प्रमाण वाढत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.