Goa Divorce Cases: गेल्‍या 5 वर्षांत तुटल्‍या 2,135 जोडप्‍यांच्‍या साताजन्‍माच्‍या गाठी, राज्‍यात घटस्‍फोटांचा 'स्‍फोट'; सासष्‍टी आघाडीवर

Goa divorce statistics last 5 years: आयुष्‍यभर एकमेकांसोबत राहण्‍यासाठी, जगण्‍यासाठी पुरुष आणि स्‍त्री लग्न करतात. साताजन्‍माच्‍या आणाभाका करून नव्‍या आयुष्‍याला सुरुवात करतात.
Goa Divorce Cases
Goa Divorce CasesDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: आयुष्‍यभर एकमेकांसोबत राहण्‍यासाठी, जगण्‍यासाठी पुरुष आणि स्‍त्री लग्न करतात. साताजन्‍माच्‍या आणाभाका करून नव्‍या आयुष्‍याला सुरुवात करतात. पण, अनेकांच्‍या साताजन्‍माच्‍या गाठी विविध कारणांमुळे मध्‍येच तुटतात आणि घटस्‍फोट घेऊन ते एकमेकांपासून वेगळे होतात. राज्‍यात अशा घटस्‍फोटांच्‍या प्रकरणांत प्रत्‍येक वर्षी वाढ होत असून, गेल्‍या पाच वर्षांच्‍या काळात २,१३५ जणांचे संसार अर्ध्यावरच मोडल्‍याचे सरकारी आकडेवारीतून समोर आले आहे.

२०२१ ते २०२४ या चार वर्षांच्‍या काळात प्रत्‍येक वर्षी घटस्‍फोटांच्‍या आकडेवारीत वाढ झाली. गतवर्षी म्‍हणजेच २०२५ मधील आकडा २०२४ च्‍या तुलनेत २५ ने कमी असला, तरी या दोन्‍ही वर्षी घटस्‍फोटांची संख्‍या ५०० पेक्षा अधिक झालेली आहे.

यात सासष्‍टी तालुका आघाडीवर असून, त्‍यानंतर तिसवाडीचा क्रमांक लागत असल्‍याचे आकडेवारीतून दिसून येते. सासष्‍टीत २०२१ मध्‍ये केवळ २५ जोडप्‍यांचे घटस्‍फोट झालेले होते. २०२५ मध्‍ये हा आकडा १७७ पर्यंत पोहोचला. तिसवाडी, मुरगाव, केपे आणि फोंडा या तालुक्‍यांतही दरवर्षी घटस्‍फोटांची संख्‍या वाढत असून, ही बाब समाज आणि कुटुंब व्‍यवस्‍थेसाठी चिंताजनक बनत चाललेली आहे.

दरम्‍यान, २०२१ मध्‍ये राज्‍यात २४५ घटस्‍फोट झालेले होते. २०२२ मध्‍ये त्‍यात वाढ होऊन हा आकडा ३८२ झाला. २०२३ मध्‍ये पुन्‍हा त्‍यात वाढ होऊन यावर्षी ४३५ जोडप्‍यांनी घटस्‍फोट घेतले. २०२४ मध्‍ये घटस्‍फोटांची संख्‍या ५०० वर जाऊन ती ५४९ इतकी झाली. २०२४ च्‍या तुलनेत २०२५ मध्‍ये ही संख्‍या २५ ने कमी झाली. पण, यावर्षीही हा आकडा ५०० च्‍या वर गेल्‍याचेही आकडेवारीतून दिसून येते.

Goa Divorce Cases
Goa Mankurad Mango: 5 हजारांवरून दर थेट 800 रुपयांवर, स्वस्त झाला 'मानकुराद'! येत्या आठवड्यात दर अजून कोसळण्याची शक्यता

समुपदेशन हाच उपाय : ॲड. हर्षा नाईक

पती-पत्‍नींचा एकमेकांवरील संशय, अहंकाराची भावना, विवाहबाह्य संबंध अशी अनेक कारणे घटस्‍फोटासाठी कारणीभूत आहेत. कधी-कधी क्षुल्लक कारणांवरूनही पती-पत्‍नीकडून न्‍यायालयात घटस्‍फोटासाठी अर्ज केला जातो, असे ॲड. हर्षा नाईक म्‍हणाल्‍या.

राज्‍यात गेल्‍या काही वर्षांपासून घटस्‍फोटांच्‍या प्रकरणांत निश्‍चित वाढ होत असून, त्‍यावर नियंत्रण आणणे अत्‍यंत गरजेचे आहे. त्‍यासाठी अशा मानसिकतेत गेलेल्‍या जोडप्‍यांचे योग्‍य पद्धतीने समुपदेशन होणे गरजेचे आहे. न्‍यायालयात येणाऱ्या बहुतांशी प्रकरणांतील जोडप्‍यांच्‍या समुपदेशनावर आम्‍ही भर देत आहोत, असेही त्‍यांनी सांगितले.

गेल्‍या पाच वर्षांतील घटस्‍फोट

तालुका २०२१ २०२२ २०२३ २०२४ २०२५ एकूण

तिसवाडी ३२ ३७ ६१ ८७ ९५ ३१२

बार्देश १० २३ २७ ८६ २ १४८

पेडणे ८ ११ १५ ११ ११ ५६

डिचोली १६ २० २१ २० १३ ९०

सत्तरी २१ १२ १४ १३ २३ ८३

मुरगाव ४० ४३ ४१ ५० ७४ २४८

सासष्‍टी २५ १३९ १६६ १४९ १७७ ६५६

केपे २८ २२ २६ २३ २४ १२३

काणकोण ८ १८ १४ १६ १२ ६८

सांगे ७ १३ ७ १४ ८ ४९

धारबांदोडा १ ० ३ ०२ ४ १०

फोंडा ४९ ४४ ४० ७८ ८१ २९२

एकूण २४५ ३८२ ४३५ ५४९ ५२४ २,१३५

प्रकरणे लवकर निकाली लागणे गरजेचे : तुयेकर

गत विधानसभा अधिवेशनात घटस्‍फोटांच्‍या वाढत्‍या प्रकरणांवर प्रकाश टाकलेल्‍या आमदार उल्‍हास तुयेकर यांच्‍याशी संपर्क साधला असता, वाढते घटस्‍फोट नियंत्रणात आणण्‍यासाठी सरकार पातळीवरून अशा जोडप्‍यांच्‍या समूपदेशनावर भर देण्‍याची गरज असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. सोबतच अशी प्रकरणे लवकर निकाली लावण्‍यासाठी न्‍यायालयांनी आठवड्यातील किमान दोन दिवस अशा प्रकरणांच्‍या सुनावण्‍यांना प्राधान्‍य दिले पाहिजे, असेही ते म्‍हणाले.

Goa Divorce Cases
Goa Education: सरकारी शाळांत 380 शिक्षकांची पदे रिक्त, 'त्‍या' निर्णयामुळे शिक्षक भासणार कमी

विविध कारणांमुळे वाढतायेत प्रकरणे

पती–पत्नीच्‍या वादात त्‍यांच्‍या आई–वडिलांचा शिरकाव, मोबाईलच्‍या वाढत्‍या वापरामुळे पती–पत्‍नीत वाढत असलेले अंतर अशा प्रमुख कारणांमुळे राज्‍यात घटस्‍फोटांची प्रकरणे वाढत आहेत. यातील जी प्रकरणे महिला आयोगात येतात, त्‍या प्रकरणांवर सुनावण्‍या घेऊन आणि त्‍यांचे समूपदेशन करून त्‍यांचे संसार टिकवण्‍याचा प्रयत्‍न महिला आयोगाकडून केला जात होता, असे आयोगाच्‍या माजी अध्‍यक्ष रंजिता पै म्‍हणाल्‍या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com