पणजी: टॅक्सींना डिजिटल मीटर (Goa taxi digital meters) बसवण्याची सक्ती असल्याने अनेकांनी त्यासाठी नोंदणी केली आहे. परंतु कंत्राटदारांकडून महिनोन महिने मीटर बसवण्यास विलंब होत आहे. तर इकडे मीटर नाही म्हणून पोलिस (Goa RTO) चालकांवर दंडात्मक कारवाई करून त्यांची सतावणूक करत आहेत. कंत्राटदाराच्या कर्माची फळे टॅक्सीचालकांना भोगावी लागत आहेत. त्यामुळे विलंबास कारण ठरलेल्या कंत्राटदारांवर कारवाई करण्याची मागणी टॅक्सीमालक संघटनेने केली आहे.
मीटर न बसविता रस्त्यावर आल्यास पोलिस तसेच वाहतूक अधिकारी चालकाला तालांव देत आहेत. अशावेळी ज्यांनी मीटर्स बसविण्यासाठी पैसे भरून नोंदणी केली आहे, ते पाेलिसांना पावती दाखवतात. तरीही पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जाते. त्यामुळे वाहतूक खात्याने यामध्ये हस्तक्षेप करून ही सतावणूक थांबवावी, अशी मागणी करणारे निवेदन आज टॅक्सीमालक संघटनेकडून पणजीत वाहतूक संचालकांना देण्यात आले. यापुढे पोलिसांनी दंड केल्यास विलंबास कंत्राटदार जबाबदार असल्याने ती रक्कम कंत्राटदाराकडून वसूल करण्याचे टॅक्सीमालकांनी ठरवले आहे.
सांगा, कुटुंब कसे चालवायचे?
सरकार सध्या ‘स्वयंपूर्ण गोवा’ची भाषा करत आहे. मात्र, जे टॅक्सीचालक स्वयंरोजगारासाठी टॅक्सी व्यवसाय करतात, त्यांच्यावर कारवाई करून अन्याय केला जात आहे. ही कारवाई म्हणजेच स्वयंपूर्ण गोवा आहे का? असा प्रश्नपान काही टॅक्सीचालकांनी केला आहे. मीटर बसवण्यासाठी सरकारने दोन कंत्राटदार नेमले आहेत. राज्यात मीटर बसवणारे एकूण आठ केंद्र आहेत आणि नोंदणी झालेल्या टॅक्सींची संख्या 2500 हून अधिक आहे. पैसे भरूनही दोन दोन महिने या कंत्राटदाराकडून बोलावणे येत नाही. मीटर नाही म्हणून टॅक्सी घरीच ठेवायची का? आम्ही कुटुंब कसे चालवायचे? असा सवाल टॅक्सीचालकांनी केला.
न्यायालयाच्या आदेशालाही वाटाण्याच्या अक्षता
मीटर न बसविल्याप्रकरणीची अवमान याचिका गोवा खंडपीठात प्रलंबित आहे. या याचिकेवरील सुनावणीवेळी गोवा खंडपीठाने सरकारला हे मीटर त्वरित बसविण्यासाठी कंत्राटदाराला जास्तीत जास्त केंद्रे सुरू करण्याचे निर्देश देण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानंतरही सरकारने काहीच हालचाली केलेल्या दिसत नाहीत. सध्या राज्यात दोनच कंत्राटदार नियुक्त केले असून त्यांची प्रत्येकी चार केंद्रे आहेत. मीटरसाठी नोंदणी केलेल्यांची संख्या अडीच हजारांपेक्षा जास्त आहे. राज्यात सुमारे 12 हजारांहून अधिक टॅक्सी आहेत.
कोविड काळात अनेक टॅक्सीचालक संकटात सापडलेत, ते अजूनही सावरलेले नाहीत. मीटरचे शुल्क देण्यासही काहीजणांकडे पैसे नाहीत. काहींनी कर्ज काढून शुल्क भरले आहे. मीटर बसविल्यानंतर लगेच ही रक्कम परत केली जाईल, असे सरकारने सांगितले आहे. मात्र, मीटर बसविण्यास दोन दोन महिने लागत असल्याने त्याचा भुर्दंड टॅक्सीचालकांना सोसावा लागत आहे.
- सुनील नाईक, टॅक्सीचालक, पणजी.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.