

पणजी: दोनापावला आणि म्हापसा येथे २०२५ मध्ये झालेल्या मोठ्या दरोडा प्रकरणातील संशयित पाच बांगलादेशी नागरिकांच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर न्यायालयाने सोमवारी त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावून त्यांची रवानगी कारागृहात केली आहे.
२०२५ मध्ये झालेल्या दोन मोठ्या दरोड्यांच्या तपासानंतर गोवा पोलिसांनी दिल्ली गुन्हे शाखेच्या मदतीने सहाजणांना ताब्यात घेतले होते. त्यापैकी मोहम्मद नासिर, नूर इस्लाम ऊर्फ नदीम खान, मोहम्मद सैफुल इस्लाम, सोहेल खान आणि मोहम्मद सुमन हवालदार या पाचजणांना गोव्यात आणले होते.
३० एप्रिलनंतर त्यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती, जी सोमवारी संपल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. पोलिस तपासात या टोळीच्या कार्यपद्धतीबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही टोळी पोलिसांपासून वाचण्यासाठी मोबाईल फोन किंवा कोणत्याही रेडिओ उपकरणाचा वापर पूर्णपणे टाळत होते.
टोळीचा म्होरक्या नूर इस्लाम ऊर्फ नदीम खान हा सराईत गुन्हेगार असून त्याने यापूर्वी कोलवाळ जेलमध्ये वेळ घालवला होता. त्यामुळे त्याला गोव्याची भौगोलिक स्थिती पूर्णपणे ठाऊक होती. मेघालय सीमेवरून बेकायदेशीरपणे भारतात शिरल्यानंतर त्यानेच या टोळीला गोव्यात दरोड्यांसाठी एकत्र आणले होते.
गुन्हे शाखेचे पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, या टोळीवर ‘फॉरेनर्स ऍक्ट २०२५’ अंतर्गत देखील कारवाई केली जात आहे. सहावा संशयित झाकीर हुसेन हा सध्या दिल्ली पोलिसांच्या ताब्यात असून त्यालाही लवकरच गोव्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. चोरीला गेलेला मौल्यवान मुद्देमाल आणि गुन्ह्यात वापरलेली शस्त्रे जप्त करण्याचे मुख्य आव्हान आता पोलिसांसमोर आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.