Goa Dengue Cases : राज्यात डेंग्यूचे रुग्ण वाढत आहेत. राष्ट्रीय साथीचे रोग विभागाच्या आरोग्य अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यात आतापर्यंत २० डेंग्यू प्रकरणांची पुष्टी झाली आहे. आरोग्य अधिकारी डॉ.कल्पना महात्मे म्हणाल्या,की राज्यात डेंग्यूचे २० रुग्ण आढळले आहेत. काही डेंग्यूची आम्हाला अलीकडे आढळलेली संशयित प्रकरणे ताळगाव आणि चिंबल येथील आहेत.दरम्यान,डिचोलीत ६ रूग्ण आढळून आल्याने खळबळ माजली आहे.
डॉ.महात्मे पुढे म्हणाल्या की, वास्को, नवे वाडे, वाडे, झुआरीनगर, झरीत, पणजी मार्केट, पर्वरीचा काही भाग हे डेंग्यू पसरण्याला पोषक जागा आहेत. डेंग्यू रोखण्यासाठी आरोग्य विभागाने काय पावले उचलली, असे विचारले असता, त्यांनी सांगितले की, डेंग्यूची शक्यता असलेल्या भागांचा शोध घेऊन उपाय राबवले आहेत.
6 जणांना अन्यत्र लागण!
डिचोलीत ''डेंग्यू''चे सहा रुग्ण आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. ''डेंग्यू''च्या या रुग्णांना डिचोलीबाहेर नोकरी-व्यवसायाच्या ठिकाणी लागण झाली आहे, अशी माहिती आरोग्य अधिकारी डॉ. मेधा साळकर यांनी दिली आहे. दुसऱ्या बाजूने डिचोलीत मलेरियाची स्थिती पूर्ण नियंत्रणात असून, मलेरियाचा एकही रुग्ण नसल्याची माहितीही त्यांनी दिली. पावसाळी आजार नियंत्रणात आणण्यासाठी डिचोलीच्या सामाजिक आरोग्य केंद्रातर्फे प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेण्यात आल्या असतानाच, ''डेंग्यू''चे रुग्ण आढळून आल्याने जनतेमध्ये भीती पसरली आहे.
प्रतिबंधात्मक उपाययोजना
पावसाळ्यात मलेरिया, डेंग्यू आदी साथीच्या आजरांचा फैलाव होऊ नये. यासाठी आरोग्य केंद्रातर्फे आवश्यक ती काळजी घेण्यात येत आहे, अशी माहिती आरोग्य अधिकारी डॉ. साळकर यांनी दिली. पावसाळ्यापूर्वीच प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. डासांचा फैलाव होऊ नये, यासाठी शिबीर आणि माध्यमातून जागृती करण्यात येत आहे. बांधकाम ठिकाणी निर्माण होणारी अस्वच्छता आणि मजूरांमुळे ''मलेरिया'' आदी रोगराईचा अधिक धोका असतो.बांधकाम मजुरांची तपासणी करण्यात येत आहे,असे डॉ. साळकर यांनी सांगितले.
सावधानतेचे आवाहन
राज्यात वाढत्या डेंग्यू आणि साथीच्या रोगांच्या रूग्णांच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी सावधगिरी बाळगावी,अशा सूचना आरोग्य अधिकारी डॉ.कल्पना महात्मे यांनी दिल्या आहेत. आपल्या घराच्या परिसरात डासांची पैदास होऊ नये, यासाठीचे उपाय करण्याचे आवाहनही डॉ.महात्मे यांनी केले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.