फोडा: गोवा डेअरी सध्या सहा कोटी रुपये तोट्यात असून नुकसानीचा आकडा काही कमी होत नसल्याने दूध उत्पादक संस्थांच्या अध्यक्षांनी आज (शुक्रवारी) गोवा हेअरीच्या सर्वसाधारण सभेत वादळी चर्चा केली. यावेळी आरोपांच्या फैरी झडल्या, मात्र विद्यमान संचालक मंडळाने सभासदांच्या प्रश्नांवर चौकशी करून येत्या आमसभेत हा अहवाल ठेवला जाईल, अशी ग्वाही दिली.
(Goa dairy loss six crore loss rajesh phaldesai)
गोवा डेअरीची कुर्टी फोंडा येथील सहकार भवनमध्ये बैठक पार पडली यावेळी अध्यक्ष राजेश फळदेसाई व इतर संचालक तसेच व्यवस्थापकीय संचालक पराग नगर्सेकर, सहकार खात्याचे पंकज मराठे व इतर उपस्थित होते. गोवा डेमरी सध्या तोट्यात असल्याने मागच्या प्रशासकांच्या कालावधीत घेतले गेलेले निर्णय आणि त्यांच्या अंमलबजावणीसंबंधी योग्य ती चौकशी करून कारवाई केली जाणार असल्याचे राजेश फळदेसाई यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
गोवा डेअरीच्या पन्नासाव्या सर्वसाधारण सभेला सभासदांची मोठी उपस्थिती होती. सभा सकाळी अकरा वाजता सुरू झाली ती दुपारी तीनपर्यंत चालली. या सभेत लेखापालाने उपस्थित केलेल्या प्रश्नांवर चौकशी करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला. येत्या दोन महिन्यांत यासंबंधी चौकशी करून पुढील आमसमेत तो सभासदांसमोर ठेवला जाईल, असे राजेश फळदेसाई यांनी सांगितले. विशेष म्हणजे गोवा डेअरीतील अवास्तव नोकरांची खोगिरभरती प्रकरणीचा विषयही चर्चेला आला.
गोवा डेअरीच्या पशुखाद्य प्रकल्पातील निविदा प्रक्रिया, व्हॉल्वच्या स्फोट प्रकरणाची चौकशी करण्याबरोबरच गोवा डेअरीला तोटा असतानाही दूध उत्पादकांना दिलेला दरफरक याबद्दलची चौकशी करण्यात येणार आहे. याशिवाय गोवा डेअरीच्या वरिष्ठ अधिकारी राधिका काळे यांची ही चौकशी त्वरित पूर्ण करून त्यांना सेवेत घेण्याबाबतही चर्चा झाली.
गोवा डेअरीच्या आतापर्यंतच्या कार्यकाळात एवढ्या लवकर कोणेतेच ऑडिट झालेले नाही, मात्र विद्यमान लेखापालाने केवळ पंधरा दिवसांत ऑडिट कॉपी पेस्ट केल्याचे स्पष्ट होत असल्याने यात काळेबेरे असल्याचा संशय गोवा डेअरीच्या प्रशासकीय समितीचे माजी अध्यक्ष दुर्गेश शिरोडकर यांनी व्यक्त केला.
कोविड महामारीच्या काळात गोवा डेअरीच्या दूध उत्पादकांना दरफरक आम्ही दिला, ही बाब विद्यमान संचालक मंडळाच्या डोळ्यात खुपते की काय, असा सवालही दुर्गेश शिरोडकर यांनी करून सरकारनेच गोवा डेअरीच्या सर्व व्यवहाराची चौकशी करावी, अशी मागणी दुर्गेश शिरोडकर यांनी केली.दरम्यान, गोवा डेअरीचे माजी अध्यक्ष माधव सहकारी यांनी विद्यमान संचालक मंडळाने सभासदांना आवश्यक चौकशी करण्याची ग्वाही दिली आहे. ही चांगली बाब असून गोवा डेअरी नफ्यात आणण्यासाठी आवश्यक प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही दिली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.