फोंडा: फोंडा पालिका क्षेत्रातील मार्केट परिसरात खाजगी मालकीच्या जागेत उभारण्यात आलेले बेकायदा व्यापारी गाळे पालिकेने आज (शुक्रवारी) दुपारी पाडले. रस्त्याच्या कडेला हे व्यापारी गाळे उभारण्यात आले होते, त्यात भाजीपाला, मसाला तसेच मासळी व फळ विक्रेते आदींचा त्यात समावेश होता.
(ponda municipality removes illegal encroachment )
रस्त्याच्या कडेला प्लास्टिकची आवरणे घालून या ठिकाणी आठजण बिनधास्त व्यवसाय करीत होते, मात्र मुख्य पालिका बाजार सोडून अन्य ठिकाणी हा व्यवसाय चालल्याने पालिका बाजारातील लोकांनी यासंबंधीची फोंडा पालिकेकडे तक्रार केली होती. बाजाराबाहेर बेकायदेशीररीत्या थाटलेल्या या गाळ्यांमुळे पालिका बाजारातील व्यापाऱ्यांना नुकसान होत असल्याने आमची व्यापारी संघटनेतर्फे हा विषय लावून घरला होता.
फोंड्यातील वरचा बाजार भागातील 'आमची व्यापारी संघटना' तर्फे गेल्या 10 मे रोजी यासंबंधीचे एक निवेदन फोंडा पालिकेला दिले होते. या निवेदनाला अनुसरून फोंडा पालिकेने गेल्या 27 मे रोजी या परिसराची पाहणी केली होती. त्यावेळेला व्यापारी संघटनेच्या प्रतिनिधींनाही पालिकेने विश्वासात घेतले होते.
गेले बरेच दिवस हा अतिक्रमणाचा विषय पडून राहिला होता, मात्र आज (शुक्रवारी) दुपारी फोंडा पालिकेने एका धडक कारवाईत हे आठ व्यापारी गाळे हटवले. कारवाई होत असल्याचे पाहिल्यावर या व्यापाऱ्यांनी स्वतःच गाळे हटवण्यास मदत केली, त्यामुळे हा परिसर आता स्वच्छ झाला आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.