

पणजी: गोव्यात सायबर गुन्हे, ऑनलाईन आर्थिक फसवणूक, बनावट व्यावसायिक व्यवहार आणि खोट्या आमिषांद्वारे नागरिकांची लूट सुरूच असल्याचे विविध पोलिस ठाण्यांत दाखल झालेल्या ताज्या गुन्ह्यांवरून स्पष्ट झाले आहे. राज्यभरात वेगवेगळ्या प्रकारच्या फसवणुकीच्या घटनांमध्ये लाखो रुपयांचा गंडा घालण्यात आल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.
कारंझाळे येथील एका प्रवास कंपनीच्या संचालकांविरुद्ध परदेश दौरे आयोजित करून देणे तसेच व्यवसाय विस्ताराचे आमिष दाखवून पर्वरी येथील रहिवाशांकडून तब्बल ७९.४६ लाख रुपये उकळल्याप्रकरणी पणजी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदारांनी २०२३ ते १५ जून २०२६ या कालावधीत गुंतवणूक केली होती. मात्र, आश्वासने पूर्ण करण्यात आली नाहीत आणि वारंवार मागणी करूनही रक्कम परत न मिळाल्याने त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.
सायबर फसवणुकीच्या दुसऱ्या प्रकरणात केरी-सत्तरी येथील एका व्यक्तीच्या बँक खात्यात अनधिकृत प्रवेश करून ७.४३ लाख रुपये विविध खात्यांत वळते करण्यात आले. २० ते २४ जुलैदरम्यान ही घटना घडली असून सायबर गुन्हे शाखेकडून प्राप्त ‘ई-झिरो एफआयआर’च्या आधारे वाळपई पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
शिवोली येथील ६१ वर्षीय महिला खोट्या फोन कॉलला बळी पडली. तिच्या मैत्रिणीला मोपा विमानतळावर पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे सांगून तातडीने पैशांची गरज असल्याचा बनाव करण्यात आला. त्यावर विश्वास ठेवून महिलेने नेट बँकिंगद्वारे २ लाख रुपये हस्तांतरित केले. त्यानंतर पुन्हा पैशांची मागणी होताच तिला फसवणुकीची जाणीव झाली.
मडगावातील एका व्यावसायिकालाही ऑनलाईन वातानुकूलन यंत्रांच्या बनावट विक्री व्यवहारात २.२८ लाख रुपयांचा गंडा बसला. संशयितांनी १२ नवीन वातानुकूलन यंत्रे विक्रीस असल्याचे भासवून विश्वास संपादन केला. मात्र, पैसे मिळाल्यानंतर माल न देता संपर्क तोडला. तसेच आके येथील एका महिलेच्या खात्यातून इंटरनेट बँकिंग व यूपीआयद्वारे १.२१ लाख रुपये अनधिकृतरीत्या काढण्यात आल्याचीही नोंद आहे.
संशयिताला पंजाबमधून अटक
कुडचडे पोलिसांनी ८.४८ लाख रुपयांच्या सायबर फसवणूक प्रकरणाचा तपास करत पंजाबमधील मोहाली येथील पीयूष चौधरी (२८) याला अटक केली आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४) व ३१९(२) अंतर्गत दाखल या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून ऑनलाईन व्यवहार करताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.