

मडगाव: आर्थिक फसवणूक प्रकरणात अटक करण्यात आलेल्या संशयित साई दळवी याच्याबाबत खोटी माहिती देणे एका महिला जामीनदाराच्या अंगलट आले. संशयितासह जामीनदाराचा मोबाईल क्रमांक चुकीचा असल्याचे आढळले. न्यायालयाने या घटनेची गंभीर दखल घेऊन त्या जामीनदाराला दहा हजार रुपये दंड ठोठावला.
दुचाकी विकण्याच्या बहाण्याने पाजीफोंड-मडगाव येथील ममता राजपूत या महिलेला तब्बल साडेतीन लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला होता. याप्रकरणी मडगाव पोलिसांनी संशयित साई दळवी (रा. कुडचडे) याला अटक केली होती. याप्रकरणी मडगावच्या मुख्य न्यायदंडाधिकारी शुभदा दळवी यांच्या न्यायालयात सुनावणी सुरू आहे.
या फौजदारी खटल्यात या संशयिताला जामीन मिळवून देण्यासाठी एका महिलेने जामीनपत्र आणि सुरक्षा रक्कम न्यायालयात सादर केली होती. मात्र, जामिनावर सुटताच संशयित दळवी याने अटींचे उल्लंघन केले होते व तो चौकशीसाठी आला नव्हता. पोलिसांनी शोध घेतला असता संशयिताने दिलेला संपर्क क्रमांक आणि जामीनदार महिलेचा मोबाईल दोन्ही बंद आढळले.
त्यानंतर, जामीनदार महिलेने न्यायालयात अर्ज करून संशयित दळवी याने न्यायालयात चुकीचा मोबाइल क्रमांक देण्यास सांगितले होते, अशी कबुली दिली होती. न्यायालयाने प्रतिज्ञापत्रावर न्यायालयाला अशी खोटी माहिती देणे गंभीर आहे, असे स्पष्ट करत जामीनदार महिलेला दहा हजारांचा दंड भरण्याचे आदेश दिले. दंडाची रक्कम कापून उर्वरित सुरक्षा रक्कम तिला परत घेण्याची परवानगी दिली.
साई दळवीला घेतले ताब्यात
मडगाव पोलिसांनी फरार संशयित दळवीला पुन्हा ताब्यात घेतले असून तो सध्या पोलिस कोठडीत आहे. आरोपी आधीच कोठडीत असल्याने, आता या प्रकरणाची पुढील सुनावणी कोठडीतील खटला म्हणून चालवली जाईल, असे न्यायालयाने आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.